ॲम्हर्स्ट, लॉर्ड विल्यम पिट : १४ जानेवारी १७७३–१३ मार्च १८५७). ब्रिटिशांकित हिंदवी- साम्राज्यातील १८२३–१८२८ या काळातील गव्हर्नर जनरल. १७९७ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाचा एम. ए. झाल्यानंतर ॲम्हर्स्टने सर्व यूरोपचा प्रवास केला. ॲम्हर्स्टच्या चुलत्यास मूल नसल्यामुळे त्याच्या पश्चात त्याचा लॉर्ड हा किताब ॲम्हर्स्टला मिळाला. त्याने नेपल्समध्ये परराष्ट्रवकील म्हणून काम केले (१८०९–११) व १८१५ मध्ये तो प्रिव्ही कौन्सिलचा सभासद झाला. पुढे त्यास ग्रेट ब्रिटन व चीन ह्यांच्यात व्यापारविषयक करार करण्यासाठी चीनला पाठविण्यात आले तथापि चीनच्या राजास मुजरा करण्याच्या प्रश्नावर मतभेद झाल्यामुळे तो १८१७ मध्ये तेथून परत निघाला. वाटेत तो सेंद हेलेनामध्ये नेपोलियनला भेटला.
ॲम्हर्स्टची १८२३ मध्ये हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. त्या वर्षी एक ऑगस्टला तो कलकत्त्यात आपल्या जागेवर रुजू झाला. त्याच्या पूर्वीचा गव्हर्नर जनरल जॉन ॲडम ह्याने कलकत्ता जर्नलच्या संपादकास हद्दपार करून मुद्रणस्वातंत्र्याचा बिकट प्रश्न निर्माण करून ठेवला होता. ॲम्हर्स्टने तत्त्वतः पूर्वीच्या गव्हर्नर जनरलच्या धोरणास मान्यता दर्शवून प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र समजूतदारपणा दाखविला. ॲम्हर्स्ट हा शांततेच्या धोरणाचा पुरस्कर्ता होता. तथापि त्यास ब्रह्मदेशच्या राजाबरोबर युद्ध (१८२४–२८) करणे भाग पडले. त्यात इंग्रजांना जय मिळाला व ब्रह्मदेशाशी तह झाला. या युद्धात कोट्यवधी रुपये खर्च झाल्यामुळे प्रथम ॲम्हर्स्टवर टीका झाली तथापि, वरील तहात मिळालेल्या आराकानच्या विपुल उत्पन्नामुळे नंतर त्याची वाहवाच होऊ लागली. ब्रह्मदेशातील कामगिरीबद्दल त्यास पुढे अर्ल-ऑफ-आराकान ही पदवी देण्यात आली. ब्रह्मी युद्ध [→इंग्रज-ब्रह्मी युद्धे] चालू असताना १८२४ मध्ये बराकपूरचे बंड उद्भवले. बंगाली शिपायांना पगारवाढ व युद्धसामग्री हलविण्यास वाहने न दिल्यामुळे त्यांनी युद्धावर जाण्यास नकार देऊन बंड पुकारले. म्हणून यूरोपीय अधिकाऱ्यांनी अनेकांना ठार केले. हा गव्हर्नर जनरल असतानाच भरतपूरच्या गादीच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी ॲम्हर्स्टने ईस्ट इंडिया कंपनीस संपूर्ण सहकार्य देऊन भरतपूरचा अजिंक्य समजला गेलेला किल्ला सर करविला. ⇨सिमला हे उन्हाळी राजधानीचे ठिकाण याच्याच कारकिर्दीत चालू झाले. १८२८ मध्ये राजीनामा देऊन तो इंग्लंडला परत गेला. त्यानंतर उरलेल्या आयुष्यात त्याने काही महत्त्वाच्या पदांवर काम केले. नोलपार्क (केंट) येथे तो मरण पावला.
देवधर, य. ना.
“