अमृतराय : (१६९८ –१७५३). प्रसिद्ध मराठी कवी व कीर्तनकार. हा बुलढाणा जिल्ह्यातील फतेखेरडा (साखरखेरडा) येथे राहणारा. त्याचे गुरू कोण होते, याबद्दल मतभेद आहेत. मध्वमुनी, अंबिकासरस्वती इत्यादिकांची नावे गुरू म्हणून त्याच्या काव्यात येतात. त्यावरून अनेक अमृतराय झाले असावेत अशी शंका काही विद्वानांनी व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्र कवि अमृतरायकृत कवितासंग्रह  या पुस्तकात त्याची कविता संग्रहित झालेली आहे. त्याच्या कवितेत ध्रुव, शुक, सुदाम यांची चरित्रे, काही आख्यानपर कविता, बरीच स्फुट काव्य रचना आणि काही पदे आहेत. त्याची बहुतेक रचना कटावात्मक असून प्रासादिक आहे. मराठीत कटावरचना प्रथम त्याने केली. संस्कृत, फार्सी व हिंदी या भाषा त्याला येत होत्या. त्याची हिंदीतील रचनाही उपलब्ध आहे. त्याच्या काव्यातील रागादिकांच्या उल्लेखांवरून त्याला संगीताचे ज्ञानही असावे, असे दिसते. त्याची समाधी औरंगाबाद येथे आहे.

संदर्भ : ओक, वा. दा. संपा.महाराष्ट्र कवि अमृतरायकृत कवितासंग्रह, मुंबई, १९१०.

    सुर्वे, भा. ग.