सूक्ष्मदर्शक, ध्वनिकीय : द्रव्याचा पृष्ठभाग व पृष्ठभागावरील वैशिष्ट्ये किंवा घटकगुण यांच्या प्रतिमा निर्माण करण्यासाठी व द्रव्याचे प्रत्यास्थ (स्थितिस्थापक) गुणधर्म सूक्ष्ममानीय पातळीवर मोजण्यासाठी केंद्रीकरण केलेल्या ध्वनिकीय तरंगांचा वापर करण्यात येणाऱ्या वैज्ञानिक उपकरणाला ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक म्हणतात. मानवी कानांनी ओळखता येणाऱ्या हवेमधील तरंगांना सामान्यपणे ध्वनितरंग म्हणतात. तथापि, ध्वनी हा याहून अधिक व्यापक आविष्कार असून ध्वनितरंग द्रवरूप व घनरूप द्रव्यांतूनही (माध्यमांतूनही) प्रवास करतात किंवा या माध्यमांतून त्यांचे प्रसारण होते. या सर्व तरंगांसाठी ध्वनिकी ही वर्णनात्मक संज्ञा वापरतात आणि या तरंगांना ध्वनिकीय तरंग म्हणतात. प्रकाशीय तरंगांना अप्रवेश्य असलेल्या माध्यमांतूनही ध्वनिकीय तरंग प्रसारित होतात.

प्रास्ताविक : प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाने [→ सूक्ष्मदर्शक] पुष्कळशा सूक्ष्ममानीय क्षेत्रांची माहिती मिळते मात्र त्याचे क्षेत्र मर्यादित असते. म्हणजे अपारदर्शक द्रव्ये, पारभासक द्रव पदार्थ तसेच प्रकाशाचे पूर्णपणे शोषण करणारी माध्यमे यांच्या निरीक्षणासाठी प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करता येत नाही. त्यांच्या निरीक्षणासाठी ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक हे उपयुक्त साधन आहे. सूक्ष्मतरंगांच्या कंप्रतांएवढ्या म्हणजे १० ते १०११ हर्ट्‌झ एवढ्या कंप्रतांचे ध्वनिकीय तरंग ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकात वापरतात (कंप्रता म्हणजे दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांची संख्या होय). या उपकरणाच्या मदतीने वस्तूच्या प्रत्यास्थ गुणधर्मांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सूक्ष्मदर्शकीय तपशिलांना दृश्य रूप देणे शक्य होते. धातू, मृत्तिका द्रव्ये, ⇨ अर्धसंवाहकाची संकलित मंडले, बहुवारिके व जैव द्रव्ये यांच्यामधील स्थानिक प्रत्यास्थ गुणधर्मांचे प्रतिमादर्शन व मापन करण्यासाठी ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक वापरतात. कंप्रतांच्या भिन्न पल्ल्यांत भिन्न कामांसाठी ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकाचा उपयोग होतो. उदा., सजीव कोशिकांचे (पेशींचे) गुणधर्म व अंतर्गत घटक अभ्यासणे, धातूंसारख्या निरनिराळ्या द्रव्यांमधील दोष शोधून काढणे, सिलिकॉन प्रयुक्त्या बनविणे इत्यादी.

