आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना : (इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन आयटीओ). जगातील देशांमधील वस्तूंचा व्यापार अधिक खुला होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या स्थापनेची कल्पना अमेरिकेने १९४६ मध्ये सुचविली. संकल्पित आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती : (१) संघटनेच्या सदस्य-देशांतील रोजगार-स्थैर्यास व आर्थिक विकासास प्रोत्साहन देणे, (२) आंतरराष्ट्रीय व्यापारावरील निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि (३) व्यापार व तदनुषंगिक बाबींमध्ये सहकार्य व सल्ला देणारी कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय यंत्रणा उभारणे. अमेरिकेचे उच्च जकातदर, इंग्लंडचे अधिमान्य जकातदर, फ्रान्सचे निर्बंधात्मक जकातदर आणि रशियाची राज्यव्यापार-मक्तेदारी ह्या सर्वांमुळे जागतिक व्यापाराच्या प्रगतीस जी खीळ बसली होती, ती दूर व्हावी, हा या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश होता.

संघटनेच्या हाव्हॅना सनदेवर १९४८ मध्ये सह्या होऊनही, संघटनेची प्रत्यक्ष स्थापना सदस्य-देशांना तिची सनद मान्य होईपर्यंत लांबली. अमेरिकेतील व्यापारी संरक्षक धोरणाच्या पुरस्कर्त्यांचा प्रथमपासूनच ह्या संघटनेस विरोध होता आणि ⇨खुला व्यापार धोरणाचे प्रवक्ते संघटनेने सुचविलेल्या कित्येक फेरबदलांमुळे नाराज झाले होते. १९४७ मध्ये जिनीव्हा येथे व्यापार व जकातविषयक सर्वसामान्य करार (गॅट) संमत झाला. त्यामध्ये संघटनेच्या सनदेतील बहुतेक तपशील ग्रथित केलेला होता. तेव्हापासून ⇨गॅटच्या अनेक बैठकी होऊनही, अद्याप ही संघटना मूर्त होऊ शकली नाही

गद्रे, वि. रा.