अडत्या:उत्पादक, घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी यांच्यातर्फे आर्थिक व्यवहार करणारा मध्यस्थ. उत्पादकाकडून माल खरेदी करून त्यावर आवश्यक संस्कार करण्याचे काम घाऊक व्यापाऱ्यांचे असले, तरी बाजारव्यवहारांच्या वाढत्या व्यापांमुळे तो त्यांपैकी एक अगर अनेक कामे अडत्यावर सोपवितो.बाजारव्यवसायविषयक कामाचा उरक जलद होण्याच्या दृष्टीने हे अडत्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. अडत्याचे विविध प्रकार संभवतात. अनेक वेळा व्यापारी आपल्या वतीने खरेदीविक्रीचे करार करण्याचा अधिकार पूर्णतया अडत्यावर सोपवितो. या अधिकाराचा वापर करून अडत्या वेळप्रसंगी मालाच्या तारणावर पैसे उभारतो. आपल्या मालकाच्या वतीने सर्व प्रकारचे व्यवहार करण्याची ज्याला अनिर्बंध मुभा आहे, त्याला ‘सर्वाधिकारी अडत्या’ असे म्हटले जाते. असे अडत्ये कमीच. विशेषेकरून एखाद्या धंद्याशी संलग्न असे व्यवहार करण्याचे अधिकार अडत्याकडे सुपूर्त केले जातात. अशा मध्यस्थास ‘साधारण अडत्या’ संबोधले जाते. धंद्यासंबंधी एखाद्या विशिष्ट व्यवहारापुरताच ज्याचा अधिकार मर्यादित करण्यात येतो, त्यास ‘विशिष्ट अडत्या’ म्हणतात. व्यापारी देवघेवीत आश्वासक अडत्यालाही महत्त्व आहे. तो अडतकामाच्या सर्वसाधारण जबाबदाऱ्यांबरोबरच, ज्याला उधारीवर माल देण्यात येतो, त्याच्या वतीने पैशाची हमी घेतो म्हणजेच तो मालकाचे नुकसान न होण्याची जिम्मेदारी स्वत: उचलतो. जामीन राहण्याच्या या कामाबद्दल त्यास इतर अडत्यांपेक्षा अधिक मुशाहिरा मिळतो. उपर्युक्तसर्व कामाबद्दल अडत्या योग्य ती दलाली आकारतो. काम पार पाडताना जो तोटा येईल, त्याचे दायित्व मालकावर असते.
अंगीकृत कामाच्या अनुषंगाने अडत्यांचे वर्गीकरण करता येईल. व्यापारी अडत्या मालकाच्या वतीने मालाची विक्री करतो. माल आपल्या ताब्यात घेऊन त्याची किंमत ठरविण्याचे व ग्राहकाकडून पैसे वसूल करण्याचे काम त्याला करावे लागते. व्यापारी अडत्याला आपल्या नावाने विक्रीचे व्यवहार करण्याची परवानगी असते. दलाल प्रत्यक्ष माल ताब्यात घेत नाही. विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये खरेदीविक्रीचा करार ठरविणे एवढेच त्याचे काम. आपल्या नावाने व्यवहार करण्याची त्याला परवानगी नसते. कराराच्या अटी नमूद केलेले विक्रीपत्र व खरेदीपत्र त्याने आपल्या सहीने, अनुक्रमे विक्रेत्याच्या व ग्राहकाच्या हवाली केले, की व्यवहारातील त्याचे काम संपते. कधी कधी उत्पादक अगर व्यापारी, कमिशन एजंटाची नेमणूक करून आपला माल अगर आपल्या वतीने खरेदी केलेला माल विकण्याचे काम त्याच्यावर सोपवितो. ग्राहकाच्या मागणीप्रमाणे मालाचा पुरवठा करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. आपल्या मालकासाठी तो कमीत कमी किंमतीत माल खरेदी करतो. मालाच्या उत्पादनासंबंधी व किंमतीसंबंधी त्याला तपशीलवार माहिती असावी लागते. त्याच्या कामाबद्दल त्याला ठराविक कमिशन देण्यात येते. मालाची विक्री आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल, तर दलालाच्या कामाची व्याप्ती वाढते. आयात वा निर्यात दलाल म्हणून त्याला जहाजवाहतुकीची व्यवस्था करणे, बंदरामध्ये बोटींवर माल चढविणे व उतरविणे, जकातविषयक कागदपत्रे मिळविणे, मालाचा विमा उतरविणे यांसारखी जोखमीची कामे हाती घ्यावी लागतात नमुन्याबरहुकूम माल आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी लागते आणि माल ठरलेल्या तारखेस पोचेल अशी व्यवस्था करावी लागते.
