ॲशॉफ, कार्ल आल्बर्ट लूटव्हिख: (१० जानेवारी १८६६—२४ जून १९४२). जर्मन विकृतिविज्ञान- विद. त्यांचा जन्म बर्लिन येथे झाला. १९०३ मध्ये मारबर्ग येथे त्यांची प्राध्यापकपदावर नेमणूक झाली व त्यानंतर १९०६—३५ या काळात ते फ्रायबर्ग येथे प्राध्यापक होते. विकृतिविज्ञानात (रोगाचा उद्गम, स्वरूप व प्रसार यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात) त्यांच्या काळी चालू असलेल्या संशोधनात एकसूत्रीपणा आणला. मुख्यतः वृक्करोग (मूत्रपिंडाचे रोग), आंत्रपुच्छशोथ (ॲपेंडीसायटीस), वाहिनीक्लथन (वाहिनीत रक्त गोठणे), रोहिणीकाठिण्य (रोहिणी कठीण होणे) व क्षय या रोगांच्या विकृतिविज्ञानासंबंधी त्यांनी संशोधन केले. संधिवात या रोगात बहु- केंद्रक कोशिका (अनेक केंद्रके असलेल्या पेशी ), तंतुजन कोशिका (तंतू निर्माण करणाऱ्या पेशी ) इत्यादींनी बनलेली एक सूक्ष्मदर्शक यंत्रातून दिसणारी गुठळी किंवा पिंड त्वचेखाली, संधी व कंडरांमध्ये (हाडांना स्‍नायू बांधणाऱ्या तंतुमय पेशीसमूहांच्या पट्ट्यांमध्ये), महारोहिणीत किंवा परिफुप्फुसात (फुप्फुसाभोवतालच्या आवरणात) आढळते व तिच्यावरून संधिवात हे निदान पक्के ठरते. या तऱ्हेचे पिंड किंवा गुठळ्या हृदयाचे अंतः- स्तर, स्‍नायू व परिहृदय (हृदयाभोवतालचे आवरण) या जागी सर्वत्र पसरलेल्या आढळतात. त्यांचे वर्णन प्रथम ॲशॉफ यांनी केल्यामुळे त्या पिंडांना ‘ॲशॉफ पिंड’ किंवा ‘ॲशॉफ कोशिका’ म्हणतात. ते फ्रायबर्ग येथे मृत्यू पावले.

कानिटकर, बा. मो.