आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद : आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद म्हणजे कोणत्याही देशाने अन्य देशांशी केलेल्या आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद अथवा हिशेब. कुठल्याही देशाच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात द्दश्य व अद्दश्य आयात–निर्यात समाविष्ट केलेली असते. मालाची आयात–निर्यात दृश्य स्वरूपाची असते. हीस ⇨आंतरराष्ट्रीय व्यापार–संतुलन म्हणतात. परदेशातील प्रवाशांनी व विद्यार्थ्यांनी केलेला खर्च, एखाद्या देशाच्या परदेशात असलेल्या कंपन्यांनी मिळविलेला नफा, त्या देशाच्या बोटींनी वाहतुकीत मिळविलेले उत्पन्न, परदेशी नाविकांनी देशात केलेला खर्च यांसारखी मिळकत वा उपर्युक्त गरजांवर देशाला आलेला खर्च हे अद्दश्य स्वरूपाचे असतात. आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात आंतरराष्ट्रीय व्यापार-संतुलन आणि अद्दश्य स्वरूपाचे सेवा-व्यवहार यांचा अंतरर्भाव होतो.
आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार सरकारी व खाजगी अशा दोन्ही स्वरूपांचे असतात. सामान्यत: आंतरराष्ट्रीय येणी स्वचलनात वसूल होतात व देणी त्या त्या देशांच्या चलनांत द्यावी लागतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदाशी आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्तव्यवहार व विदेशविनिमय यांचा निकटचा संबंध आहे. तत्त्वत: आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद द्विनोंद-पद्धतीचा असल्याने, तो नेहमीच जमतो. वेगवेगळ्या देशांच्या ताळेबंद मांडण्याच्या पद्धतींत थोडाफार फरक असतो. तथापि त्या बारकाव्यांचा येथे विचार करण्याची आवश्यकता नाही. आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात विविध प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचा समावेश करताना अनेक व्यावहारिक व विधिविषयक अडचणी येतात. ह्या अडचणी आणि मांडणीतील वेगळेपणा टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय चलन निधी, आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक ह्यांसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन उपाय सुचविलेले आहेत. एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद कशा रीतीने मांडलेला असतो, ह्याची कल्पना येण्यासाठी भारताचा १९७२ चा (एप्रिल-जून) आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद पुढील पृष्ठावर दिलेला आहे.
या ताळेबंदातील चालू खाते व भांडवली खाते यांचा एकत्रित ताळेबंद जमलेला आढळतो. चालू खाते जितके उणे तितक्याच रकमेने भांडवली खाते अधिक असते व जर चालू खाते अधिक असेल, तर तितक्याच रकमेने भांडवली खाते उणे असते कारण ही दोन्ही खाती एकमेकांना पूरक असतात.
आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील चालू खाते व भांडवली खाते हा भेद करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करावा लागतो. हा भेद काहीसा नियमहीन आहे. चालू खात्यात त्या वर्षांच्या परदेशाबरोबरच्या वस्तू व सेवारूप उत्पन्नाच्या खरेदी-विक्रीचा समावेश होतो. उदा., स्वावलंबी अर्थव्यवस्थेत एकूण राष्ट्रीय खर्च एकूण राष्ट्रीय उत्पन्नाइतका असतो. आंतरराष्ट्रीय देवघेव सुरू झाली म्हणजे यात थोडा बदल होतो. म्हणजेच एकूण राष्ट्रीय खर्च—आयात + निर्यात= एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणून निर्यात—आयात=राष्ट्रीय उत्पन्न—राष्ट्रीय खर्च. राष्ट्रीय उत्पन्नाचा उपभोग व गुंतवणूक यांद्वारा विनियोग केला जातो. म्हणून निर्यातीचे आधिक्य=राष्ट्रीय खर्चापेक्षा राष्ट्रीय उत्पन्नाचे आधिक्य.
