सुझूकी, डायसेत्सु तेइतारो : (१८ ऑक्टोबर १८७० – १२ जुलै १९६६). जपानी लेखक, व्याख्याता आणि झेन ह्या जपानमधील बौद्घ धर्मपंथाचा विवेचक. जन्म उत्तर मध्य जपानमधील कानाझावा येथे. वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत स्थानिक शाळांतून त्याने शिक्षण घेतले. पुढे आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबवावे लागल्यामुळे काही वर्षे प्राथमिक शाळांमधून त्याने इंग्रजी शिकविले. १८९१ मध्ये तो टोकिओला गेला आणि आता वासेदा विद्यापीठ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला. तेथे असताना तो कामाकुरा येथील ⇨झेन पंथा-च्या मठात येऊ-जाऊ लागला. तेथील महंत (ॲबट) शकू सोयेन (१८५६– १९१९) ह्याची झालेली भेट ही त्याच्या उत्तरायुष्यात फार महत्त्वाची ठरली. शकू सोयेन ह्याच्यामुळे त्याला झेन पंथाचे पायाभूत ज्ञान मिळाले. शकू सोयेनमुळे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील एक उद्योजक आणि प्राच्यविद्याभ्यासक पॉल कॅरस (१८५२– १९१९) ह्याच्याशी सुझूकीचा परिचय झाला. आशियातील धार्मिक आणि तत्त्वज्ञानीय संहितांचे भाषांतर करण्याची कॅरसची तीव्र इच्छा होती. सुझूकी अमेरिकेत गेला (१८९७) आणि कॅरसबरोबर सहभाषांतरकार म्हणून काम करू लागला. अनेक महत्त्वाच्या बौद्घ धार्मिक संहितांची पहिली इंग्रजी भाषांतरे त्याने केली आहेत. त्यांखेरीज आउटलाइन्स ऑफ महायान बुधिझम (१९०७) हे स्वतंत्र पुस्तकही त्याने लिहिले.
सुझूकीने यूरोपमध्ये प्रवास करून चिनी बौद्घ धर्मासंबंधीची महत्त्वाची सामग्री नकलून घेतली. १९०९ मध्ये तो जपानला परतला. एका शाळेत त्याने काही वर्षे इंग्रजीचे अध्यापन केले. १९२१ मध्ये ओतानी विद्यापीठात बौद्घ तत्त्वज्ञानाच्या अध्यासनपदी त्याची नेमणूक झाली आणि ह्याच पदावरून तो निवृत्त झाला. १९११ मध्ये बिॲट्रिस अर्स्किन लेन ह्या अमेरिकन महिलेशी त्याचा विवाह झाला होता. त्याच्या ग्रंथसंपादनाच्या कामात तिने तिच्या निधनापर्यंत सहकार्य केले. १९५० पर्यंत सुझूकी जपानमध्ये होता. त्यानंतर तो न्यूयॉर्कला गेला. तेथे रॉक्फेलर प्रतिष्ठानच्या विद्यमानाने त्याने बौद्घ धर्म आणि झेन तत्त्वज्ञान ह्या विषयांवर वेगवेगळ्या विद्यापीठांतून व्याख्याने दिली. कार्ल युंग, कारेन होर्नाय (१८८५–१९५२ मानसशास्त्रज्ञ), एरिक फ्रॉम (मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक तत्त्वज्ञ), मार्टिन हायडेगर अशा विख्यात व्यक्तींशी त्याचा संबंध आलेला होता.
त्याच्या दीर्घायुष्याचा बराच काळ जपानमध्ये आणि पश्चिमी देशांत गेला. जपानी भाषेतील त्याचे संकलित साहित्य ३२ खंडांत प्रसिद्घ झालेले आहे. बौद्घ धर्माशी निगडित असलेल्या अनेक विषयांत तत्कालीन जपानी विचारवंतांचे आणि सामान्य जनांचेही स्वारस्य निर्माण होण्यास त्याचे लेखन कारणीभूत झालेले आहे तथापि ह्या लेखनाचा बराचसा भाग अद्याप अनुवादित व्हायचा आहे. ह्या लेखनात बौद्घांच्या महायान पंथाशी संबंधित असलेल्या चिनी संहितांच्या आशयाचे विश्लेषण, त्याचप्रमाणे जपानमध्ये दुर्लक्षित राहिलेला झेन भिक्षू बांकेई (१६२२–९३) ह्याच्या कार्याचे गुणग्राहक वृत्तीने केलेले मूल्यमापन ह्यांचा समावेश होतो.
त्याच्या इंग्रजी ग्रंथांत स्टडीज इन द लंकावतारसूत्र (१९३०), एसेज इन झेन बुधिझम, ॲन इंट्रोडक्शन टू झेन बुधिझम (१९३४), झेन अँड जॅपनीज कल्चर (सुधारित आवृ. १९५९) आणि द ट्रेनिंग ऑफ ए झेन बुधिस्ट मंक (१९३४) ह्यांचा समावेश होतो. ह्यांखेरीज गणदव्यूहसूत्र ह्या ग्रंथाची चिकित्सक आवृत्ती त्याने प्रसिद्घ केली. त्याचे इंग्रजी ग्रंथ, यूरोप-अमेरिकेत त्याने दिलेली व्याख्याने, जगभरातल्या बौद्घ परिषदांमधील त्याचा सहभाग ह्यांमुळे बौद्घ धर्म आणि विशेषतः झेन पंथ ह्यांकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. एरव्ही हे विषय त्यांना अनोळखी राहिले असते.
गेल्या काही दशकांत जपानमध्ये सुझूकीला एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून मान्यता मिळू लागली आहे. पश्चिमी जगातील त्याच्या प्रभावाचा विचार केला तर असे दिसते, की त्याने झेन धर्मासंबंधीच्या पायाभूत संहिता इंग्रजीत उपलब्ध करून दिल्या.
टोकिओ येथे तो निधन पावला.
संदर्भ : Eliade, Mircea, Ed, The Encyclopedia of Religion, Vol. 14, New York, London, 1987.
कुलकर्णी, अ. र.