ॲलिबाय: आरोपीस उपलब्ध असलेला एक बचाव. गुन्ह्याच्या वेळी अन्यत्र उपस्थिती असा या संज्ञेचा अर्थ आहे. फिर्यादीने जर आरोपीवर एका विशिष्ट स्थळी व विशिष्ट वेळी एखादा गुन्हा केल्याचा आरोप केला, तर त्या ठिकाणी त्या वेळी आपण नव्हतो, हा आरोपीचा एक उत्कृष्ट बचाव होय. गुन्हास्थळी आरोपीची अनुपस्थिती पुराव्याने सिद्ध झाली, तर आरोपी निर्दोषी ठरतो. पण यासाठी चांगला व सबळ पुरावा द्यावयास पाहिजे. कारण या बाबतीत पुराव्याचा भार आरोपीवर असतो. आरोपीने दिलेल्या पुराव्याने उपस्थितीबद्दल जरी संशय उत्पन्न झाला, तरी त्या संशयाचा फायदा आरोपीस मिळतो.

कवळेकर, सुशील