स्वावलंबी अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय खर्च नेहमीच बरोबर असतात. पण अन्य राष्ट्रांशी आर्थिक व्यवहार असणाऱ्या देशांच्या बाबतीत मात्र, राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय खर्च सारखे असतीलच, असे नाही. म्हणजेच चालू खात्यावरील जमा व नावे यांत तफावत असू शकेल. जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न व त्याची मुरवण बरोबर नसतात, तेव्हा आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील चालू खात्यात असमतोल आढळतो. हा असमतोल आयातीपेक्षा निर्यात जास्त असल्यामुळे असेल किंवा आयातीपेक्षा निर्यात कमी असल्यामुळे असेल. चालू खात्यावर निर्यातीपेक्षा आयात जास्त असेल, तर ताळेबंद जमविण्यासाठी भांडवली खात्यात परकीय कर्ज मिळविणे, सुवर्णाची निर्यात करणे, परदेशातील भांडवलगुंतवणूक अथवा ठेवी कमी करणे, परदेशातून देणग्या मिळविणे इ. उपाय योजावे लागतात. यांपैकी तात्पुरती कर्जे, सुवर्णनिर्यात, देणग्या यांसारखे उपाय फारच थोडा काळ उपयोगी पडू शकतात. म्हणून चालू खात्यात जर बराच काळ असमतोल राहिला, तर तो नाहीसा करण्यासाठी मूलगामी उपाय शोधणे आवश्यक ठरते. चलनमूल्य बदलणे, परदेशांकडून दीर्घकालिक कर्जे मिळविणे, उत्पादन-खर्चांत बदल करणे, ह्यांसारखे उपाय महत्त्वाचे होत. उदा., परदेशांकडून जेव्हा दीर्घकालिक कर्जे मिळतात, तेव्हा ती चालू खात्यावर जितकी तूट असेल तितकीच असतील, असे नाही. चालू खात्यावरील तुटीपेक्षा दीर्घकालिक कर्जाची रक्कम जास्त असल्यास चालू खात्यावरील तूट व भांडवली खात्यावरील अधिकता यांत वाढ होते. अशा परिस्थितीत चालू खात्यावरील तूट चिंताजनक नसते कारण देशातील एकूण भांडवल-गुंतवणूक वाढल्याने राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय उत्पादनक्षमता यांत वाढ होते. परिणामी निर्यातीत वाढ होऊन समतोल स्थापिला जातो. चालू खात्यावरील तुटीइतकी भांडवली खात्यात भांडवलाची आयात झाल्यास ती अल्पकालिक की दीर्घकालिक आहे, हे पाहणे महत्त्वाचे असते. मीड व अन्य काही अर्थशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ चालू खात्यावरील तुटीशी ताळेबंद जमविण्यासाठी भांडवलाची आयात होते, तेव्हा ती अल्पकालिक समजावी व ह्याखेरीज होणारी इतर सर्व भांडवल-आयात दीर्घकालिक समजावी.
एखाद्या देशाचा अनेक देशांशी व्यापार असेल, तर त्या देशांच्या प्रत्येक देशाबरोबरच्या ताळेबंदात कदाचित समतोल नसेल पण सर्व देशांबरोबर असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या एकत्रित ताळेबंदात मात्र समतोल असू शकेल.
ज्या वेळी एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात दीर्घकालिक अथवा मूलभूत असमतोल असतो, तेव्हा समतोल साधण्यासाठी निराळ्या देशांच्या चलनांचा अमर्यादित विनिमय करणे शक्य नसल्यास अडचणी उद्भवतात व त्यामुळे डॉ. विभाग, स्टर्लिंग विभाग अशांसारखे विभागीय ताळेबंद ठेवून, त्या त्या विभागात समतोल राखण्याचा प्रयत्न करणे भाग पडते.
सुवर्णमान अस्तित्वात होते, तेव्हा आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद असमतोल झाला, तर सोन्याची आयात–निर्यात होत असे. सोन्याची आयात–निर्यात झाली म्हणजे देशांतर्गत किंमती व उत्पादन–खर्च यांत बदल होऊन, ताळेबंदाचा समतोल साधला जात असे. सनातन अर्थशास्त्रज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदाचा समतोल व देशाच्या अर्थव्यवस्थेचा समतोल ह्यांत फरक पडण्याचे कारण नव्हते कारण पूर्ण रोजगारी हे त्यांनी गृहीतकृत्य मानले होते. उदा., एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील चालू खात्यात जमेपेक्षा नावे रक्कम जास्त असेल, तर तितक्या किंमतीचे सोने त्या देशाला निर्यात करावे लागे. सुवर्ण-निर्यात झाल्यामुळे त्या देशातील चलनपरिमाण कमी होऊन उत्पादन-खर्च व किंमती कमी होत, तर सुवर्ण-आयात झालेल्या देशात त्याच कारणाने उत्पादन-खर्च व किंमती वाढत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात तूट असणाऱ्या देशाच्या निर्यातीत वाढ व आयातीत घट आणि अधिकता असणाऱ्या देशाच्या आयातीत वाढ व निर्यातीत घट होऊन आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंद आपोआप पुन्हा समतोल होत असे. वस्तुत: ही सर्व उपपत्ती तर्कद्दष्ट्या चलनाच्या क्रयशक्ति-समानता सिद्धांतावरच आधारलेली आहे. आंतरराष्ट्रीय देणीघेणी असणाऱ्या देशात जर सुवर्णमान नसेल, तर विनिमयदर कसा ठरतो हे गस्टाव्ह कासेल ह्या अर्थशास्त्रज्ञाने क्रयशक्ति-समानता सिद्धांताच्या आधाराने स्पष्ट केलेले आहे. दोन महायुद्धांमधील काळात व्हायनर ह्या अर्थशास्त्रज्ञाच्या टीकेमुळे ही उपपत्ती मागे पडू लागली होती. पण युद्धोत्तर काळात निर्माण झालेल्या डॉ. व अन्य यूरोपीय चलनसमस्यांच्या संदर्भात ही उपपत्ती परत विचारात घेतली जाऊ लागली आहे.
