सुपारी :  [पोफळी हिं. पूका, पूग, पूगी गु. सोपारी क. अडके, अडिके सं. पूगीफलम् इं. ॲरेका नट, बीटलनट पाम लॅ. ॲरेका कॅटेचू कुल-पामी (पामेसी)]. फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग]  या परिचित झाडाला व त्याच्या फळांना सामान्य भाषेत सुपारी असे नाव आहे तथापि वृक्षाला ‘पोफळी’ व फळांना ‘पोफळ’ ही नावे आहेत. फळाची कठीण साल काढल्यावर मिळणाऱ्या बीजाला ‘सुपारी’ म्हणतात. शास्त्रीय दृष्ट्या ह्या बीजातील जवळजवळ सर्वच भाग ‘पुष्क’ (गर्भाबाहेरील अन्नांश) असून प्रत्यक्ष गर्भ फारच लहान असतो [→ बीज]. मलबारमधील ‘एरेका’ ह्या सुपारीच्या नावावरुन लॅटिन प्रजातीचे ॲरेका  हे नाव व सुपारीपासून कात बनविता येतो म्हणून त्याचे कॅटेचू  हे लॅटिन गुणनाम घेतले आहे. तमिळ भाषेतील ‘ कोट्टे पाक्कू ’ या नावावरुन ‘पूका, पूग, पूगी ’ ही हिंदी नावे सुपारीला आली आहेत. ॲरेका  प्रजातीत सु. ५० जाती असून त्यांपैकी फक्त तीन सुपारी (ॲरेका कॅटेचू ) : (अ) वृक्षाचा शेंड्याकडील भाग( आ ) फुलोरा : (१) पुं-पुष्प, (२) स्त्री-पुष्प ( इ ) पुं-पुष्प (नरफूल) ( ई ) परिदल मंडल काढल्यानंतर पुं-पुष्प : (१) वंध्यकिंज ( उ) स्त्री-पुष्प( ऊ) अंडाशयाचा अनुदैर्घ्य (उभा) छेद ( ए ) फळाचा अनुदैर्घ्य छेद : (१) गर्भ, (२) पुष्क, (३) मध्यकवच.भारतात आढळतात. प्रस्तुतचे वर्णन त्यांपैकी ॲरेका कॅटेचू  या जातीचे आहे. सुपारीचे मूलस्थान मलाया असून इंडोनेशिया, म्यानमार, थायलंड, श्रीलंका, फिलिपीन्स, मॅलॅगॅसी, पू. आफ्रिका, द. भारत इ. प्रदेशांत (उष्ण व अधिक पावसाच्या प्रदेशांत) मोठ्या प्रमाणावर तिची लागवड होते. भारतात द. महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, मेघालय, गोवा, प. बंगाल, आसाम इ. राज्यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील भागांत सुपारीची लागवड आढळते. तथापि किनारपट्टीच्या आत सु. ४०० किमी. पर्यंत आणि सस.पासून ९३० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशांतही सुपारी वाढते.

वनस्पतिवर्णन : पोफळीचा वृक्ष सरळ १२–१८ मी. उंच तर त्याचा घेर ४५–५४ सेंमी. पर्यंत होतो त्याची ६–९ पाने सु. १·५५ मी. लांब, मोठी, संयुक्त व पिसासारखी (विभागलेली), फांद्या नसलेल्या पांढरट व गुळगुळीत खोडावर टोकास झुबक्याने असतात. ⇨नारळ,  ⇨ खजूर,  ⇨ शिंदी इत्यादींच्या पानांप्रमाणे याचाही तळभाग पसरट व सपाट असून तळाजवळच देठाचा भाग खोडाला काहीसा वेढून असतो. दले अनेक, लांबट व चिवट असून टोकाची दले जुळलेली असतात. फुलोरा [→ स्थूलकणिश पुष्पबंध] पानांच्या बगलेतून लोंबता असून त्यावर नौकेसारखे आवरण (महाछद) असते. एकलिंगी पिवळसर फुले डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये येतात पुं-पुष्पे अनेक, लहान व फुलोऱ्याच्या दांड्यावर वरच्या बाजूस आणि स्त्री-पुष्पे कमी, मोठी व खालच्या बाजूस येतात याला नऊ महिन्यांनी फळे लागतात. पोफळ (अश्मगर्भी अथवा आठळीयुक्त फळ) सूत्रल (तंतुयुक्त) व लहान, ३·५– ५ सेंमी. व्यासाचे व ५–८ सेंमी. लांब असते त्याच्या कठीण कवचात एकच बी असते पूर्ण पिकलेली पोफळे नारिंगी रंगाची असतात व त्यांवर परिदले तळाशी असतात. बी (सुपारी) कठीण गर्भ फार लहान पुष्क विपुल व अनेक रेषांनी भरलेला असतो. फुलांची संरचना व वनस्पतीची इतर शारीरिक लक्षणे ⇨पामी  अथवा पामेसी कुलात (किंवा ताल कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. लागवड केल्यापासून सु. ५ वर्षांनंतर फळे येतात व पुढे ५५ वर्षांपर्यंत ती उपलब्ध होत राहतात एका वृक्षापासून वर्षाला सु. ३०० फळे मिळतात परंतु याबाबत स्थानपरत्वे बरेच फरक आढळतात. सुपारीच्या वृक्षाला पक्वता येण्यास सु. ३० वर्षे लागतात व पुढे ३०– ६० वर्षांपर्यंत सुपारीचे उत्पादन मिळत राहते, असे आढळून आले आहे. एकूण वृक्षाचा आयुःकाल शंभर वर्षांपर्यंत असू शकतो.

