अमरकंटक : मध्य प्रदेश राज्याच्या शहडोल जिल्ह्यातील पवित्र स्थल. हे विंध्य आणि सातपुडा यांना जोडणाऱ्या मैकल पर्वतराजीच्या पूर्व टोकाला समुद्रसपाटीपासून १,१७८ मी. उंचीवर आहे. नर्मदा आणि शोण नद्यांचा उगम येथून झालेला आहे. काही विद्वानांच्या मते अमरकंटकचा पहाड हा कालिदासाच्या मेघदूतातला आम्रकूट आहे, तर परंपरागत समजुतीनुसार येथे रोवलेल्या महादेवाच्या त्रिशूलप्रतीक-कंटकावरून हे स्थलनाम पडले आहे. पवित्र क्षेत्र म्हणून याचे उल्लेख मत्स्य, पद्म व वायु पुराणांत आहेत.जगन्नाथपुरीच्या यात्रेला जाताना किंवा येताना या क्षेत्राला भेट देण्याचा प्रघात आहे. येथे नर्मदेच्या उगमाची धार एका कुंडातून निघून ३ किमी. वाहिल्यावर २५ मी. उंचीवरून ‘कपिलधारा’ म्हणूनखाली पडते. येथील नर्मदामंदिर बरेच पुरातन आहे पण त्यावरील चुन्याच्या पुटांमुळे त्याचा काल निश्चित होत नाही. उगमाच्या आसपास जलेश्वर, शोणमुंड, भीमपादुका इ. अनेक कुंडे, देवळे व स्थाने दर्शनीय आहेत. जवळचे अपूर्ण कर्णमंदिर अकराव्या शतकातील चंदेल्ल स्थापत्यशैलीचे आहे. अमरकंटक पठाराच्या परिसरात अमरकंटक-बिरसिंगपूर हे औष्णिक विद्युत्केंद्र तिसऱ्या योजनेत बांधण्यात आले त्याचे ६० मेगॅवॉट उत्पादनसामर्थ्य चौथ्या योजनेत तिप्पट करण्याचा संकल्प आहे. मध्य प्रदेश शासन या रम्य गिरिस्थानी विश्रामधाम बांधून जलविहारादी सोयी उपलब्ध करणार आहे. दक्षिणपूर्व रेल्वेच्या बिलासपूर-कटनी मार्गावरील पेंडरा रोड स्थानकापासून सडकेने ११ किमी. वर अमरकंटक आहे.
ओक, शा. नि.