ॲसिटाले: कार्बनी संयुगांच्या एका वर्गाचे नाव. या संयुगांचे सर्वसामान्य संरचना सुत्र हायड्रोजनाचा एक अणू अथवा अल्किल किंवा अरिल गट असून R’ हे नेहमीच अल्किल किंवा अरिल गट असतात.
ॲसिटाल्डिहाइड व एथिल अल्कोहॉल यांच्यापासून बनणाऱ्या या वर्गातील विशिष्ट संयुगालाही ‘ॲसिटाल’ म्हणतात.
थोड्याशा अम्लाच्या सान्निध्यात एखादे आल्डिहाइड व अल्कोहॉल यांची विक्रिया घडवून ॲसिटाले तयार करता येतात.
परंतु या सामान्य पद्धतीशिवाय निरनिराळ्या पद्धतींनी व निरनिराळा कच्चा माल वापरून ती तयार केली जातात. ती स्थिर (लवकर विघटन न पावणारी) असून शुद्ध स्थितीत तयार करता येतात. ती स्वच्छ, वर्ण- हीन, द्रव्यरूप व पाण्यापेक्षा हलकी असतात. अपघटन (रासायनिक विक्रियेने तुकडे) न होता त्यांचे ऊर्ध्व- पातन (वाफ थंड करून द्रव मिळविणे) करता येते. नीच क्रमांकांची ॲसिटाले पाण्यात विद्राव्य (विरघळणारी) असतात पण त्यांचा रेणुभार जसजसा वाढत जातो तशी त्यांची विद्राव्यता कमी होते. नीच ॲलिफॅटिक ॲसिटालांना विशिष्ट प्रकारचा सुवास येतो. ॲसिटालांवर क्षाराचा (अल्कलीचा) परिणाम होत नाही. पण पाण्यात मंद गतीने व उष्ण आणि विरल जलीय अम्ल विद्रावाने त्यांचे जलीय विच्छेदन होऊन (पाण्याच्या विक्रियेने संयुगाचे तुकडे होऊन) मूळ आल्डिहाइडे व अल्कोहॉले मिळतात. आल्डिहाइड व १, २— ग्लायकॉलापासून तयार केलेल्या वलयी ॲसिटालांना ‘डाय-ऑक्झोलेने’ म्हणतात. उदा., फॉर्माल्डिहाइड आणि एथिलीन ग्लायकॉल यांच्यापासून बनणारे १, ३ डाय–ऑक्झोलेन हे ॲसिटाल संयुग आहे.
यांच्यापासून बनणारे १, ३ डाय-ऑक्झोलेन |
हे |
ॲसिटाल्डिहाइड व एथिल अल्कोहॉल यांपासून बनणाऱ्या व CH3·CH (OC2H5)2 या सूत्राने दाखविल्या जाणाऱ्या संयुगाला १, १—डायएथॉक्सी एथेन, एथिलिडीन डायएथिल ईथर, ॲसिटाल्डिहाइड डायएथिल ॲसिटाल किंवा नुसतेच ॲसिटाल म्हणतात.
रासायनिक विक्रियांत आल्डिहाइड गटाचे रक्षण करणे (त्यावर रासायनिक क्रिया होऊ न देणे) जेव्हा जरूर असते तेव्हा त्यांचे ॲसिटालात रूपांतर करण्यात येते. अनेक ॲसिटालांचा उपयोग सुगंधी द्रव्ये बनविण्यासाठी करतात. उदा., गुलाबाच्या सुगंधाकरिता फिनिल ॲसिटाल्डिहाइड, एथिलीन ग्लायकॉल ॲसिटाल. साबण सुवासिक करण्यासाठी ॲसिटालांचा उपयोग होतो. उद्योगधंद्यातील प्रक्रियांत विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) व प्लॅस्टिसायझर द्रव्य (प्लस्टिक पदार्थांचा लवचिकपणा व इतर गुणधर्म सुधारण्यासाठी त्यांत घालण्यात येणारे द्रव्य) म्हणून त्यांचा उपयोग करतात. डाय—ऑक्झोलेनांचा उपयोग प्लॅस्टिकच्या व सुरक्षित काच बनविण्याच्या धंद्यात केला जातो.
संदर्भ : Fieser, L. F. Fieser, M. Organic Chemistry, Bombay, 1962.
जमदाडे, ज. वि.
“