सामान्य माहिती : पोफळे व सुपाऱ्या यांच्या रुपात व आकारमानात बरेच फरक आढळतात. तसेच त्यांचा स्तंभकपणा ( आकुंचन करण्याची क्षमता ) व कठीणपणा यांतही विविधता आढळते. हवामान व जमीन यांतील फरकांमुळे त्यांच्या चवीत व काही गुणधर्मांत ( आकारमान, रंग इ.) फरक पडतात. पोफळांवर किंवा सुपारीवर (खाली दिल्याप्रमाणे ) केल्या जाणाऱ्या संस्कारानंतर सुपारीच्या आकारातही काही फरक होतात. तळाशी गोलसर, शेंड्याकडे सपाट, त्यावर मध्यवर्ती खाच व मध्यम प्रकारची जाडी अशी लक्षणे असलेली सुपारी व्यापारी दृष्टया उत्तम समजतात. तिचा व्यास साधारणपणे २·५–३·८ सेंमी. असून रंग करडा तपकिरी असतो. सुपारी खाद्य असून तांबूलातील (विड्यातील) प्रमुख पदार्थ असते. फक्त सुपारी किंवा मसाला घालून बनविलेली सुगंधी सुपारी जेवणानंतर ( तुकडे, पूड इ. ) मुखशुद्घीकरिता खातात. त्यामुळे लाळ अधिक सुटते व अन्नपचनास मदत होते. बहुसंख्य लोक सुपारी खातात. ‘राम सुपारी’, ‘श्रीवर्धनी रोठा’ इ. अनेक स्थानिक नावांनी सुपारीचे व्यापारी प्रकार ओळखले जातात.


इतिहास : अनेक प्राचीन संस्कृत ग्रंथांत तांबूलाचा उल्लेख आला असून त्यांत सुपारीची माहिती आली आहे. कौटिलीय अर्थशास्त्रा त मद्ये रोचक करण्यास विशिष्ट द्रव्ये घालीत, त्यांत सुपारीचा निर्देश आहे. सुपारी कातरण्यास वापरीत असलेला ‘अडकित्ता’ हे नाव कानडीतील अडिके यावरुन आले आहे त्याचा उल्लेख बसवपुराण  या कानडी ग्रंथात (इ. स. १३६९) केला आहे. लीळाचरित्र  ह्या महानुभावी ग्रंथात ( तेरावे शतक ) ‘पोफळफोडणा ’ असा अडकित्त्याचा वाचक शब्द आलेला आहे. इ. स. पू. ३४० मध्ये हीरॉडोटस यांनी सुपारीचे वर्णन प्रथम लिहिले असा उल्लेख आढळतो. युआन च्वांग हा चिनी प्रवासी इ. स. ६२९– ६४५ या काळात भारतात आलेला असताना, त्याला धर्मपाल बोधिसत्त्वाकडून रोजच्या शिध्यात १२० जंबीर, २० सुपाऱ्या, २० जायफळे, एक औंस कापूर व महाशाली या उत्कृष्ट तांदळाचे एक माप दिले जात असे. यावरुन सुपारीच्या पुरातनत्वासंबंधी व आवडीबद्दल कल्पना येते.