तक्ता क्र. १. भारताच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद-चालू खाते
(एप्रिल–जून, १९७२ रकमा कोटी रूपयांत)
अनु. |
बाब |
रक्कम जमा |
रक्कम नावे |
रक्कम निव्वळ |
१ |
व्यापार : खाजगी सरकारी |
४४०·३ ३·४ |
१८१·२ २४९·५ |
+ २५९·१ – २४६·१ |
२ |
चलनेतर सुवर्ण |
—- |
— |
—- |
३ |
प्रवास |
७·९ |
४·७ |
+ ३·२ |
४ |
वाहतूक |
३०·२ |
१७·१ |
+ १३·१ |
५ |
विमा |
३·७ |
२·९ |
+ ०·८ |
६ |
गुंतवणुकीवरील उत्पन्न |
६·० |
६६·५ |
– ६०·५ |
७ |
सरकारी व्यवहार (अन्यत्र नोंद न झालेले) |
१०·८ |
५·५ |
+ ५·३ |
८ |
संकीर्ण |
११·० |
१५·३ |
– ४·३ |
९ |
हस्तांतरित देणी : सरकारी खाजगी |
५·० ३३·० |
६·८ ३·३ |
– १·८ + २९·७ |
१० |
चालू खात्यातील व्यवहार एकूण |
५५१·३ |
५५२·८ |
– १·५ |
११ |
चूकभूल |
— |
— |
– ५२·७ |
तक्ता क्र. २. भारताच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद-भांडवली खाते
(एप्रिल-जून, १९७२ रकमा कोटी रूपयांत)
अनु. |
बाब |
रक्कम जमा |
रक्कम नावे |
रक्कम निव्वळ |
१. |
खाजगी : |
|||
(अ) दीर्घकालीन |
१६·१ |
१६·८ |
– ०·७ |
|
(ब) अल्पकालिक |
०·३ |
०·५ |
– ०·२ |
|
२ |
बँकांचे व्यवहार |
२०·१ |
१८·० |
+ २·१ |
३ |
सरकारी: |
|||
(अ) कर्जे |
११६·२ |
०·२ |
+ ११६·० |
|
(ब) कर्जफेडीची तरतूद |
— |
५१·२ |
– ५१·२ |
|
(क) संकीर्ण |
३४·४ |
४९·८ |
– १५·४ |
|
(ड) ठेवी |
२०·४ |
१६·८ |
+ ३·६ |
|
एकूण भांडवल व चलन सुवर्ण : |
२०७·५ |
१५३·३ |
+ ५४·२ |
(आधार : रिझर्व बँक ऑफ इंडिया बुलेटिन, जून १९७४).
आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात असमतोल निर्माण होण्याची कारणे दोन : (१) आंतरराष्ट्रीय व्यापारात उत्पादन-घटकांच्या किंमतींत होणारे बदल (२) चलन-व्यवस्थांमध्ये होणारे बदल. व्यवहारात ही कारणे भिन्नपणे विचारात घेणे अशक्य असल्याने आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात निर्माण झालेला असमतोल उत्पादन घटकांच्या किंमतींत बदल झाल्यामुळे झाला आहे, की चलन-व्यवस्थेतील बदलामुळे झालेला आहे, यांबद्दल मतभेद निर्माण होतात. असमतोल नाहीसा व्हावा म्हणून, विदेश-विनिमय-नियंत्रण, चलनसंकोचन, ⇨अवमूल्यन यांसारखे मार्ग चोखाळण्यात येतात. चलनव्यवस्थेतील बदलामुळे निर्माण होणारा असमतोल टाळता यावा, यासाठी युद्धोत्तर काळात मिल्टन फ्रीडमन, सोह्मन, मंडेल इ. अर्थशास्त्रज्ञांनी अनेक उपाय सुचविलेले आहेत. त्या सर्वांचा प्रधान हेतू आंतरराष्ट्रीय चलनपद्धतीत सुसूत्रता व सहकार्य स्थापन करण्याचा आहे.
