अंड: स्त्रीलिंगी प्राण्यामध्ये ⇨ अंडकोशात निर्माण होणाऱ्या प्रजोत्पत्तिक्षम कोशिकेला ‘अंड’ म्हणतात. परिपक्व अंडाचा शुक्रकोशिकेशी [→ शुक्राणु] संयोग झाल्यानंतर गर्भ तयार होतो.

अंडाचीउत्पत्ती आणि रचना थोडे किरकोळ भेद सोडल्यास मनुष्य व इतर प्राण्यांत सारखीच असते [ → अंडे]. येथे मनुष्यजातीतील अंडाच्या वैशिष्ट्याचेच फक्त वर्णन केले आहे.

मानवी अंड ११७ ते १४२ मायक्रॉन एवढ्या आकाराचे असून त्याच्याभोवती इतर प्राण्यांच्या अंडाप्रमाणेच संरक्षक व पोषक थर असतात. अंडकोशात अपूर्ण वाढीच्या अनेक अंडकोशिका असतात. विशिष्ट कालमर्यादेनंतर अंडाची वाढ पूर्ण होऊन परिपक्व अंड अडकोशभेद करून बाहेर पडते आणि अंडवाहिनीमार्गे ते गर्भाशयाकडे जाते. अंडवाहिनीतून जात असतानाच त्याचा शुक्रकोशिकेशी संयोग होतो. या क्रियेला निषेचन म्हणतात. असे निषेचित अंड गर्भाशयाच्या आतील अधिवृद्धी झालेल्या (जाड झालेल्या) अंत:स्तराला चिकटून त्याची पुढील वाढ तेथे होते. अशा प्रकारे अंड निषेचित झाल्यास गर्भाची पूर्ण वाढ होऊन प्रसूतीनंतर बालकाचे स्तनपान चालू असेपर्यंत पुढील अंडनिर्मिती तात्पुरती थांबते.

अंड निषेचित न झाल्यास अधिवृद्धी झालेल्या गर्भाशयाच्या अंतःस्तराबरोबरच ते विसर्जित होते. त्यावेळी गर्भाशयाच्या अंत:स्तरातील रक्तवाहिन्यांमधून रक्तस्त्राव होतो. त्यालाच ‘रज:स्त्राव’ किंवा ⇨ऋतुस्त्राव  म्हणतात.

स्त्रीमध्ये अंडनिर्मिती वयाच्या १२ ते १४ व्या वर्षी सुरू होऊन ४० ते ४५ व्या वर्षापर्यंत चालू राहून दर २४ ते २८ दिवसांत एक ऋतुचक्र पुरे होते. सामान्यत: प्रत्येक ऋतुचक्राच्या १२ ते १४ व्या दिवशी एक अंड अंडाशयातून परिपक्व होऊन बाहेर पडते.

ढमढेरे, वा. रा.