वापर : हिंदू धर्मात बहुतेक सर्व कार्यांत सुपारीचा वापर होतो. उदा., ‘ पानसुपारी ’ देण्यात आदरसत्कार व निरोप यांमधून सद्‌भावना व्यक्त होते सुपारी देऊन तोंडी करार निश्चित करण्यात येतो विधुर कनवटीला सुपारी बांधून धार्मिक कार्ये सपत्नीकाप्रमाणे करतो. सुपारी आर्तवजनक (विटाळ सुरु करणारी) व कामोत्तेजक आहे. सुपारी भाजून खाल्ल्यास मोडशी बंद होते. सुपारीची पूड रक्तमिश्रित आवेत देतात. ओली सुपारी किसून दुधाबरोबर घेतल्यास पट्टकृमी मरतात. मूत्रविकारावर सुपारी गुणकारी आहे. कटिशूलावर पोफळीच्या पानांचा रस तेलाबरोबर चोळतात. सुपारी जाळून उत्तम दंतमंजन बनवितात. सुपारीच्या लाकडापासून धनुष्ये व बर्चीच्या मुठी बनवितात. तसेच खेडोपाडी याचा वापर घरबांधणीत ( खांब, बडोदे, वासे इ. बनविण्यास ) करतात, तर पाने चिरुटाभोवती गुंडाळण्यास, काही वस्तू बांधून देण्यास व मलबारमध्ये टोप्या करण्यास वापरतात. झोपडीस अगर लहान घराला पानांचे छप्पर करतात.

रासायनिक माहिती : आरेकोलीन नावाचे फार क्रियाशील अल्कलॉइड सुपारीत असते, ते कृमिनाशक असते व त्याचा उपयोग पशुवैद्यकात होतो. ते विषारी असून त्याचा तंत्रिका तंत्रावर (मज्जासंस्थेवर) परिणाम होतो त्यामुळे आचके येतात व नंतर पक्षाघात होतो. कुत्र्यांना पट्टकृमींवर ते पोटात देतात. सुपारीत प्रतिशत प्रमाणात पाणी ३१· ३, प्रथिने ४ ·९, मेद ४· ४, कार्बोहायड्रेटे ४७·२, खनिजे १·०, कॅल्शियम ०·०५, फॉस्फरस ०·१३ व लोह १·५ मिग्रॅ./१०० ग्रॅ. असतात. ताज्या सुपारीत मादक गुण असून त्यामुळे भोवळ येते. कोवळ्या सुपारीचा रस थोड्या प्रमाणात सारक असतो. संस्कार केलेल्या सुपारीतून हे दोष नाहीसे झालेले असतात.

संस्कार-प्रक्रिया व व्यापार : सुपारीचा वापर कच्च्या अवस्थेत व तिच्यावर काही संस्कार करून करतात. पक्व फळे जमा करून त्यांची टरफले काढतात किंवा दोन तुकडे करून सुकवून टरफले अलग करतात. कधी पक्व फळे उन्हात ६-७ आठवडे सुकवून बाजारात पाठवितात. उपयोग करण्यापूर्वी ही पोफळे सोलून सुपारी घेतात. सुपारीवर प्रक्रिया केल्याने तिचा रंग, चव, टिकाऊपणा इत्यादींबाबत सुधारणा होते. ह्या प्रक्रियेत त्यातील टॅनीन व श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्य बरेच कमी होते, त्यामुळे ती नरम व नाजुक बनल्याने चघळण्यास सोपी जाते.

