ॲस्टटीन : अधातुरूप मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह At. अणुभार २१०. अणुक्रमांक (अणुकेंद्रावरील प्रोटॉन संख्या) ८५ विद्युत् विन्यास (अणूमधील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २, ८, १८, ३२, १८, ७ आवर्तसारणी (रासायनिक मूलद्रव्यांची कोष्टकरूपाने केलेली विशिष्ट मांडणी) गट ७ अस्थिर समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेला त्याच मूलद्रव्याचा प्रकार) सुमारे २० संयुजा १ [→ संयुजा].
हे अणुकेंद्रीय विघटनाने तयार होणारे रासायनिक मूलद्रव्य असून त्याचे स्थिर समस्थानिक नाहीत. हॅलोजन गटातील ते सर्वांत भारी असून त्याचे स्थान आवर्त सारणीतील सातव्या गटात व आयोडिनाच्या खालचे आहे. ॲस्टटिनाचा शोध कॉर्सन, मॅकेंझी व सेग्रे यांनी लावला. १९४० साली त्यांना असे दिसून आले की, बिस्मथावर ३२ Mev (दशलक्ष इलेक्ट्रॉन व्होल्ट, १ इलेक्ट्रॉन व्होल्ट १·६ x १०-१२ अर्ग) ऊर्जेच्या आल्फा कणांचा मारा केला असता आल्फा, बीटा व गॅमा किरणांचा उत्सर्ग करणारे पदार्थ तयार होतात. त्यांच्या प्रयोगात आढळून आलेल्या अणुकेंद्रीय विक्रिया पुढील समीकरणांनी दाखविता येतात.
83Bi209 |
+ |
2He4 |
→ |
85At211 |
+ |
2n |
येथे n हा न्यूट्रॉन दर्शवितो.
या विक्रियेच्या पाठोपाठ पुढील विक्रिया होतात :
६० % 85At211 |
→ |
2He4 |
+ |
83Bi207 |
४० % 85At211 |
→ |
84Po211 |
||
84Po211 |
→ |
82Pb207 |
प्रायोगिक पुराव्यावरून वरील फले सिद्ध झाल्यावर १९४७ साली वरील तीन शास्त्रज्ञांनी या मूलद्रव्याला ॲस्टटीन हे नाव दिले. अणुकेंद्रीय विक्रियांनी कृत्रिम परिवर्तन करून ॲस्टटिनाचे सुमारे वीस समस्थानिक तयार करण्यात आलेले आहेत. त्यांपैकी सर्वांत स्थिर म्हणजे ॲस्टटीन (२१०) होय. त्याचा अर्धायुकाल (मूळचा किरणोत्सर्ग निम्मा होण्यास लागणारा काळ) केवळ ८·३ तास आहे. निसर्गातील खनिजातल्या युरेनियमाच्या मंद विघटनाने ॲस्टटिनाचे समस्थानिक लेशमात्र प्रमाणात सतत तयार होतात, पण ते अतिशय अल्पायू असतात. मार्गण (मूलद्रव्याच्या किरणोत्सर्गाचा उपकरणांद्वारे शोध घेऊन विविध प्रक्रियांच्या मार्गक्रमणाचा अभ्यास करण्याच्या) पद्धतीने अध्ययन करण्यासाठी वापरला जाणारा या मूलद्रव्याचा सर्वांत महत्त्वाचा समस्थानिक ॲस्टटीन (२११) होय. त्याचा अर्धायुकाल ७·५७ तास असतो. त्याच्या अध्ययनावरून ॲस्टटिनाच्या विक्रिया हॅलोजनासारख्या असून ते आयोडिनापेक्षा अधिक धातुधर्मी आहे, असे कळून आले आहे.
पहा : किरणोत्सर्ग हॅलोजने.
कारेकर, न. वि.
“