नवीन प्रकारच्या सूक्ष्मदर्शकात प्रकाशाऐवजी ध्वनितरंग वापरल्यास प्रकाशीय सूक्ष्मदर्शकावर पडणाऱ्या मर्यादांवर मात करता येऊ शकेल, असे सेंट पीटर्झबर्ग येथील इलेक्ट्रोकेमिकल इन्स्टिट्यूटमधील स्यिर्ग्येई वाय्. सोकोलोव्ह यांनी सुचविले होते. ३,००० मेगॅहर्ट्‌झ (मेगॅहर्ट्‌झ म्हणजे दहा लाख हर्ट्झ) कंप्रतांचे ध्वनितंरग वापरणाऱ्या सूक्ष्मदर्शकाची विभेदनक्षमता प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाच्या विभेदनक्षमतेएवढी असेल, हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांची ही कल्पना १९४२ च्या सुमारास विकसित झाली. मात्र यासाठी गरजेची असलेली तंत्रविद्या तेव्हा उपलब्ध नव्हती. या तंत्रविद्येच्या विकासाची सुरुवात या सैद्घांतिक कल्पनेमुळे झाली. सोकोलोव्ह यांच्या सूक्ष्मदर्शकासाठी आवश्यक असलेल्या उच्च कंप्रता⇨रडार  व संदेशवहन यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सूक्ष्मतरंग प्रणालीत आधीच वापरात होत्या. अमेरिकेत अनेक संशोधन पथकांनी या कंप्रतांचा इष्ट ध्वनिप्रणाली उभारण्यासाठी उपयोग केला. या प्रयत्नांमधून क्रमवीक्षण ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक तयार झाला.

प्रकाशाला अप्रवेश्य असलेल्या द्रव्यांमधून ध्वनितरंग जाताना कंप्रतांच्या आवर्ती गतीद्वारे ऊर्जा वाहून नेली जाते. यामध्ये एकाआड एक असलेले संकोचन व विरलीकरण प्रदेश माध्यमातून ध्वनीच्या वेगाने हलतात.

तरंगलांबी, तरंगाचा वेग व कंप्रता हे प्रचल तरंगांची गुणवैशिष्ट्ये दर्शविण्यासाठी वापरतात. या प्रचलांचे थोडक्यात वर्णन करून प्रकाशीय व ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकांमधील भेद स्पष्ट करता येतात. महासागरातील लाटांचे म्हणजे तरंगांचे निरीक्षण करून हे तीन प्रचल सहजपणे डोळ्यासमोर उभे करता येतात. लगतच्या दोन तरंगशीर्षांमधील अंतर म्हणजे तरंगलांबी, हलणाऱ्या तरंगशीर्षांची गती म्हणजे तरंगांची गती आणि तरंगशीर्षांच्या समुद्रकिनाऱ्यावरील आघातांची वारंवारता म्हणजे तरंगाची कंप्रता होय [→तरंग गति]. लगतच्या तरंगशीर्षांमधील अंतर १० मी. असून ती दर सेकंदाला १० मी. वेगाने प्रवास करीत असल्यास तरंगशीर्ष सेकंदाला १ या कंप्रतेने समुद्रकिनाऱ्यावर आदळेल. वेग १ मी. एवढा कमी केल्यास व तरंगशीर्षांमधील अंतर १० मी. एवढेच ठेवल्यास आघातांची कंप्रता सेकंदाला ०·१ एवढी कमी होईल. याचप्रमाणे ध्वनिप्रणालीत जेथे प्रकाशतरंगांच्या वेगाच्या १,००,००० गुणकाने वेग कमी केला आहे, अशा ध्वनिप्रणालीत जर ध्वनीची कंप्रता प्रकाशतरंगांच्या कंप्रतेखाली त्याच गुणकाने कमी केली, तर ध्वनिकीय तरंगलांबी प्रकाशाच्या तरंगलांबीशी तुल्य होते. ३,००० मेगॅहर्ट्‌झ कंप्रतेला कार्य करणाऱ्या ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकाचे विभेदन हे प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाच्या विभेदनाएवढे असते.

ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक वापरण्याच्या निरनिराळ्या पद्घतींमध्ये पुढील तीन प्रकारचे ध्वनिकीय तरंग वापरतात: (१) कणांची गती तरंग गतीच्या दिशेत असणारे अनुतरंग, (२) कणांची गती तरंग गतीला लंब दिशेत असलेले कर्तन तरंग आणि (३) ज्या ऊर्जा नमुना व द्रव यांच्यातील आंतरपृष्ठाला धरून (चिकटून) असते असे पृष्ठतरंग (पृष्ठतरंगाचे वर्णन प्रथम लॉर्ड रॅली यांनी एकोणिसाव्या शतकात केले होते. म्हणून त्याला रॅली तरंग असेही म्हणतात).

