सुब्रह्मण्यम्, का. ना. : (३१ जानेवारी १९१२– १९८८). आधुनिक तमिळ साहित्यिक. कथा, कविता, नाटक, अनुवाद इ. प्रकार त्यांनी हाताळले असले, तरी ते प्रामुख्याने कादंबरीकार व चोखंदळ समीक्षक म्हणून विशेष प्रसिद्घ आहेत. जन्म वळंगैमान ( जि. तंजावर) येथे. के. एस्. एन्. सामी व विशालाक्षी यांचे ते पुत्र. अन्नमलई विद्यापीठातून ते बी.ए. झाले.
त्यांनी तमिळ साहित्यात जवळजवळ सर्वच प्रकारांत विपुल व प्रचंड प्रमाणात लिखाण केले पण ते सर्वच ग्रंथरूपाने प्रकाशित झाले नाही. तरीही त्यांच्या नावावर सु. ७० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. त्यांनी ‘आर्. सत्यन्’, ‘मायन’, ‘का. ना. सु.’ अशा काही टोपणनावांनीही लेखन केले. बालपणापासूनच त्यांना अवांतर वाचनाचा छंद होता व त्यांच्या सुदैवाने त्यांचे हे वाचनवेड जोपासण्यासाठी त्यांच्या भोवतीचे वातावरण व कौटुंबिक परिस्थिती सर्वस्वी अनुकूल होती. त्यामुळे त्यांना सातत्याने पुस्तकांचा पुरवठा होत राहिला. त्यांनी वडिलांच्या इच्छेनुसार लिखाणाला सुरुवात इंग्रजीमधून केली पण पुढे मणिक्कोडी ह्या लेखकगटाच्या संपर्कात आल्यानंतर, त्या प्रभावातून ते तमिळमध्ये लिहू लागले. त्यांनी सुरुवातीला काही कथा लिहिल्या. त्यांचे तीन कथासंग्रहही प्रसिद्घ झाले : दैव जाणनम् (१९४२), अझगी अँड अदर स्टोरीज (१९४३) व अदारंगु (१९५६) मात्र कथाकार म्हणून ते फारसे स्थिरावले नाहीत. ‘मायन’ या टोपणनावाने त्यांनी काही दर्जेदार व आशयसंपन्न कविताही लिहिल्या. मायन कवितैगळ (१९७७) हा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह होय. नल्लवूर (१९५७) व औधारी ही नाटकेही त्यांनी लिहिली.
ते कादंबरीकार म्हणून विशेषत्वाने मान्यता पावले. समकालीन तमिळ साहित्यात त्यांच्या कादंबऱ्या नवी दिशा देणाऱ्या व युगप्रवर्तक ठरल्या. त्यांनी सु. वीस कादंबऱ्या लिहिल्या. त्यांत त्यांनी घाटाचे व कथनशैलीचे विविध प्रयोग केले. त्यांत कोठेही पुनरावृत्ती आढळत नाही. त्यांची पोई थेवु (१९४३, इं. शी. ‘फॉल्स गॉड्स’) ही कादंबरी आधुनिक तमिळ साहित्यात मैलाचा दगड ठरली. त्यानंतर त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून आशय, घाट व शैली ह्यांचे विविध प्रयोग केले. त्यांचे कलात्मक यश नजरेत भरणारे आहे. उदा., ओरू नाल (१९५०, इं. शी. ‘वन डे’) ह्या कादंबरीत, जेम्स जॉइसच्या यूलिसिस कादंबरीच्या धर्तीवर, एका दिवसाच्या २४ तासांतील घटना व दैनंदिन जीवन चितारताना संज्ञाप्रवाही लेखनतंत्राचा लक्षणीय वापर केला आहे. तसेच पुइत्तेक मध्ये त्यांनी मंदिरातील घंटेच्या प्रतीकाचा कलात्मक वापर केला आहे. ह्यांखेरीज सर्मविण यूयिल (१९४६), एझू पेर (१९४८), समूह चित्रम् (१९५५), पेरिया मणिथन (इं. शी. ‘अचिव्हर’), आट कोल्ली (इं. शी. ‘द मॅन किलर’), असूर गण्म (इं. शी. ‘द डेमन्स’), टॉमस वंडार, अवधूतार (१९८२) ह्या त्यांच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्या होत. अवधूतार ही आयुष्याच्या अखेरच्या पर्वात पुनश्च ऐहिक जीवनाकडे परतलेल्या एका दिगंबर संन्याशाची कहाणी आहे. टॉमस वंडार मध्ये तिरुवळ्ळुवर व सेंट टॉमस ह्यांच्यातील काल्पनिक सामना रंगवला आहे. त्यातील आध्यात्मिक तत्त्वचर्चा महत्त्वाची आहे. तिरुवळ्ळुवर याच्या ⇨ तिरुक्कुरळ ह्या अभिजात काव्यग्रंथांवर ख्रिस्ती नीतितत्त्वांचा प्रभाव जाणवतो, असे एक मत आहे. त्यामुळेच ऐतिहासिक कालक्रम दृष्ट्या अनेक शतके परस्परांपासून दूर असलेल्या ह्या दोन विभूतींना आमने सामने आणून त्यांच्यात तत्त्वचर्चा घडवण्याची कल्पना का. ना. सुब्रह्मण्यम् यांना सुचली असावी.
