ॲस्कोमायसिटीज : कवकांच्या (बुशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींच्या, → कवक) चार वर्गांपैकी ॲस्कोमायसिटीज हा एक प्रमुख वर्ग आहे. या वर्गातील कवकांचे वैशिष्ट्य म्हणजे ॲस्कोबीजाणुनिर्मिती (बीजाणू म्हणजे लाक्षणिक प्रजोत्पादक भाग) होय. ॲस्कोबीजाणु हे ‘ॲस्कस’ या धानीत (पिशवीत) निर्माण होतात. सर्वसाधारणतः त्यांची संख्या आठ असली तरी ते कमीअधिक संख्येनेही आढळतात. परंतु ही संख्या दोनाच्याच पटीत असते. या वर्गातील कवके जीवोपजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणारी), शवोपजीवी (मृत शरीरावर उपजीविका करणारी), अवभौम (जमिनीखाली जाणारे), तसेच शेणात, शैवलांवर व समुद्राच्या पाण्यात आढळतात. यांत कवकजाल पटलयुक्त. चल बीजाणूंचा अभाव तसेच भिन्न प्रकारची बीजाणुफळे आढळतात. प्रजोत्पादन प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. लैंगिक प्रजोत्पादनामुळे ॲस्कोबीजाणूंची निर्मिती होऊन जीवनचक्रात परिपूर्णता येते. ॲस्कोमायसिटीजाच्या जीवनचक्राचे पुढील टप्पे असून निरनिराळ्या कवक जातींनुसार विविधता, न्यूनीकरण अथवा अभाव आढळतो. ते टप्पे असे : (१) कोशिका (पेशी) संलयन म्हणजे सायुज्यन (एकत्रीकरण) न होता झालेले कोशिका-द्रव्याचे (परिकलाचे) एकीकरण, (२) युग्माष्टीकरण म्हणजे बीजाणूत दोन केंद्रके उत्पन्न होणे, (३) युग्मित केंद्रकीय विभाजन म्हणजे गणसूत्रांची (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या मूक्ष्म घटकांची) एकगुणित संख्या असणाऱ्या केंद्रकांचे युग्मात होणारे विभाजन, (४) न्यष्टिसायुज्यन म्हणजे कोशिका-द्रव्याच्या सायुज्यनानंतर होणारा केंद्रक-द्रव्यांचा संयोग आणि अदलाबदल, (५) अर्धसूत्रण म्हणजे केंद्रक-विभाजनाच्या ज्या प्रकारात गुणसूत्रांची द्विगुणित संख्या एकगुणित होते तो प्रकार, (६) समविभाजन म्हणजे सामान्य कोशिका विभाजनाच्या वेळी केंद्रकात होणाऱ्या ज्या अनेक फेरबदलांमुळे संतति-कोशिकांपैकी प्रत्येकीत जनक-कोशिकेसारखाच गुणसूत्रांचा संच असतो ते व (७) मुक्त बीजाणूनिर्मिती म्हणजे ज्या संतति-कोशिका उत्पत्तीनंतर चिकटून न राहता मोकळ्या होतात अशा कोशिकांचे उत्पादन. या वर्गात एक वा अनेक ॲस्कसांचा समावेश क्लेस्टोथेशियम (बंद असलेले), पेरिथेशियम (चंबूसारखे तोंड असलेले) व ॲपोथेशियम (बशीच्या आकाराचे) या प्रकारच्या लैंगिक निर्मितीच्या बीजाणुफळांमध्ये झालेला आढळतो. अलैंगिक प्रजोत्पादनातही निरनिराळ्या प्रकारचे बीजाणू निर्माण होऊन त्यांतील काही पिक्निडियम, ॲसरल्ह्यूलस इ. प्रकारच्या अलैंगिक बीजाणुफळांतच तयार होतात. कित्येकदा अलैंगिक बीजाणूच प्रामुख्याने आढळतात. त्यामुळे या कवकाचा प्रसार होतो.