चलनपद्धतीतील बदलामुळे आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात निर्माण होणारा असमतोल टाळता येईल असे मानले, तर उत्पादन-किंमतीत बदल घडवून आणणाऱ्या कारणांचा विचार करावा लागतो. ह्याबाबत मीडचा द्दष्टिकोन प्रथम विचारात घेतला पाहिजे. उदा., आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात असमतोल असेल, तर चलनाचे अवमूल्यन करण्याचा उपाय काही वेळा सुचविला जातो. पण हे अवमूल्यन यशस्वी होईल किंवा नाही, हे ठरविण्यासाठी मीडने म्हटल्याप्रमाणे आयातीच्या मागणीपुरवठ्याची लवचिकता आणि निर्यातीच्या मागणी-पुरवठ्याची लवचिकता यांचा विचार करावा लागतो.
मेट्सलर व मॅकलप या अर्थशास्त्रज्ञांनीही आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात समतोल साधण्यासाठी लवचिकता व मुरवण यांसंबंधीच्या उपपत्ती मांडल्या आहेत, तर केन्सच्या गुणकसिद्धांताच्या आधारे जोन रॉबिन्सनने गुणक-उपपत्ती मांडलेली आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व त्यानंतर यूरोपात पूर्ण रोजगारी होती तोपर्यंत, ह्या उपपत्तींबाबत अर्थशास्त्रज्ञ उदासीन व काहीसे सांशक होते. १९५२ मध्ये अलेक्झांडर या अर्थशास्त्रज्ञाने ‘उत्पन्न-मुरवण-उपपत्ती’ मांडली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, व्यापारतुलेतील असमतोल ठरविण्यासाठी आयात व निर्यात यांतील तफावत लक्षात घेण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी देशातील एकूण उत्पन्न व मुरवण यांतील फरक लक्षात घ्यावा व आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात असमतोल असेल, तर चलनाचे अवमूल्यन करावे. अशा परिस्थितीत ज्या प्रमाणात अवमूल्यनामुळे उत्पादनातील वाढ व मुरवण यांमधील तफावत वाढेल, त्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात समतोल आणण्यात अवमूल्यन यशस्वी होण्याची शक्यता असते.
टिनवर्जेन व मीड या अर्थशास्त्रज्ञांनी लवचिकता-उपपत्ती व मुरवण-उपपत्ती यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, देशांतर्गत समतोल (म्हणजे पूर्ण रोजगारी) व परदेशांबरोबरचा समतोल (म्हणजे आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदाचा समतोल) साधण्यासाठी चलननीती व राजकोषीय नीती ह्या दोन्ही नीतींचा अवलंब करावा.
आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील माहितीच्या बिनचूकपणावर त्याचा अर्थनीती ठरविण्यासाठी किती उपयोग आहे, हे अवलंबून असते. माहिती बिनचूक आणि परिपूर्ण मिळण्यासाठी ताळेबंद तयार करण्याच्या पद्धतींत उत्तरोत्तर सुधारणा होत आहेत. आंतरराष्ट्रीय चलन निधीच्या सभासदराष्ट्रांना विशिष्ट पद्धतीने लिहिलेला त्यांचा आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद, निधीला सादर करावा लागतो.
युद्धोत्तर काळात युद्धामुळे आर्थिक दुरवस्था प्राप्त झालेले देश आणि विकसनशील देश यांच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदांत समतोल साधणे कठीण होऊ लागले आहे. कारण जगातील वेगवेगळ्या देशांचा व्यापार एकमेकांस पूरक राहिलेला नाही आणि महत्त्वाची चलने दुष्प्राप्य झालेली आहेत. ह्या अडचणी टाळण्यासाठी वेगवेगळ्या चलनसंस्था स्थापन करून तसेच विभागीय करार करून समतोल साधण्यासाठी उपाय अवलंबिले जात आहेत.
संदर्भ : 1. Ellsworth, P. T. The International Economy, New York, 1965.
2. Haberler, G.Survey of International Trade Theory, Princeton, 1961.
3. Mundell, Robert A. International Economics, New York, 1968.
केळकर, म. वि.
“