मालाची ने-आण करणे सोयीचे व्हावे म्हणून व्यापारी वाहतूकदलालांची नेमणूक करतात. माल गोळा करून तो लोहमार्गाने वा अन्य मार्गाने निर्यातीसाठी बंदराकडे पोचविणे वा बाहेरून आलेला माल बंदरावर ताब्यात घेऊन तो इच्छित स्थळी पोचविणे, ही त्याची मुख्य कामे होत. रेल्वे कंपन्या अशा दलालांना खास सवलती देत असल्याने, रेल्वेशी प्रत्यक्ष व्यवहार करण्यापेक्षा दलालांमार्फत व्यवहार केल्यास ते अधिक काटकसरीचे होते. वाहतुकीत गुंतलेल्या मालाचा विमा उतरविण्याचे काम करणारा ‘विमा अडत्या’ मुख्यत: आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांशी संबंधित असतो. वेळप्रसंगी त्यास स्वत: विम्याचा हप्ता भरावा लागतो.
‘कोष्ठागार अडत्या’ माल ताब्यात घेऊन तो कोठारात ठेवण्याची व्यवस्था करतो. गुदामात माल ठेवल्याने मालाची काल-उपयोगिता वाढते व योग्य वेळी त्याला चांगली किंमत येऊ शकते. वाहतूक-दलालाकडून माल ताब्यात घेऊन तो गुदामात चांगल्या अवस्थेत राहील, याची कोष्ठागार अडत्या काळजी घेतो. या कामासाठी मिळणारी दलाली हाती येईपर्यंत त्यास माल अडकवून ठेवता येतो. जेव्हा कंपनी स्थापन होते व भांडवल-उभारणीसाठी शेअरांची विक्री सुरू करते, तेव्हा शेअरविक्रयाची जबाबदारी कंपन्यांचे हमीदार घेतात. अलीकडच्या काळात उदयास आलेला हा एक मध्यस्थ. पुरेसा शेअर खपले नाहीत, तर एकूण शेअरांचा काही भाग खरेदी करण्याची हमी हे अडत्ये देत असल्याने, नव्या कंपनीच्या दृष्टीने ते सोयीस्कर असते. शेअर खरेदी करण्याची तयारी दाखविल्याबद्दल कंपनीकडून त्या अडत्यांना दलाली मिळते.
विक्रेताआणि ग्राहक या दोहोंचा अडत्या म्हणून काम करणारा, पण ⇨लिलावपद्धतीने मालाची विक्री करून, त्यासाठी विक्रेत्याकडून दलाली आकारणारा ‘लिलाव अडत्या’ हा अडत्यांचा आणखी एक महत्त्वाचा प्रकार.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये अडत्याचे महत्त्व कमी झालेले दिसते. उत्पादक व किरकोळ व्यापारीअडत्याचेसाहाय्य न घेताही खरेदीविक्रीकार्ये पार पडतात.याचे श्रेय वाढत्या प्रमाणावर स्थापन होणाऱ्या साखळीदुकानांस आणि सरकारी विपणन संस्थांना आहे. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाल्यामुळे आयातनिर्यात अडत्याने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. इंग्लंडसारख्या देशातही कमीअधिक प्रमाणात हीच प्रवृत्ती दिसून येते. फार पूर्वीपासून भारतात शेतमालाच्या विपणनकार्यात, उत्पादक व ग्राहक यांमधील अटळ दुवा म्हणून व्यापारी अडत्याने महत्त्वाची कामगिरी बजावल्याचे दिसते. छोट्या व मोठ्या बाजारपेठांत शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी अनुक्रमे कच्च्या अडत्याचे आणि पक्क्या अडत्याचे (दलाल) अजूनही साहाय्य घ्यावे लागते. नियंत्रित बाजारपेठा आणि सहकारी विपणन संस्था यांच्या वाढीमुळे अडत्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. याउलट औद्योगिकीकरणामुळे आणि वाढत्या आयातनिर्यात व्यापारामुळे, कंपनीचे हमीदार व आयातनिर्यात दलाल यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणे अपरिहार्य आहे.
पहा : दलाल आणि दलाली.
भेण्डे, सुभाष