प्रक्रिया करण्यासाठी हिरवी दिसणारी, परंतु पाडाला आलेली फळे जमा करतात. ही प्रक्रिया ऑगस्ट ते जानेवारी या काळात तीन पाळ्यांमध्ये करतात. गोळा केलेली फळे सोलून सुपाऱ्यांचे लगेचच प्रत्येकी दोन काप करतात किंवा त्यांचे अनेक लहान तुकडे करतात. त्यानंतर हे काप वा तुकडे पाणी व आदल्या वर्षातील उकळून राहिलेला अर्क (छोगरु) यांच्या मिश्रणात दिड ते तीन तास उकळतात. ठराविक तापमानात हे काप किंवा तुकडे काहीसे खोलगट झाले की, उकळणे बंद करून झाऱ्याने बाहेर काढतात व उन्हात ६– ९ दिवस सुकवितात. दर खेपेस नवीन ताज्या सुपाऱ्या पुनःपुन्हा त्याच पाण्यात उकळून उरलेल्या अर्काचा सुकवून पुढील वर्षी उपयोग करतात. छोगरुत टॅनीन भरपूर असल्याने तो काताचा एक प्रकार मानला जातो. छोगरु न मिळाल्यास पहिल्यांदा सुपाऱ्या उकळण्याकरिता पाण्यात पिंपळ, जांभूळ व रक्तचंदन या वृक्षांची साल, कळीचा चुना व नागवेलीची पाने घालतात यांशिवाय त्यात कधी थोडे तिळाचे तेल व गूळ टाकतात त्यामुळे सुपारीला चकाकी येते. कधी टरफले न काढता फळे प्रथम पाण्यात उकळून नंतर सोलतात, काप काढतात व सुकवितात. कधी सुपारीचे अनेक पातळ काप प्रथम करून ते उकळतात आणि कधी त्यात उकळताना विशिष्ट मसाला घालतात कधी हे काप दुधात पुन्हा उकळण्यात येतात, त्यामुळे चवीत खुमासदारपणा येतो. व्यापारात तीन-चार उकळलेले प्रकार (बाटलू, चुरु, इडी इ.) वापरात असतात ‘ बाटलू ’ प्रकारात अर्धखंड ‘ चुरु ’ प्रकारात अनेक लहान खांडे  ‘इडी’ प्रकारात संपूर्ण सुपारी मिळते. पहिले दोन प्रकार महाग असून, त्यांचा खप तिसऱ्या प्रकारापेक्षा २०–२५% कमी असतो. ‘देशावर’ व ‘रामचंद्रपूर’ हे स्थानिक प्रकारही व्यापारात आहेत. कर्नाटकमध्ये प्रतवारीत तीन प्रकार करतात. त्यावेळी रंग व कठिनता लक्षात घेतली जाते. ‘हस’ हा श्रेष्ठ दर्जाचा प्रकार योग्य पक्वावस्थेतील फळांपासून बनविलेला असतो. ‘फेटन’ व ‘राजालू’ प्रकार अत्युत्तम आणि ‘चिकणी’ हा मध्यम प्रकार मानतात. कारण सुपाऱ्या काळपट व काहीशा आकसलेल्या असतात. ‘बेट्टे’ ही हलक्या प्रकारची सुपारी फिकट व अधिक कठीण असते. कारण ती कठीण पोफळापासून बनविलेली असते. फार पिकलेल्या फळांपासून केलेली सर्वांत कमी दर्जाची ‘गोटू’ सुपारी फार कठीण व भरड असून ती बाहेरील टरफलासह विकली जाते. हस व बेट्टे यांच्या किमती गोटूच्या तिप्पट असतात. भारतातील सुपारी पुरेशी न झाल्याने पूर्वी श्रीलंका व जावा येथून तिची आयात करावी लागत असे परंतु १९६८-६९ पासून आयात बंद झाली आहे. भारतातील केरळ, कर्नाटक व आसाम या तीन राज्यांत सु. ९१% सुपारीचे पीक एकवटलेले आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र व गोवा या राज्यांत सहकारी सुपारी बाजार समित्या स्थापन झालेल्या असून त्यांच्यामार्फत खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात. आता नेपाळ, केनिया, सौदी अरेबिया इ. देशांकडे सुपारीची निर्यात होते.

पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.


लागवड, मशागत व संवर्धन : भारतात सुपारीच्या लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी सु. ८० टक्के क्षेत्र भारताच्या दक्षिण भागात आढळते. उष्णतामान व पर्जन्यमान यांचा सुपारीच्या पिकावर फार परिणाम होतो. भारतामधील मलबार, कूर्ग, कोचीन, त्रावणकोर, प. बंगाल आणि आसाम भागातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी २००–३७५ सेंमी. इतके असते. तमिळनाडू राज्यातील पठारावरील प्रदेशांत व कर्नाटक आणि ओडिशा राज्यांतील सुपारीखालच्या प्रदेशांत वार्षिक पर्जन्यमान ७५–१५० सेंमी. पर्यंत असते, परंतु पाऊस नसलेल्या कोरडया दिवसांत मलबार, मलनाड इ. भागांत सुपारीच्या पिकाला पाणी द्यावे लागते. या प्रदेशांत पर्जन्यमान जरी जास्त असले, तरी पाऊस वर्षभर विभागून न पडता जून – ऑक्टोबर या मुदतीतच पडत असल्यामुळे नोव्हेंबर–मे या कोरड्या काळात सुपारीच्या झाडांना पाणी द्यावेच लागते. कधीकधी पाणी दिलेल्या बागांत पाणी जास्त झाल्यामुळे जमीन उफाळून सुपारीच्या झाडांना अपाय होण्याचा संभव असतो. तमिळनाडूच्या मेट्टापुलायम् भागातील पठाराच्या प्रदेशात वार्षिक पाऊस सरासरी ७५ सेंमी. पडत असतो तरी तो वर्षभर विभागून पडत असल्यामुळे आणि आवश्यक वाटल्यास पाणी देता येण्याची सोय असल्यामुळे त्या भागात पोफळीच्या बागा चांगल्या वाढतात. सस.पासून १,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशांत सुपारीची लागवड होऊ शकते. फार उंचीवरील प्रदेशांत सुपारीची झाडे चांगली वाढत नाहीत.

