सँडेज, ॲलन रेक्स : (१८ जून १९२६–१३ नोव्हेंबर २०१०). अमेरिकन ज्योतिषशास्त्रज्ञ. त्यांनी रेडिओ तरंगांचा तीव्र उद्‌गम असलेल्या व ताऱ्यासारख्या दिसणाऱ्या पहिल्या क्वासार (क्वासी-स्टेलर रेडिओ सोर्स) या खस्थ पदार्थाचा शोध लावला. हा शोध त्यांनी अमेरिकन रेडिओ ज्योतिषशास्त्रज्ञ टॉमस ए. मॅथ्यूज यांच्या सहकार्याने लावला. क्वासार हा विसाव्या शतकामधील मूलभूत महत्त्वाचा शोध असून त्याच्यामुळे नवीन प्रकारच्या ऊर्जा-उद्‌गमाचा पुरावा उपलब्ध झाला. [⟶ क्वासार].

सँडेज यांचा जन्म अमेरिकेतील आयोवा सिटी (आयोवा) येथे झाला. १९५२ साली ते कॅलिफोर्निया येथे हेल ऑब्झर्व्हेटरीज (आताच्या माउंट विल्सन अँड पॅलोमार ऑब्झर्व्हेटरीज) या प्रयोगशाळेत दाखल झाले. त्यांनी आपले बहुतेक अनुसंधान येथेच केले. त्यांनी १९५३ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची खगोल भौतिकीमधील डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांनी हॅरल्ड एल्. जॉन्सन यांच्याबरोबर अनेक ज्योतिषशास्त्रज्ञांच्या ताऱ्यांच्या उत्क्रांतीविषयीच्या सैद्घांतिक कार्याचे अनुसंधान केले. सँडेज यांनी गोलीय तारकागुच्छांतील ताऱ्यांचा अभ्यास हाती घेतला. हे तारकागुच्छ ⇨ दीर्घिकांमधील (उदा., आकाशगंगा) सर्वांत जुने खस्थ पदार्थ असल्याचे त्यांनी निश्चित केले. त्यांनी विविध गोलीय तारकागुच्छांतील सर्वाधिक तेजस्वी ताऱ्यांचा प्रकाश व रंग ह्या गुणवैशिष्ट्यांचे निरीक्षण केले. या गुणवैशिष्ट्यांद्वारे तारकागुच्छांची त्यांच्या वयोमानानुसार क्रमवार मांडणी करता येते, असे सूचित झाल्याचे सँडेज व जॉन्सन यांनी १९५२ च्या सुमारास दाखविले. या माहितीमुळे ताऱ्यांची उत्क्रांती व दीर्घिकेची संरचना समजून घेण्यास मदत झाली.

नंतर सँडेज क्वासारांच्या अध्ययनातील आघाडीवरील ज्योतिषशास्त्रज्ञ बनले. या रेडिओ उद्‌गमांच्या अचूक स्थानांची तुलना त्यांनी आकाशाच्या छायाचित्रीय नकाशांशी केली. त्यानंतर मोठा दूरदर्शक वापरून त्यांनी जेथून रेडिओ तरंगांचे तीव्र उत्सर्जन होत असते, तेथे ताऱ्यासारख्या दृश्य उद्‌गमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. १९६१ च्या सुमारास सँडेज व मॅथ्यूज या दोघांनी अशाप्रकारच्या अनेक उद्‌गमांपैकी पहिला स्रोत ओळखला. त्यांना या उद्‌गमामध्ये तीव्र जंबुपार प्रारण, अभ्रियता (अभ्रिकेसारखा धूसर भाग) व रुंद उत्सर्जन वर्णपटरेखा या सामान्य ताऱ्यात न दिसणाऱ्या गोष्टी आढळल्या. नंतर सँडेज यांनी यांसारखीच गुणवैशिष्ट्ये असलेल्या ताऱ्यांसारख्या दूरवरच्या खस्थ पदार्थांपैकी काही पदार्थ रेडिओतरंग उत्सर्जित करीत नसल्याचे शोधून काढले. अशा अनेक उद्‌गमांकडून येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता जलदपणे व अनियमित रीतीने बदलत असल्याचेही त्यांना आढळले. आकाशगंगेतील समजले जाणारे अंधुक निळसर तारे प्रत्यक्षात रेडिओ-शांत असले, तरी क्वासारासारखे आहेत, असे सँडेज यांना १९६५ साली आढळले. ते विसाव्या शतकातील एक प्रमुख खगोलवेत्ते मानले जातात. त्यांनी हबलचा स्थिरांक निश्चित करण्यासाठी केलेले कामही महत्त्वाचे मानले जाते.

एम-८२ या रेडिओ दीर्घिकेच्या केंद्रीय भागात स्फोट होत असल्याचे सँडेज यांनी पाहिले. दीर्घिकांच्या वर्णपटांतील ताम्रच्युतींवर त्यांनी संशोधन केले. यावरून दूरवर असलेल्या उद्‌गमांचा प्रसरण वेग अधिकाधिक असल्याचे उघड झाले. यांद्वारे पुन:पुन्हा आकुंचन व प्रसरण पावणारे विश्व मानणाऱ्या ‘स्पंदमान विश्वा’च्या सिद्घांताला पुष्टी मिळाली. सँडेज यांच्या अंदाजानुसार विश्वाचा हा स्पंदनकाल ७०—८० अब्ज वर्षे असावा.

सँडेज यांच्या सन्मानार्थ मंगळ व गुरु ह्यांच्या कक्षेतून सूर्याभोवती फिरणाऱ्या एका लघुग्रहाला ‘९९६३-सँडेज’ हे नाव देण्यात आले आहे.

सॅन गॅब्रिएल (कॅलिफोर्निया) येथे त्यांचे निधन झाले.

पहा : क्वासार; विश्वोत्पत्तिशास्त्र.

ठाकूर, अ. ना.