त्यांनी १९४० व १९५० च्या दशकांत अनेक यूरोपीय अभिजात साहित्यकृतींची तमिळमध्ये भाषांतरे केली. उदा., कनूट हामसूनचे द ग्रोथ ऑफ द सॉइल, पार लागरक्विस्टचे बाराब्बास, जॉर्ज ऑर्वेलच्या नाइन्टीन एटीफोर व ॲनिमल फार्म ह्या कादंबऱ्या इत्यादी. त्याचप्रमाणे अनेक तमिळ ग्रंथांची त्यांनी इंग्रजीत भाषांतरे केली. उदा., शिलप्पधिकारम् ह्या तमिळ अभिजात महाकाव्याचे द अँक्लेट स्टोरी (१९७८) हे इंग्रजी भाषांतर. बी. आर्. राजम् अय्यर यांच्या कमलांबाळ चरित्रम् ह्या सुरुवातीच्या काळातील तमिळ कादंबरीचाही त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. तसेच अनेक समकालीन तमिळ साहित्यकृतीही त्यांनी इंग्रजीत भाषांतरित केल्या. उदा., नीलम् पद्मनाभन् यांची तलैमुरैगळ ही कादंबरी, इंदिरा पार्थसारथी यांचे कुरुथी पुणाल इत्यादी.
१९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात ते समीक्षालेखनाकडे वळले. सुरुवातीच्या काळात पूर्वप्रस्थापित साहित्यवर्तुळात त्यांची समीक्षा वादळी व वादग्रस्त ठरली. ‘संतप्त वृद्घ तरुण’ अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली तथापि समीक्षक म्हणून त्यांनी वेगळी स्वतंत्र वाट चोखाळल्याने त्यांचे समीक्षाकार्य इतके मोलाचे ठरले, की काही काळ कादंबरीकार म्हणून लोकांना त्यांचा विसर पडला. त्यांच्या समीक्षेत त्यांनी आकार वा आकृतिबंध आणि तंत्र यांवर विशेष भर दिला. आधुनिक विश्वसाहित्यातील समीक्षामूल्यांचे भान आणि प्राचीन वैदिक काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत चालत आलेल्या पारंपरिक भारतीय विचारधारेचे संचित ह्या दोहोंत अपूर्व मेळ साधून त्यांनी खास स्वतःची अशी एकात्म समीक्षादृष्टी विकसित केली व त्यानुसार तमिळ साहित्याचे मूल्यांकन केले. त्यामुळे ते ललित लेखकापेक्षा समीक्षक म्हणून जास्त मान्यता पावले. केवळ व्यावसायिक दृष्टिकोणातून लिहिलेल्या व वाङ्मयीन मूल्यांचा अभाव असलेल्या भरताड, प्रचंड लिखाणातून त्यांनी आधुनिक तमिळ साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या वेचक, गंभीर प्रकृतीच्या साहित्यकृती निवडून, त्यांची कसोशीने दखल घेऊन मूल्यगर्भ समीक्षा केली. समीक्षक म्हणून त्यांनी केलेले हे वाङ्मयीन कार्य आधुनिक तमिळ साहित्यात फार मोलाचे ठरले. मुतल ऐंतू तमिळ नावलकळ (१९५७, इं. शी. ‘द फर्स्ट फाइव्ह तमिळ नॉव्हेल्स’) ह्या समीक्षाग्रंथात त्यांनी प्रारंभकालीन तमिळ ललित गद्याचा परिचय वाचकांना करून दिला आहे. विमर्शण कलै (१९५९, इं. शी. ‘द आर्ट ऑफ क्रिटिसिझम’) इलक्किय विचारम् (१९५९, इं. शी. ‘ओपिनियन्स ऑन लिटरेचर’) ह्या दोन समीक्षाग्रंथांत त्यांनी कलेसाठी कला ही पाश्चात्त्य साहित्यसंकल्पना आणि भारतीय वैदिक तत्त्वज्ञान यांची सांगड घालून स्वतःची सैद्घांतिक भूमिका मांडली आहे. ‘अ मूव्हमेंट फॉर लिटरेचर’ (इं. शी.) ह्या त्यांच्या समीक्षाग्रंथाला साहित्य अकादेमीचे १९८६ चे पारितोषिक मिळाले. त्यांचे साहित्यसमीक्षापर एकूण बारा ग्रंथ प्रसिद्घ आहेत. १९५० – ६० च्या दशकात गंभीरपणे वाङ्मयनिर्मिती करणाऱ्या तमिळ लेखकांची पिढी त्यांच्या समीक्षालेखनाने घडविली. त्यांच्या साहित्याच्या प्रेरणाप्रभावातून आधुनिक तमिळ साहित्याची जडणघडण बव्हंशी होत गेली असल्याचे दिसून येते.
इनामदार, श्री. दे.