सुपारीच्या झाडांना हवामानातील अतिरेक आणि दिवसातील मोठ्या प्रमाणावर होणारा तापमानातील चढ-उतार सहन होत नाही. कडक तापमान असणाऱ्या दिवसांत सुपारीला भरपूर पाणी द्यावे लागते. पाणी दिले नाही, तर उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो. अशा प्रकारच्या प्रदेशांत झाडांना उन्हापासून अपाय होऊ नये म्हणून लागवडच दाट करतात. ज्या प्रदेशांत हवामान दमट आणि तापमान वर्षभर समतोल राहते तेथे सुपारीची झाडे चांगली वाढतात आणि उत्पन्नही उत्तम देतात. ज्या भागांत हिवाळी हंगामातील तापमान साधारण १०° से. इतके खाली उतरते आणि हवेत ओलावा कमी असतो, तेथे झाडाला पोफळे कमी लागतात तर दैनंदिन तापमान १५° – ५५° से. ते ३७° – ८०° से. मर्यादेत राहते, तेथे झाडाला भरपूर पोफळे लागतात. समद्रकिनाऱ्यापासून दूर अंतर्गत भागात सुपारीची झाडे वाढू शकतात परंतु त्यांना पोफळे फार कमी लागतात.

श्रीलंका व ईस्ट इंडीज बेटांमध्ये पाऊस भरपूर आणि वर्षभर पडत असतो. त्यामुळे तेथे सुपारीची लागवड फार चांगली होते. थंड आणि दमट हवामान मिळावे म्हणून सुपारीची झाडे केळी, नारळ, आंबा वगैरेंच्या बागांमधून लावतात. अवर्षण आणि सोसाटयाच्या वाऱ्यामुळे सुपारीच्या वाढीवर आणि उत्पन्नावर अनिष्ट परिणाम घडून येतो.

सुपारीला जमीन चांगली निचरा होणारी, परंतु पुरेशी ओल धरुन ठेवणारी असावी लागते. जांभ्या दगडाची तांबडी जमीन उत्तम समजतात. मलबार, कारवार जिल्हा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आणि प. घाटाच्या उतरणीवरील जांभ्या दगडापासून तयार झालेल्या जमिनीत सुपारीची लागवड करतात. लवणता असलेली आणि हलकी वाळवंटी जमीन सुपारीच्या लागवडीसाठी पसंत करीत नाहीत. जांभ्या दगडाची तांबडी जमीन जरी कसदार नसली, तरी तिच्यामधून पाण्याचा निचरा उत्तम होतो. कसदार मातीची उणीव भरुन काढण्यासाठी जमिनीत भरपूर खत घालतात. प. बंगाल व आसाममधील जमिनी गाळाच्या असून त्यांच्यामध्ये नायट्रोजनाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे सुपीक असतात, म्हणून सुपारीच्या लागवडीसाठी त्या उत्तम समजल्या जातात.

सुपारीच्या लागवडीसाठी जमीन तयार करण्याच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कोकणपट्टीमधील पद्घतींत फरक असतो. कर्नाटक राज्याच्या डोंगराळ भागातील दऱ्याखोऱ्यांत पाऊस जोरदार पडतो, म्हणून या पिकाची लागवड याच भागांत होते. लागवडीसाठी विशेषतः दऱ्यांच्या तळभागाकडील जमीन खोदून सपाट करून घ्यावी लागते. मात्र जमीन सपाट करून घेण्यासाठी वावही थोडा असतो. प्रयासपूर्वक १००–१८० मी. रुंदीची जमिनीची पट्टी तयार करता येते. या पट्टीची लांबी दरीच्या अवस्थेवर अवलंबून असते. या पट्टीमध्ये सुपारीची लागवड करावयाची असते. त्यासाठी पावसाळ्यात जादा पाणी काढून टाकण्यासाठी चर आणि उन्हाळ्यात लागवड केलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी तळे आणि त्यातून पाणी नेण्याकरिता पाट यांची सोय करावी लागते. तळे किंवा पाण्याचे टाके या पट्टीच्या माथ्यावर बांध घालून तयार करतात. या बांधाच्या दोन्ही टोकांकडून पाणी खाली सुपारीच्या बागेत नेण्याकरिता पाट काढतात. त्याला आडवे पोटपाट काढून पाणी सर्व बागेत खेळविता येईल, अशी व्यवस्था करतात. पावसाचे किंवा पाटाचे जास्त झालेले पाणी चरांमार्फत बागेबाहेर काढून दिले जाते. याप्रमाणे चर आणि पाण्याचे पाट काढून झाले म्हणजे या जागेचे विशिष्ट आकारमानाचे पोटविभाग निर्माण होतात. ही जमीन झाडेझुडपे काढून साफ करून तिच्यात आखणी करून ठराविक अंतरावर सुपारीची रोपे लावण्याकरिता खड्डे खणतात.

