उन्नतांश

उन्नतांश : आकाशस्थ ज्योतीची क्षितिज सापेक्ष कोनात्मक उंची म्हणजे उन्नतांश होय. ही उंची निरीक्षकाचा डोळा व आकाशस्थ ज्योती यांना जोडणाऱ्या रेषेने क्षितिज पातळीशी केलेल्या कोनाने मोजतात. आकृतीत या निरीक्षकाचे उपूदप हे क्षितिज, पू ख प हे सममंडल (पूर्व बिंदू, पश्चिम बिंदू व ख-स्वस्तिक म्हणजे निरीक्षकाच्या डोक्यावर उभ्या दिशेतील खगोलावरील बिंदू यांतून जाणारे वर्तुळ) आणि हा तारा आहे. आणि ख-स्वस्तिक ख-जोडणारे बृहत्‌वृत्त (खगोलाच्या मध्यातून ज्याचा व्यास जातो असे वर्तुळ) क्षितिजास येथे छेदते. थर हे कोनात्मक अंतर म्हणजेच ∠ थ न र हा कोन ताऱ्याचा उन्नतांश होय. एखाद्या ठिकाणी ध्रुवताऱ्याचा उन्नतांश म्हणजे त्या ठिकाणचे अक्षांश होत. आकृतीत ध्रुउ किंवा ∠ध्रु न उ हा ध्रुवाचा उन्नतांश म्हणजे ठिकाणाचे अक्षांश.

आकाशस्थ ज्योतीचे स्थान निश्चित करण्यासाठी योजिण्यात येणाऱ्या क्षैतिज सहनिर्देशक पद्धतीतील उन्नतांश हा एक सहनिर्देशक आहे. उन्नतांश मोजण्यासाठी तुरीय यंत्राचा किंवा ⇨ उन्नतिदिगंशमापकाचा उपयोग करतात. अशा प्रकारे मोजलेल्या उन्नतांशात वातावरणीय प्रणमनामुळे (माध्यम बदलल्यामुळे प्रकाश किरणाच्या दिशेत होणाऱ्या बदलामुळे) होणारी चूक लक्षात घ्यावी लागते.

पहा : ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति.

मोडक, वि. वि.