अलुबुखार : (आलुबुखार हिं. अलुबा सं. आरूक, अलुक इं. प्लम, बुलेस, डॅन्सन लॅ. प्रूनस इंसिटिशिया कुल-रोझेसी). हे एक मोठे, कठीण, काष्ठमय क्षुप (झुडूप) किंवा लहान वृक्ष असून ह्याची लागवड सु. २,००० वर्षांपूर्वीपासून होत आलेली आहे. प्रू. इंसिटिशिया या जातीची उत्पत्ती यूरोपमधील प्रू.डोमेस्टिका आणि जपानमधील प्रू. सॅलीसीना या जातींपासून झालेली आहे. यूरोपात व आशियात जंगली अवस्थेत आढळते. काश्मीर, पंजाबातील टेकड्या, हिमाचल प्रदेश, दिल्ली, कुलू व कुमाऊँ येथे हल्ली लागवड करतात. पाने साधी, अंडाकृतीकुंतसम (भाल्यासारखी) पण पातळ, लहान व फार दातेरी असतात. लहान, पांढरी फुले पानांच्या आधी किंवा त्यांच्याबरोबर ऑक्टोबर-नोव्हेंबरात येतात किंजदल एक, किंजपुट ऊर्ध्वस्थ [→ फूल]. अश्मगर्भी फळ (आठळी फळ) गुळगुळीत, गोलसर किंवा अंडाकृती व पिवळे असते आणि बहुधा त्यावर तांबूस किंवा गर्द लाल छटा असते. ते मे-जूनमध्ये येते व गोड, रसाळ आणि खाद्य असते तसेच ते सारक (रेचक), थंडावा देणारे व ज्वरनाशक असते [→ रोझेलीझ].
जमदाडे, ज. वि.
लागवड : पूर्वी या फळझाडांच्या अनेक जातींची लागवड हिमालयाच्या टेकड्यांच्या भागात करून पाहण्यात आलेली आहे. त्या प्रयोगात किफायतशीर आढळून आलेल्या काही निवडक जातींचीच लागवड सध्या या भागात केली जाते. लागवडीसाठी जंगली जरदाळूच्या खुंटावर केलेली कलमे ४·५—६·०० मी. अंतरावर लावतात. कलम लावताना त्याचा शेंडा ६० सेंमी. उंचीवर छाटतात. त्यामुळे ह्या कलमाला बाजूने फांद्या फुटतात. त्यांपैकी तीन-चार फांद्या ठेवून बाकीच्या वसंत ऋतूत छाटून टाकतात. त्यामुळे राखून ठेवलेल्या फांद्या जोमदार बनतात. पहिल्या हिवाळ्यात पहिल्या मुख्य फांद्या छाटतात व दुय्यम फांद्या फुटू देतात. बाकीच्या सर्व फांद्या छाटतात. हीच छाटणी महत्त्वाची असते. दुसऱ्या हिवाळ्यात आडव्या येणाऱ्या व इतर जास्त असतील त्या फांद्या छाटतात. याचप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या हिवाळ्यांत छाटणी करतात. त्यापुढे फांद्यांची वाढ आणि फळे धरणे यांच्यामधील समतोल राखण्याच्या दृष्टीने योग्य ठरेल अशीच छाटणी झाडांना देतात.
लागवडीनंतर ३ ते ४ वर्षांनी फळे येऊ लागतात व ती २५ वर्षांपर्यंत येत राहतात. झाडावर फळे धरली म्हणजे फळांत एकमेकांत २·५ ते ७·५ सेंमी. अंतर ठेवून ती विरळ करतात. जुलै आणि ऑगस्टमध्ये फळे झाडांवरच चांगली पिकल्यावर तोडतात. दूरच्या बाजारात विक्रीकरिता पाठवावयाची असल्यास ती पिकण्याच्या आधी काही दिवस तोडतात. हवाबंद डब्यांत भरून ठेवण्यासाठी पिकलेलीच फळे घेतात. त्यांचा जॅमही चांगला होतो. सर्व फळे एकदम एका वेळी पिकत नाहीत. म्हणून ती पिकतील अशी ३—४ हप्त्यांनी काढून घेतात. भारतात सरासरी प्रत्येक झाडावरून ४० किग्रॅ. फळे निघतात. हिमाचल प्रदेशात भरपूर फळे येणार्या प्रत्येक झाडावरून ११० ते १५० किग्रॅ. फळे निघाल्याची नोंद आहे.
चौधरी, रा. मो.
रोग : अलुबुखारावर तपकिरी फळकूज रोग मोनिलिनिया फ्रुक्टिकोला ह्या कवकामुळे होतो. फळात कवकाचा शिरकाव भुंग्यांसारख्या कीटकांनी पाडलेल्या भोकावाटे होतो. कवक आत वाढल्याने फळ कुजते. यासाठी मॅलॅथिऑनसारखी कीटकनाशके वापरल्यानंतरच बोर्डो मिश्रणासारखी (३ : ४ : ५००) कवकनाशके फवारतात. झॅन्थोमोनस प्रनॉय या सूक्ष्मजंतूमुळे फक्त जपानी जातीवर डाग पडतात.
कुलकर्णी, य. स.
“