महाराष्ट्रात कोकणातील पठारी भागात पोफळीची लागवड केली जाते. तेथे कर्नाटकाच्या डोंगराळ भागातील बागेप्रमाणे चरांची जरुरी पडत नाही. लागवडीकरिता योग्य प्रकारची जमीन निवडल्यानंतर तिच्यामधील गवते, झाडझाडोरा खणून काढून ती साफ करून नांगरुन व कुळवून नरम करतात. ठराविक अंतरावर आखणी करून सुपारीची रोपे लावण्याकरिता खड्डे खणतात. हे खड्डे ६० × ६० × ६० सेंमी. आकाराचे  २४० × ३०० सेंमी. किंवा ३६० × ३६० सेंमी. अंतरावर काढतात. ते खड्डे खत-मातीने भरुन काढतात. या तयार केलेल्या जागेत सुपारीच्या रोपांना सावली आवश्यक असते म्हणून दोन रोपांमध्ये एक याप्रमाणे प्रथम केळी लावल्या जातात. केळीची लागण मे-जूनमध्ये करतात. केळीच्या लागवडीनंतर दुसऱ्या वर्षी तयार करून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये सुपारीची २-३ वर्षे वयाची रोपे सप्टेंबर महिन्यात लावतात.

वाऱ्याने सुपारीच्या झाडांचे फार नुकसान होते म्हणून नियोजित बागेला निवारा नसल्यास बागेत वारा शिरणाऱ्या बाजूला, जलद वाढणारी आणि ज्यांचा विस्तार जास्त असतो अशा प्रकारची झाडे लावून निवारा तयार करतात. नारळाच्या आणि सुरुच्या झाडांचा यासाठी चांगला उपयोग होतो. त्यांच्यामुळे वारा थोपवून धरला जातो आणि पोफळींना अपाय होत नाही. अर्थात सुपारीची रोपे लावण्याच्या आधी ही झाडे लावणे श्रेयस्कर असते.


सुपारीची रोपे गादी वाफ्यावर तयार करतात. पक्व पोफळे बी म्हणून वापरतात. बियांकरिता वापरावयाची पोफळे जुन्या तीसएक वर्षे वयाच्या, निरोगी आणि टपोरी पोफळे येणाऱ्या झाडावरुन घेतात. पूर्ण पक्व पोफळे फेब्रुवारी-मार्च महिन्यांत झाडावरुन अलगद उतरवून घेतात व तपासून निवडतात. निवडलेली पोफळे शेणमातीच्या काल्यात बुडवून काढून ३-४ दिवस वाळू देतात. नंतर मुद्दाम तयार केलेल्या गादी वाफ्यावर ( उंच वरंब्यावर ) १५–२० सेंमी. अंतरावर बेताचे खड्डे करून प्रत्येकात एक याप्रमाणे ती पोफळे थोडासाच देठाचा भाग वर दिसेल अशा बेताने मार्च-एप्रिलमध्ये लावतात व लगेच वाफ्याला पाणी देतात. काही ठिकाणी पक्व पोफळे ओल्या गवताच्या पेंढ्यात दाबून ठेवून त्यांना मोड आल्यावर ती तेथून काढून वाफ्यात लावतात. रोपांच्या वाफ्यांना नियमितपणे पाणी देतात. लावलेल्या पोफळांतून अडीच ते तीन महिन्यात कोंब निघतो. ही रोपे ८–१० महिन्यांनी काढून घेऊन दुसऱ्या वाफ्यात ४५ सेंमी. अंतरावर लावतात. ती २-३ वर्षांची झाल्यावर तेथून खणून काढून कायमच्या जागी तयार करून ठेवलेल्या खड्ड्यात लावतात. त्या खड्ड्यात फळच लावलेले असेल, तर त्याच्यामधून निघालेल्या रोपाची तेथेच जोपासना करतात परंतु सर्वसाधारणपणे रोपे लावून लागवड करण्याचा प्रघात असतो. दर हेक्टरमध्ये डोंगराळ भागात ९००–१,००० आणि पठारी भागात १,२००–३,००० पर्यंत रोपे लावतात.