सामान्यतः सर्व प्रकारच्या ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकात अनुतरंग प्रामुख्याने वापरतात. यामध्ये नमुन्याच्या पृष्ठभागावरून परावर्तित झालेला ध्वनिकीय स्पंद एषण शलाकेच्या प्रत्येक स्थितीसाठी नोंदला जातो. नमुन्याचे प्रत्यास्थ गुणधर्म परावर्तित संकेताचा परमप्रसर व प्रावस्था (कला) या दोन्हींमधील फरकांद्वारे दर्शविले जातात. अस्पष्ट पृष्ठीय संरचनेमधील विरोधाभास वाढविण्याच्या दृष्टीने पृष्ठतरंग अतिशय प्रभावशाली असतात. जेव्हा भिंग नमुन्याकडे हलवून आपाती शलाकेचे विकेंद्रीकरण केले जाते, तेव्हा द्रवामधील अनुतरंग नमुन्याच्या आंतरपृष्ठावर पृष्ठतरंगांशी युग्मित होतात. या परिस्थितीत अनुतरंग व पृष्ठतरंग यांच्या तऱ्हांमधील ऊर्जेचा विनिमय (अदलाबदल) अशा प्रकारे होतो की, त्यामुळे ⇨ऊर्जापरिवर्तकाजवळ व्यतिकरण आकृतिबंध (संरचना) निर्माण होतो. हे आकृतिबंध पृष्ठभागाच्या प्रत्यास्थ गुणधर्मांत होणाऱ्या लहान बदलांना संवेदनशील असतात. म्हणजे अशा लहान बदलांनीही त्यांच्यात बदल होतो. सूक्ष्म भेगा व ओरखडे सर्वोत्कृष्ट विरोधाभासाद्वारे लक्षात येतात. 

ध्वनिकीय भिंग : (१) नमुना, (२) पाण्याचा थेंब, (३) पृष्ठतरंग, (४) ऊर्जापरिवर्तक, (५) नील स्फटिकाचे भिंग, (६) आदान, (७) प्रदान.रडार प्रणालीत रेडिओ कंप्रता ऊर्जेचे लघुस्पंद निर्माण करण्यासाठी एक तंत्रविद्या वापरतात. या तंत्रविद्येतून ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकातील इलेक्ट्रॉनीय घटक उपलब्ध झाले आहेत. रडार प्रणाली कंप्रतांच्या विस्तृत परिक्षेत्रातील कलामेलित (सुसंगत) संकेतांनी कार्यरत होते. पाण्यात ह्या कंप्रतेचे परिक्षेत्र ५ – ५,००० मेगॅहर्ट्‌झ असे विस्तृत असते. तरंगलांबीचा पल्ला ३०० – ०·३ म्यूमी (एक म्यूमी. म्हणजे एक दशलक्षांश मीटर) असा असतो. द्रवरूप हीलियम या कार्यकारी द्रायूने युक्त अशी नीच तापमानीय उपकरणे अधिक लघुतर तरंगलांबीसाठी वापरतात (सु. ११० के. पेक्षा कमी तापमानाला व एक वातावरणीय दाबाला उकळणाऱ्या द्रायूला नीच तापमानीय द्रायू म्हणतात). द्रवरूप हीलियमामधील ध्वनीचा वेग पाण्यातील त्याच्या वेगाच्या / असतो. याचा अर्थ तरंगलांबी या गुणकाने (तेवढीच) कमी होते. शिवाय ०·१ के. किंवा –४५९ फॅ. जवळच्या अतिनीच तापमानाला ध्वनीच्या पाण्यातील शोषणाहून द्रवरूप हीलियमातील ध्वनीचे शोषण कमी असते. या दोन घटकांचा उपयोग करून घेऊन १६,००० मेगॅहर्ट्‌झ कंप्रतेला चालणारा सूक्ष्मदर्शक तयार केला असून त्याचे विभेदन १५ नॅमी. आहे. (१ नॅमी. म्हणजे १०–९ मीटर).