या वर्गातील काही कवके उपद्रवी तशीच काही उपयुक्तही आहेत. ⇨यीस्टचा पाव करण्यासाठी, मद्य-उत्पादनात व जीवनसत्त्व म्हणून उपयोग होतो. मोरेल्स व ⇨ट्रफल या प्रकारचे कवक मऊ व स्वादिष्ट असल्यामुळे खातात. पेनिसिलियमापासून पेनिसिलीन मिळते. ⇨पेनिसिलियम व ⇨ॲस्परजिलस यांचा उपयोग कार्बनी अम्लांच्या उत्पादनासाठी उद्योगधंद्यात करतात.क्लॅव्हिसेप्सापासून अरगोटॉक्सिनासारखी अल्कलॉइडे मिळतात. याउलट अन्नधान्ये, सरबते, मुरंबे, लोणची, जॅम, जेली, चामडे, सूत, सुती व लोकरी कापड यांची पेनिसिलियम व ॲस्परजिलसामुळे नासाडी होते. फुप्फुसातील गदाकवच रोग (ॲस्परजिलोसीस) हा मानवाचा रोग ॲस्परजिलसामुळे होतो. याशिवाय भुरी, एरगट, मखमली काणी, टिक्का, करपा इत्यादींसारखे रोग वनस्पतींवर पडतात व त्यामुळे अगणित नुकसान होते. वरील विविध प्रकारच्या कवकांचा समावेश असलेला हा वर्ग आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. या वर्गातील कवकांमुळे वनस्पतींना होणारे महत्त्वाचे रोग खाली दिले आहेत.
भूरी : या रोगामुळे वनस्पतींची पाने, खोड, मोहोर, फळे इ. भाग राख पडल्यासारखे पांढुरके किंवा भुरकट दिसतात, म्हणून त्यास ‘भुरी’ हे नाव दिलेले आहे. हा रोग द्राक्ष, वाटाणा, आंबा, जिरे, भेंडी, तोंडले, गवार, दुधी भोपळा, नागवेल, गुलाब, तेरडा व इतरही अनेक प्रकारच्या वनस्पतींवर आढळतो. त्यामुळे वनस्पतीतील हरितद्रव्य साकळले जाते, पाने रोगट होतात व वाळतात. फुले किंवा मोहोर जळतात, गळतात व फलधारणा होत नाही. आंब्याच्या मोहोराचे अशा रीतीने फारच नुकसान होते. द्राक्षाची पाने सुकतात, फुले करपून जातात, फळे फाटतात व डागाळली जातात. वाटाण्याच्या फुलांवर भुरी पडल्यास बी सुरकुतते व उत्पन्न कमी येते. नागवेलीची पाने सुकतात. भुरी रोग निरनिराळ्या जातींच्या कवकांमुळे होतो. यांचा प्रसार वाऱ्यामुळे कवकबीजाणू फैलावून होतो. साधारणत: थंड तपमान सु. २०—२६° से. व हवेतील आर्द्रता यांमुळे रोग पसरतो. ३०० मेशची (मेश हे कणाच्या आकारमानाचे माप आहे) गंधकाची भुटकी हेक्टरी २०—२५ किग्रॅ. पीक फुलावर असताना एकदा फवारण्याने जिरे व वाटाण्याचे नुकसान टाळता येते. द्राक्षावर मात्र ही भुकटी २१ दिवसांच्या अंतराने किमान ३-४ वेळा मारावी लागते. जर रोग आटोक्यात आला नाही, तर यापेक्षा अधिक वेळा मारावी लागते. आंब्यावरील भुरीसाठी प्रत्येक झाडावर दीड किग्रॅ. गंधक तीन वेळा मारतात. बव्हंशी भुरी रोग पृष्ठभागावरच आढळतो. परंतु गवार, घेवडा यांवरील कवक मात्र कोशिकांतर असते. याकरिता त्यावर ताम्रयुक्त कवकनाशक मारतात. नागवेलीवरील रोग आटोक्यात येईल अशा बेताने गंधकाची भुकटी मारतात [→ भुरी].