सामान्यपणे सुपारीची लागवड मिश्रपीक म्हणूनच आढळते. लागवडीपासून ८–१० वर्षांत सुपारीला पोफळे येऊ लागतात. नारळ, मिऱ्याचे वेल, केळी व वेलदोडे ही पिके एकाच बागेत सुपारीबरोबर लावतात. सुपारीची झाडे ७-८ वर्षांची झाल्यानंतर मिऱ्याचे वेल लावतात व ते सुपारीवर चढवितात. रोपांना सावली मिळावी म्हणून केळी आधीपासूनच लावलेल्या असतात. क्वचित आंबे, जायफळ वगैरे झाडेही असतात. सुपारीची रोपे लावल्यानंतर त्यांना उन्हाळ्यात नियमित पाणी देतात. डोंगराळ भागात तळ्यांतील पाणी पाटाने तर पठारी भागात विहिरींचे पाणी पिकाला देतात. पिकातील तण काढून पीक स्वच्छ ठेवतात.

पावसाळ्यापूर्वी सुपारीच्या प्रत्येक झाडाला त्याच्या बुंध्यापासून ५०– ६० सेंमी. अंतरावर खोडाभोवताली १५–२० सेंमी. खोल चर काढून त्याच्यामध्ये १० किग्रॅ. शेणखत अगर शेण घालून त्यावर १० किग्रॅ. हिरवा पाला घालून तो मातीने झाकतात आणि त्याच्यावर डहाळ्यांचा ६०–९० सेंमी. जाडीचा थर रचून घातलेले खत पावसाने वाहून जाणार नाही अशी व्यवस्था करतात. काही ठिकाणी शेणखताबरोबर पाऊण किग्रॅ. लाकडाची राख आणि पाव किग्रॅ. सुपर फॉस्फेट घालून त्यावर हिरवा पाला घालून मातीने झाकतात. त्याच्यावर वरीलप्रमाणे डहाळ्याचा थर करतात. हे काम जिकिरीचे परंतु महत्त्वाचे असल्यामुळे एकाच वर्षी सबंध बागेला खत दिले जात नाही. साधारणपणे बागेचे तीन भाग करून त्यांपैकी एका भागाला एका वर्षी खत देऊन तीन वर्षांत त्या सबंध बागेला खत देण्याचे काम पूर्ण करतात. अशा प्रकारे बागेतील जमिनीवर भर पडत असल्यामुळे १०–१२ वर्षांत तिची उंची वाढते. म्हणून चर, पाण्याचे पाट वगैरेंची पुनर्रचना करावी लागते. काही ठिकाणी सुपारीच्या बुंध्याजवळची माती उकरून काढून तेथे गाळवट माती आणून घालतात. असे दर चार वर्षांनी एकदा करतात.

सुपारीच्या झाडाला ८–१० वर्षांनी फळे लागतात. वर्षातून एकदा डिसेंबर–एप्रिल या काळात प्रत्येक झाडावर महिन्याच्या अंतराने पाच शिंपटे (फुलोरे) किंवा पेंडकी येतात. शिंपटे पानाच्या बगलेतून निघते, मात्र ते प्रत्येक पानांच्या बगलेतून निघत नाही, काही विशिष्ट पानांच्या बगलेतून निघते. शिंपटे उघडून फुले उमलल्यापासून १०-११ महिन्यांत पोफळे पक्व होतात. त्यावेळी त्यांच्या टरफलाचा रंग नारिंगी बनतो. कच्चेपणी त्याचा रंग हिरवा असतो. काही शिंपटांत मादी फुलेच नसतात. त्यामुळे त्यांच्यात पोफळे धरतच नाहीत. काही जुन्या झाडांना काही काही वर्षी शिंपटेच येत नाहीत. काही शिंपटांत पोफळेच धरली जात नसल्यामुळे बागेतील झाडांवर शिंपटे पुष्कळ दिसत असली, तरी पोफळे लागलेली शिंपटे कमी सापडतात.