क्रमवीक्षण ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक : यातील ध्वनिकीय भिंग सर्वांत महत्त्वाचा घटक आहे (पहा आकृती). हा घटक म्हणजे नील (सफायर) या रत्नाचा लहान दंड असतो. या दंडाच्या एका टोकाशी गोल खळगा करून त्याला पॉलिश करतात. हा खळगा भिंगाप्रमाणे कार्य करतो. दंडाच्या सपाट टोकावर दाबविद्युतीय द्रव्याचे पातळ पटल निक्षेपित केलेले असते. हे दाबविद्युतीय द्रव्य बहुधा झिंक ऑक्साइड (ZnO) असून त्याच्या पातळ पटलामधून आवर्ती विद्युत् क्षेत्र लावल्यास ते पटल आकुंचन वा प्रसरण पावते. [→ दाबविद्युत्]. अशा रीतीने पटल उच्च कंप्रता (१००–२,००० मेगॅहर्ट्‌झ) ऊर्जापरिवर्तकाचे कार्य करते. म्हणजे ते विद्युत् चुंबकीय ऊर्जेचे ध्वनिकीय ऊर्जेत परिवर्तन करते. नंतर नियतकालिक किंवा आवर्ती प्रसरणे स्फटिकातून ध्वनिकीय तरंगाच्या रूपात प्रवास करतात.

निरीक्षण करावयाचा नमुना भिंगाच्या गोल खळग्याखाली केंद्र बिंदूजवळ ठेवतात आणि भिंग व नमुना यांच्यामध्ये पाण्याचा थेंब असतो. अतिउच्च कंप्रतेच्या ऊर्जापरिवर्तकाला विद्युत् दाब वा संकेत लावतात. ऊर्जापरिवर्तकामुळे विद्युतीय संकेताचे ध्वनिकीय स्पंदांमध्ये (पृष्ठतरंगरूपात) परिवर्तन होते. हे स्पंद दंडगोलाकार दंडातून प्रसारित होऊन पुढे जातात आणि भिंगाच्या गोल खळग्यावर थडकतात. भिंग व पाणी यांच्या आंतरपृष्ठालगत ध्वनिकीय तरंग केंद्राभिमुख होऊन नमुन्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट बिंदूत केंद्रित होतात. कारण भिंगामधील (नील स्फटिकातील) ध्वनिकीय वेगापेक्षा पाण्यातील ध्वनिकीय वेग कमी असतो आणि स्फटिक-पाणी हे आंतरपृष्ठ ओलांडणाऱ्या ध्वनिकीय तरंगांचे मोठ्या कोनातून प्रणमन (वक्रीभवन) होते. या मोठ्या प्रणमनामुळे भिंगातील पृष्ठतरंगांचे पाण्यामध्ये गोलीय तरंगात रूपांतर होते. या आपाती ध्वनिकीय ऊर्जेचा भाग नमुन्याकडून परावर्तित होतो व उरलेली ऊर्जा नमुन्यात प्रसारित होते. परावर्तित संकेत परत पाण्यातून व भिंगातून प्रसारित होऊन ऊर्जापरिवर्तकापर्यंत पोहोचतो. तेथे ऊर्जापरिवर्तकाने ध्वनिकीय संकेताचे परत विद्युतीय संकेतात परिवर्तन होते. हा विद्युत् संकेत इलेक्ट्रॉनीय रीतीने विवर्धित होऊन व सांकेतिक अंकीय रूपात बदलून संगणकात साठविला जातो. भिंग नमुन्याच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत यांत्रिक रीतीने रेषा चौकटीद्वारे बिंदूमागून बिंदू असे क्रमवीक्षण करते. (रेषा चौकट हा आधीच निश्चित केलेल्या क्रमवीक्षणाच्या रेषांचा आकृतिबंध असून त्यामुळे नमुन्याचे एखादे क्षेत्र बरेच एकसारखे व्यापले जाते.) प्रत्येक स्थानाशी परावर्तित झालेला संकेताचा परमप्रसर मिळविला जाऊन संगणकाच्या दर्शक पडद्यावर ध्वनिकीय प्रतिमेच्या रूपात दिसतो. ती प्रतिमा छायाचित्रणाने फिल्मवर नोंदली जाते. यात ध्वनिकीय प्रतिमा संकेताच्या परावर्तित परमप्रसराच्या मदतीने तयार होत असल्याने याला परावर्तन क्रमवीक्षण ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक म्हणतात. अशा रीतीने या सूक्ष्मदर्शकाच्या भिंगातून बाहेर पडणाऱ्या ध्वनिकीय शलाकेच्या मदतीने नमुन्याच्या प्रत्यास्थ गुणधर्मांचे परीक्षण करतात. वरील वर्णनावरून ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकाची उपकरणयोजना (साधनसिद्घता) ही परंपरागत प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाच्या उपकरणयोजनेपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे लक्षात येईल.

ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकाच्या दुसऱ्या प्रकारच्या मांडणीत दंडगोलाकार भिंग वापरतात. त्यामुळे ध्वनिकीय ऊर्जेचे एका अरुंद रेषेत केंद्रीभवन होते. दिलेल्या दिशेला अनुसरून असलेले नमुन्याच्या पृष्ठभागांवरील घटकगुण मोजण्यासाठी आणि पृष्ठभागाच्या विषमदिक् (असमदिक्) गुणधर्मांचे वर्णन करण्यासाठी या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करतात.

वरील सूक्ष्मदर्शकात पाणी हा युग्मक द्रायू वापरला आहे. यामुळे २ गिगॅहर्ट्‌झ (गिगॅहर्ट्‌झ म्हणजे १० हर्ट्झ) प्रतेला ०·५ म्यूमी. विभेदन साध्य होते. हे विभेदन प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाच्या विभेदनाशी तुल्य आहे. पाण्याऐवजी द्रवरूप हीलियम वापरून २० नॅमी. एवढे विभेदन मिळविण्यात आले आहे. ध्वनिकीय प्रतिमांमधील विरोधाभास द्रव्याच्या प्रत्यास्थ गुणधर्मांतील स्थानिक बदलांमुळे निर्माण होतो आणि या विरोधाभासाचा संबंध स्थानिक ध्वनिकीय प्रणमनांकाशी असतो. हा प्रणमनांक म्हणजे द्रव्यातील ध्वनीचा वेग आणि द्रवातील ध्वनीचा वेग यांच्यातील गुणोत्तर असते.

उपयोग : ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक अनेक कामांसाठी भिन्न कंप्रता पल्ल्यांना वापरतात. उच्चतर कंप्रतांना हा मुख्यत: पृष्ठभागांच्या प्रत्यास्थ गुणाधर्मांच्या आणि सजीव कोशिकांच्या अंतर्गत घटकांच्या अभ्यासासाठी वापरतात. ५०० मेगॅहर्ट्‌झपेक्षा कमी कंप्रतेला ध्वनिकीय ऊर्जा नमुन्यात खोलवर घुसते तेव्हा हा सूक्ष्मदर्शक पृष्ठभागाखालील संरचना उघड करण्यासाठी वापरतात. 

विविध द्रव्यांमधील दोष ओळखण्यासाठी ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक हे खास प्रभावी साधन आहे. उदा., वीजनिर्मिती करणाऱ्या सिलिकॉन प्रयुक्त्यांमध्ये उष्णता कमी करण्यासाठी धातूचे विशिष्ट प्रकारचे कुंड वापरतात. या प्रयुक्त्या डाग देण्याच्या मिश्रधातूच्या पातळ थराने उष्णताशोषक कुंडाला जोडतात. या मिश्रधातुरूप द्रव्याच्या थरांतील असमांगता व अपूर्णता यांच्यामुळे उष्णताशोषक कुंडाकडे जाणारी उष्णता कमी होते, तापमान वाढते आणि कामाचा दर्जा कमी होऊन हानी होते. मात्र ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकाने परीक्षण केल्यास या थरातील असमांगता त्याच्या प्रतिमेतील तीव्र विरोधाभासाने उघड होऊन हा दोष लक्षात येतो.

