अमीबाजन्य विकार : (अमीबिॲसीस). एंटामीबा हिस्टॉलिटिका या प्रजीवाच्या (प्रोटोझोआच्या) संपर्काने मोठ्या आतड्यास व इतर अंतस्त्यांस (अंतर्गत इंद्रियांस) येणाऱ्या शोथास (दाहयुक्त सुजेस) ‘अमीबाजन्य विकार’ असे म्हणतात. या प्रजीवामुळे होणारा रोग बहुध चिरकारी (दीर्घकालिक) असतो, पण तो आशुकारी (तीव्र) स्वरूपातही होऊ शकतो. मोठ्या आतड्याशिवाय इतर अंतस्त्यांमध्येही या प्रजीवाचा संसर्ग होऊन तेथेही विद्रधी (पूयुक्त फोड, → विद्रधि) होऊ शकतो.

हा रोग जगातील सर्व देशांत आढळतो. विशेषतः उष्ण प्रदेशांत याचे प्रमाण जास्त असते. एंटामीबा हिस्टॉलिटिका या प्रजीवाच्या दोन अवस्था असतात. परिस्थिती अनुकूल असेल तर त्याची वर्धी (क्रियाशील) अवस्था असते. परिस्थिती प्रतीकूल असेल तर पुटकावस्था (कवचयुक्त अवस्था) दिसते.

हा प्रजीव मनुष्यशरीरात अन्नाबरोबर प्रवेश करतो. रोगवाहक व्यक्तीने हाताळलेल्या अन्नपाण्यातून, दूषित पदार्थांवर बसलेल्या माश्यांमुळे अथवा दूषित पाण्यामुळे या रोगाचा प्रसार होतो. वर्धी अमीबा जठरातील हायड्रोक्लोरिक अम्‍लाने नाश पावतो, पण पुटकावस्थेतील अमीबावर त्या अम्‍लाचा परिणाम होत नसल्यामुळे त्याचा नाश न होता तो लहान आतड्यात जातो व तेथे त्याच्यापासून आठ वर्धी अमीबे तयार होऊन ते मोठ्या आतड्याच्या पहिल्या भागात जातात. तेथील श्लेष्मकलेचा (आतड्याच्या आतील बाजूच्या नाजूक थराचा) भेद करून ते अधःश्लेष्मल (श्लेष्मकलेखालील) थरात प्रवेश करतात. तेथे त्यांचे प्रजनन (वर्धन आणि प्रजोत्पत्ती) होते. त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या विषामुळे तेथील कोशिकांचा अपकर्ष (ऱ्हास) होऊन त्या ठिकाणी आतड्यात व्रण उत्पन्न होतो. या व्रणाचे तोंड लहान असून तळात मात्र त्याची व्याप्ती बरीच जास्त असते.

अधःश्लेष्मल थरातील रक्तवाहिन्यांच्या मार्गाने हे अमीबे यकृतात प्रवेश करून तेथेही यकृतकोशिकांचा अपकर्ष करतात व त्यामुळे यकृतात विद्रधी उत्पन्न होतो. सर्वसाधारण रक्तप्रवाहात प्रवेश मिळाल्यास अमीबा शरीरातील इतर ठिकाणीही विद्रधी उत्पन्न करू शकतात. अशा तऱ्हेने मेंदू, फुप्फुस व प्लीहा या अंतस्त्यांमध्येही क्वचित विद्रधी उत्पन्न होऊ शकतात.

लक्षणे : अमीबाचा संसर्ग झाल्यापासून लक्षणे दिसू लागण्याचा परिपाक काल दहा ते नव्वद दिवस असतो. रोगाची भावना हळूहळू होते. पोटात मुरडून वारंवार रक्तमिश्रित व आवमिश्रित मलोत्सर्ग होतो. काही काळाने ही लक्षणे आपोआप कमी होतात व पुनः केव्हातरी उपस्थित होतात. मध्यंतरी अशक्तता, अरुची, पोटात उजव्या बाजूस दुखणे, यकृतवृद्धी वगैरे लक्षणे दिसू लागतात.

क्वचित होणाऱ्या आशुकारी प्रकारात थंडी भरून ताप येतो. रक्त- व आव-मिश्रित अतिसार व पोटात तीव्र मुरडा ही लक्षणे दिसतात.

चिरकारी अमीबाजन्य विकारामध्ये उंडुकात (मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागात) कणार्बुद (समान रचना व कार्य असलेल्या शरीराच्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या दाण्यासारख्या समूहाच्या –ऊतकाच्या– वाढीमुळे निर्माण झालेली गाठ) झाल्यामुळे गाठ लागते व त्यामुळे आतड्याचा रोध, रक्ती  आव वगैरे लक्षणे कर्करोगासारखीच दिसतात व त्यामुळे निदान कठीण होते.

यकृतात विद्रधी झाल्यास थंडी भरून ताप येतो. यकृतवृद्धी होते, यकृतात दुखते. वारंवार ताप आल्यामुळे अशक्तंता वगैरे लक्षणे होतात. हा यकृतातील विद्रधी क्वचित वर फुप्फुसात किंवा खाली पर्युदरात (पोटातील इंद्रियांवरील आवरणात,  → पर्युदर) फुटून त्या त्या ठिकाणी तीव्र लक्षणे दिसून येतात.

हा रोग चिरकारी असून तो कित्येक वर्षे राहू शकतो व त्यावेळी लक्षणे असतातच असे नाही पण अशा व्यक्ती रोगवाहक बनतात.

चिकित्सा : एमेटीन, डाय-आयोडोक्विन, सोमल, क्लोरोक्विन वगैरे औषधांचा चांगला गुण येतो. प्रतिजैव औषधांपैकी [→प्रतिजैव पदार्थ] टेरामायसीनही गुणकारी आहे. ही औषधे पुष्कळ दिवस घ्यावी लागतात. चिरकारी प्रकारात बिस्मथाचा व कुड्याच्या पाळाचा उपयोग होतो. 

यकृताच्या विद्रधीच्या बाबतीत शस्त्रक्रिया करून विद्रधीतील पू काढून टाकतात व वरील औषधे देतात.

पहा : आमांश.

  ढमढेरे, वा. रा.