ॲरेमियन : इ.स.पू. ११–१० व्या शतकांत सिरियाच्या उत्तरेकडील अरॅम भागात राहणारे सेमिटिक लोक. त्यांची माहिती ॲरेमाइक कोरीव लेख, ॲसिरियन लेख व जुना करार यांतील उल्लेखांवरून मिळते. तथापि त्यांचा सुसंगत इतिहास ज्ञात नाही. ॲसिरियन पुराव्यांत त्यांचा उल्लेख ‘लुटारू’ असा केला आहे. ते इ.स.पू. १२ व्या शतकापूर्वी ईशान्य अरबस्तानातून सिरिया, ॲसिरिया, बॅबिलोनिया वगैरे प्रदेशांत घुसले असावेत. तिथे त्यांनी दमास्कस, सोबा, बित-अगुशी, बित-आदिनी, बित-हालुप, बित-बहिआनी, बित-याकिनी इ. स्वतंत्र राज्ये स्थापिली. आर्पाद ही त्यांची राजधानी होती. वाढत्या लोकसंख्येमुळे त्यांचा संचार मेसोपोटेमियात सर्वत्र झालेला दिसतो. जुन्या करारातील परंपरेनुसार ॲरेमियन हे हिब्रूंच्या जवळचे दिसतात. इ.स.पू. ७ व्या शतकापर्यंत हे टायग्रिस नदीच्या दक्षिणेस राहत होते. इ.स.पू. ६२६ मध्ये खाल्डियाचा सेनापती नॅबोपोलॅसर ह्याने बॅबिलोनिया जिंकून सिथीया व मीडिया येथील लोकांना आपल्या हाताशी धरले आणि ॲसिरियाचा पाडाव केला. त्यामुळे ॲरेमियनांची छोटी राज्येही संपुष्टात येऊन ॲरेमियन लोक नवीन खाल्डियन साम्राज्यात विलीन झाले. ॲरेमियनांच्या धर्मात अनेक देवतांचा समावेश होता, त्यांत काही बॅबिलोनियन व काही ॲसिरियनही होत्या. ॲरेमियनांची सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्रगती आढळत नाही. मात्र त्यांची भाषा मध्य आशियात खूप फैलावली आणि ती जनभाषा बनली. पुढे या व्यावहारिक भाषेचे वाङ्मयीन माध्यमात रूपांतर होऊन ती येशू ख्रिस्ताची भाषा झाली. तसेच पुढे क्यूनिफॉर्म लिपी लुप्त होऊन ⇨ॲरेमाइक लिपीने तिचे स्थान बळकाविले आणि त्यातूनच पुढे अरबी मूळाक्षरे विकास पावली.

देशपांडे, सु. र.