अरगट : हा रोग पाश्चात्त्य देशांत राय पिकावर आढळतो. महाराष्ट्रात तो बाजरी व ज्वारीवर आढळतो. १९५५—५६ साली बाजरीच्या पिकावर तो पहिल्यांदा आढळून आला. रोगट धान्य खाल्ल्यामुळे काही लोक मृत्यू पावले. रोग निवारणासाठी पेरणीपूर्वी बाजरी व ज्वारीचे बी स्क्लेरोशियापासून (अन्न साठविणाऱ्या कवकतंतूंच्या विश्रायी कठीण पुंजक्यापासून) मुक्त करणे आवश्यक असते. त्यासाठी २०% मिठाच्या पाण्यात बाजरीचे बी टाकल्यास स्क्लेरोशिया पाण्यावर तरंगतात. वर तरंगणारे बी काढून नष्ट करतात व उरलेले बी पाण्याने स्वच्छ धुवून सुकल्यावर पेरतात. ज्वारीसाठी ३०—३५% मिठाचे पाणी वापरतात. रोगप्रतिकारक्षम बाणांची पेरणी करतात [→ अरगट].
हळदीचा टिक्का : याचा प्रादुर्भाव सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत जमिनीलगतच्या हळदीच्या पानांवर होतो. प्रथमत: ठिपके पिवळसर असतात, नंतर ते तांबूस व शेवटी काळसर होतात. त्यामुळे हळदीचे उत्पन्न घटते. हा रोग टॅफ्रिना मॅक्युलॅन्स या कवकामुळे होतो व त्याचा प्रसार वाऱ्यांने कवकबीजाणू फैलावून होतो. रोग निवारणासाठी ऑक्टोबर महिन्यात ताम्रयुक्त कवकनाशकाचा फवारा मारतात व असे २—३ फवारे एक महिन्याच्या अंतराने मारावे लागतात.
कपाशीचा करपा अथवा कवडी : हा रोग विशेषत: बी उगवून आल्यानंतर रोपट्याच्या पर्णदलांवर आढळतो. तसेच तो बोंडावरही पडतो. या रोगाच्या प्रतिबंधाकरिता ॲग्रोसानाशकेसारखी पारायुक्त कवकनाशके बीजलेपनासाठी वापरतात. रोगट धसकाटे, बोंडे व कवड्या वेचून जाळतात.
भारताचा मखमली काणी : या रोगाचा प्रादुर्भाव तुरळक प्रमाणात आढळतो. तो उस्टिलाजिनॉयडिया व्हिरेन्स या कवकामुळे होतो. त्यामुळे ओंबीवर तांदळाऐवजी सुरुवातीस पिवळसर, नंतर हिरवी व शेवटी काळपट हिरवी मखमलीसारखी भुकटी तयार होते. रोग निवारणासाठी निरोगी बियांस ॲग्रोसान चोळतात व रोगट झाडे उपटून जाळून टाकतात.
उसाचा लालरंगी रोग : हा रोग भारतात व इतरत्रही आढळतो. रोगप्रतिबंधासाठी निरोगी बेणे वापरतात. शेतातील रोगट ऊस उपटून जाळतात. रोगप्रतिकारक वाण लावतात.
यांशिवाय अष्टिफळांवरील (कोयीच्या फळांवरील) कूज, सप्ताळूची पाने वळणे, सफरचंदाचा खवड्या, चेस्टनटाचा करपा, द्राक्षाची काळी फळकूज, वाटाण्याचा करपा, गव्हाचा सर्वनाशी करपा, लसूणघासाचा टिक्का इ. रोग याच वर्गातील अनेक प्रकारच्या कवकांमुळे होतात.
पहा : कवक.
संदर्भ : 1. Heald, F. D. Mannual of Plant Diseases, New Delhi, 1963.
2. Walker, J. C. Plant Pathology, New York, 1957.
वांगीकर, प. द.