सिलिकॉन प्रयुक्त्यांची घडण करताना ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक उपयुक्त ठरतो. या प्रयुक्त्यांमध्ये पुष्कळदा सिलिकॉनाच्या पृष्ठभागावर धातू व ऑक्साइडे यांचे पटल निक्षेपित करतात. यात सिलिकॉनाचा आधारस्तर व त्याच्यावरील पटल यांच्यातील आसंजनाचे (चिकटून राहण्याच्या क्रियेचे) नियंत्रण करावे लागते. हे आसंजन सदोष असल्यास ध्वनिकीय तरंगांसाठीचा परावर्तन गुणांक वाढतो आणि अशा रीतीने सदोष भाग ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक वापरून ओळखता येतो.

ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकांचे काही महत्त्वाचे असाधारण उपयोग पुढे  दिले आहेत. पत्रित व ⇨ संमिश्र द्रव्यांच्या स्तरांमधील बंधांच्या अखंडतेचे परीक्षण वा तपासणी करणे, संमिश्र द्रव्ये बळकट करण्यासाठी वापरलेल्या काचेच्या व कार्बनाच्या तंतूंची घनता (दाटी) आणि वाटणी यांचा अभ्यास करणे, पृष्ठभागालगतच्या सूक्ष्म भेगा व पोकळ्या यांचे अस्तित्व ओळखणे आणि सूक्ष्मसंरचनाच्या बनावटीशी किंवा निर्मितीशी निगडित असणाऱ्या प्रतिविकृती (ताण) जाणून घेणे ही ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकांच्या उपयोगांची काही उदाहरणे आहेत. प्रकाशाला अपारदर्शक असलेल्या द्रव्यांच्या प्रतिमा तयार करण्यासाठी ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक वापरतात. यामुळे इलेक्ट्रॉनीय भागांसारख्या अनेक औद्योगिक वस्तूंमधील विकृती, दोष, भेगा, छिद्रे, चरे, ओरखडे इ. लक्षात येतात. द्रव्याच्या पृष्ठभागावरील व पृष्ठभागाजवळील सूक्ष्म भेगा, दोष व असमदिक् गुणधर्म ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकामुळे लक्षात येतात. पॉलिश केलेल्या व कोरण न केलेल्या धातवीय द्रव्यांमधील सूक्ष्म संरचनांचे निरीक्षण करण्यासाठी ध्वनिकीय सूक्ष्मदर्शक वापरतात. द्रव्यांच्या प्रत्यास्थ असमदिक्‌तेचे अनुसंधान करण्यासाठीही याचा उपयोग करतात. ‘श्राव्यातीत प्रेरणा सूक्ष्मदर्शक’ या नवीन प्रकारच्या ध्वनिकीय सूक्ष्मदर्शकामुळे द्रव्याच्या दृढतेसारख्या प्रत्यास्थ गुणधर्मांच्या नॅनोमीटरइतके अतिसूक्ष्म विभेदन दर्शविणाऱ्या प्रतिमा मिळविणे शक्य झाले आहे.

पहा : इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक ध्वनि ध्वनिकी भिंग विभेदनक्षमता शास्त्रीय उपकरणे श्राव्यातीत ध्वनिकी सूक्ष्मदर्शक.

संदर्भ : 1. Bradbury, S. The Evolution of the Microscope, 1967.

            2. Briggs, A. Acoustic Microscopy, 1992.

            3. Briggs, A. Advances in Acoustic Microscopy, Vol I, 1995.

            4. Briggs, A. Arnold, W. Advances in Acoustic Microscopy, Vol. 2, 1996.

            5. Khuri-Yakub, B. T. Quate, C. F., Eds., Selected Papers in Scanning Acoustic Microscopy, 1992.

            6. Rochow, T. G. Tucker, P. An Introduction to Microscopy by Means of Light, ElectronsX-rays or Acoustics, 1994.

            7. Wade, G., Ed., Acoustic Imaging : Cameras, Microscopes, Phased Arrays and Holographic Systems, 1976.

ठाकूर, अ. ना.