गरजेनुसार कच्ची किंवा पक्व पोफळे विक्रीकरिता काढून घेतात. झाडावरुन पोफळे काढून घेण्याकरिता वाकबगार माणूस लागतो. तो झाडावर चढून शिंपटातील पोफळीची चाचणी घेऊन योग्य प्रकारच्या पोफळांचे शिंपटे कापून दोरीवरुन खाली जमिनीवर सोडतो. या दोरीचे एक टोक त्याच्या हाती असते आणि दुसरे जमिनीजवळ कशाला तरी बांधून ठेवलेले असते. यामुळे शिंपटामधील पोफळे उंचावरुन खाली पडल्यामुळे इतस्ततः पसरत नाहीत किंवा त्यांना इजाही होत नाही. सुपारीची शिंपटे काढणारा सराईत माणूस एका वृक्षावर चढला म्हणजे त्यावरील शिंपटे कापून घेऊन खाली सोडतो आणि त्या वृक्षावर आपली बैठक निर्धास्तपणे करून त्याच्या जवळपास असणाऱ्या सुपारीच्या दुसऱ्या झाडांचे शेंडे आकडीने आपल्याकडे ओढून घेऊन त्यांच्यावरील शिंपटेही काढून घेतो. सुपारीचे झाड किरकोळ घेराचे आणि लवचिक, परंतु कणखर असल्यामुळे हा माणूस ज्या वृक्षावर चढलेला असतो, त्याला झोका देऊन त्याचा शेंडा दुसऱ्या वृक्षाच्या शेंडयाजवळ नेऊन झेप घेऊन त्या दुसऱ्या वृक्षाला बिलगतो व त्याच्यावरील शिंपटे काढून घेऊन खाली सोडतो. याप्रमाणे तो अनेक वृक्षे गाठून दर वृक्षाबाबत वर चढण्याचे आणि खाली उतरण्याचे श्रम आणि वेळ वाचवितो. नव्या लागवडीमधील पोफळे लागलेली वृक्षे फार उंच नसतात. त्यांची शिंपटे त्यांच्या बुंध्याजवळ जमिनीवर उभे राहून विळतीने कापून घेऊन ती खाली पसरुन धरलेल्या गोणपाटात झेलून गोळा करतात. एका दिवसात साधारण उंच असलेल्या ७०–८० पोफळींवरील शिंपटे तपासून कापून घेता येतात.

डोंगरी भागातील जोमदार वृक्षाच्या एका शिंपटात २००–२५० पोफळे असतात. पठारी भागातील वृक्षांच्या शिंपटात यापेक्षा कमी पोफळे असतात. ३० वर्षे वयाचा वृक्ष भरपूर उत्पन्न देतो. पुढेही त्यापासून ३०–५० वर्षांपर्यंत उत्पन्न मिळत राहते.  

  

कच्ची पोफळे जुलै–डिसेंबर या अवधीत आणि पक्की डिसेंबर–मार्च अगर मे–जुलै या अवधीत काढून घेतात. एका हंगामात ३-४ वेळा शिंपटे कापून घ्यावयाचे काम करावे लागते. शिंपटे वृक्षावरुन काढून घेतल्यानंतर त्यांच्यावरील पोफळे काढून घेतात.

डोंगरी भागातील एक हेक्टर क्षेत्रामधील सुपारीच्या पिकाचे उत्पन्न सरासरी १,०००–१,१०० किग्रॅ. आणि सपाट मैदानी भागातील तितक्याच क्षेत्रातील सरासरी ३५०–४०० किग्रॅ. पर्यंत येते. साधारणपणे सुपारीच्या प्रत्येक झाडापासून दरसाल अर्धा किग्रॅ. इतकी विक्रीकरिता तयार केलेली सुपारी मिळते.

गोगटे, बा. चिं.  

रोग : कोळे रोग : या रोगामध्ये पोफळे कुजून व गळून पडतात. या रोगामुळे पिकाचे फार नुकसान होते. यावर उपाय म्हणून ५:५:५ कसाचे बोर्डो मिश्रण शिंपटांवर फवारतात किंवा १·१५ किग्रॅ. पेरेनॉक्स १३६ लि. पाण्यामध्ये मिसळून शिंपटांवर फवारतात. जरुरीप्रमाणे बोर्डो मिश्रणाचा फवारा पावसाचा खंड पडल्यावर मारतात.

बांड रोग : शिंपटात पोफळे धरत नाहीत, त्यामुळे फार नुकसान होते. मादी फुले न आल्याने वांझ झालेल्या वृक्षावर हा रोग धरतो.

कीटक उपद्रवता : गेंडा भुंगा व पाने खाणारी अळी यांचा सुपारी वृक्षाला उपद्रव होतो. नारळाच्या वृक्षावरील भुंग्याप्रमाणे या कीटकांवर उपाय योजतात. ( चित्रपत्र ).

पहा : नागवेली नारळ.

पाटील, ह. चिं.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Welth of India, Raw Materials, Vol. I, Delhi, 1948.

    2. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952

   ३. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

   ४. नागपाल, र. ला. अनु. पाटील, ह. चिं. फळझाडांच्या लागवडीची तत्त्वे आणि पद्घती, मुंबई, १९६१.  

   ५. सिंह, रा. प्र. आपले वृक्ष, मुंबई, १९६६.


सुपारी (अरेका कॅटेचू)