अंतर्कीलन : रक्तक्लथ (रक्ताची गुठळी) किंवा इतर काही बाह्य पदार्थ रोहिणी किंवा नीलेमध्ये अकस्मात अडकून तेथील रक्तप्रवाह बंद पडतो. या विकृतीला ‘अंतर्कीलन’ व ज्या पदार्थामुळे रक्तप्रवाह बंद होतो त्याला ‘अंतर्कील’ असे म्हणतात.
‘कील’ या शब्दाचा धात्वर्थ ‘पाचर’ असा आहे. रक्तवाहिनीच्या आत पाचरीसारखा बसणारा पदार्थ म्हणून त्याला ‘अंतर्कील’ असे नाव आहे. ‘रक्तप्रवाहकील’ म्हणजे रक्तप्रवाह बंद करणारी पाचर असा शब्दप्रयोगही योग्य होईल.
प्रकार : अंतर्कीलांचे अनेक प्रकार आहेत. वाहिन्यांमध्ये रक्त साखळून होणारा ‘वाहिनीक्लथ’ वसा, हवा अर्बुदकोशिकापुंज [→अर्बुद], जंतुसमूह, यांनी व क्वचित रक्तवाहिन्यांच्या भित्तींच्या अंत:स्तरातील कोशिकांची वसात्मक अपकृष्टी झाली असता अंतर्कील तयार होऊ शकतो.
सर्वांतअधिक प्रमाणात आढळणारा अंतर्कील म्हणजे रक्तवाहिनीमध्ये रक्ताचे क्लथन झाल्यामुळे उत्पन्न झालेल्या ‘वाहिनीक्लथा’ पासून निघालेला (निसटलेला) त्याचा भाग होय. वृद्ध, अशक्त किंवा फार वेळ निजून रहावे लागते अशा व्यक्तींच्या नीलांमध्ये रक्तप्रवाह फार मंद चालतो व त्यामुळे त्या नीलांमधील रक्त साखळून त्यापासून ‘वाहिनीक्लथ’ तयार होतो. या क्लथाचा काही भाग तेथून निसटून रक्तप्रवाहात पुढे जातो, त्या वेळी ‘अंतर्कीलन’ होते.
अस्थिभंगामुळे अस्थिमज्जेतील वसा मूळ जागेपासून निसटून नीलांवाटे ह्रदयाच्या उजव्या निलयातून (कप्प्यातून) फुप्फुसात गेली असता तिच्यामुळे फुप्फुसरोहिणी किंवा तिच्या मोठ्या शाखा अकस्मात बंद पडल्या, तर मृत्यूही संभवतो. या प्रकाराला ‘फुप्फुसांतर्कीलन’ असे म्हणतात.
मानेच्या मुळाजवळच्या मोठ्या नीला अपघाताने किंवा शस्त्रक्रियेच्या वेळी एकदम उघडल्या गेल्या तर त्या नीलांमध्ये बाहेरची हवा ओढली जाऊन त्या हवेचाच ‘अंतर्कील’ बनतो. खोल पाण्यात कामे करणाऱ्या पाणबुड्यांच्या रक्तात नायट्रोजन वायू अधिक दाबाने मिसळलेला असतो, त्यांना पाण्याबाहेर एकदम काढल्यास त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये नायट्रोजनाचे बुडबुडे सर्वत्र तयार होतात. हाही अंतर्कीलनाचाच एक प्रकार होय.
अर्बुदे,विशेषत: मारक अर्बुदे, कीलनामुळेच प्रसार पावतात. एका ठिकाणच्या अर्बुदकोशिकांचे पुंज रक्तामार्गे दुसरीकडे जाऊन तेथे त्या कोशिकांची वाढ झाल्यामुळे प्रक्षेप तयार होतात. असे प्रक्षेप मुख्यत: फुप्फुसांत व यकृतात दिसतात.
संसर्गग्रस्त भागांतील वाहिन्यांमधून निघणाऱ्या अंतर्कीलांतील जंतू सर्व शरीरभर पसरून अनेक ठिकाणी ⇨विद्रघी उत्पन्न होतात. हाही कीलनप्रसाराचाच प्रकार होय.
उतारवयात मोठ्या रोहिण्यांच्या भित्तींच्या अंत:स्तरातील कोशिकांची वसात्मक अपकृष्टी होते. अशा अपकृष्ट कोशिकांपासून अंतर्कील उत्पन्न होऊ शकतो.
हृद्कपाटांवर (हृदयाच्या झडपांवर) संधिज्वरामुळे अंकुर उत्पन्न होतात. या अंकुरावर क्लथाचे थर बसून त्यापैकी काही भाग कपाटांवर निसटून रोहिणीमार्गे मस्तिष्क, वृक्क वगैरे महत्त्वाच्या इंद्रियांत जातो. अशा प्रकारे होणारा अंतर्कीलही काही वेळा फार गंभीर परिणाम करु शकतो.
मोठ्या नीला व हृदयाच्या उजव्या बाजूच्या निलयांत उत्पन्न होणारे अंतर्कील फुप्फुसरोहिणीमध्ये रोध (अडथळा) उत्पन्न करतात. फुप्फुसनीला व हृदयाच्या डाव्या बाजूच्या निलयांत उत्पन्न होणारे अंतर्कील फुप्फुसरोहिणीमध्ये रोध उत्पन्न करतात. हे अंतर्कील रोहिणीवृक्षाच्या शाखांमध्ये कोठेतरी अडकून तेथून पुढच्या ऊतकाचा रक्तपुरवठा बंद करतात. अशा वेळी पुढच्या ऊतकाचा त्रिकोणाकृती भाग अपकृष्ट व मृत होतो. त्याला ⇨अभिकोथ असे म्हणतात.
चिकित्सा : हातापायांच्या रोहिण्यांमध्ये अंतर्कीलन झाले असता ते शस्त्रक्रियेने काढून टाकता येते परंतु हृदय, मस्तिष्क, फुप्फुस वगैरे ठिकाणी अंतर्कीलन झाले तर शस्त्रक्रिया करता येत नाही. अशा वेळी रक्तवाहिन्यांचे प्रसरण करणारी आणि रक्तक्लथनविरोधी औषधे देतात.
ढमढेरे, वा. रा.
“