अग्निहोत्र: आर्यगृहस्थाने रोज सकाळी व संध्याकाळी करावयाचे होमात्मक श्रौतकर्म. हे नित्य व काम्य आहे. यात अजस्त्रपक्ष व उद्धरणपक्ष असे दोन पक्ष आहेत. अजस्त्रपक्षात गार्हपत्य, आहवनीय व दक्षिणाग्नी हे तीन अग्नी नित्य ठेवावयाचे असतात. उद्धरणपक्षात गार्हपत्य नित्य ठेवावयाचा असतो. होमाच्या वेळी त्याचे इतर दोन कुंडांत उद्धरण करायचे. उद्धरण म्हणजे एका कुंडातून दुसऱ्‍या कुडांत नेणे. सांयकाळी अग्नी व प्रजापती यांना उद्देशून व सकाळी सूर्य व प्रजापती यांना उद्देशून आहुती द्यावयाच्या असतात. वेद व चातुर्वर्ण्य यांच्या उच्छेदानंतर अग्नीहोत्र कलिवर्ज्य म्हणून सांगितले आहे.  

पहा : अग्नीपूजा                                                       

केळकर,गोविंदशास्त्री