सुंग यु : (इ. स. पू. तिसरे शतक). चिनी कवी. त्याच्या जीवनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही तथापि तो हूनान प्रांतातील त्स्यू राज्यातील होता. ह्याच राज्यात ⇨त्स्यू युआन (इ. स. पू. सु. ३४३– सु. २८९) हा चीनचा श्रेष्ठ कवी जन्मला होता. काही इतिहासकारांच्या मते सुंग यू हा त्स्यू युआनचा शिष्य होता. त्या दोघांच्या कविता वाचल्या, तर त्यांची शैली, कवितांचे विषय आणि कवितांची शीर्षकेही त्यांच्यातले साम्य प्रत्ययास आणून देतात. त्स्यू युआनच्या कवितांप्रमाणेच सुंग युच्या कवितांतही कारुण्य आणि निराशावाद ओथंबलेला दिसतो. मात्र त्स्यू युआनच्या कवितेतला जोम आणि उत्कटता सुंग यूच्या कवितेत आढळत नाही. तरीही एका अभागी बुद्घिवंताचा एकाकीपणा, निराधारपणाची भावना आणि दुःख त्याच्या कवितांतून परिणामकारकतेने अभिव्यक्त होत राहते. ही अभिव्यक्ती नैराश्याने ग्रासल्यामुळे मी-लो नदीत आत्मसमर्पण करणाऱ्या त्स्यू युआनबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याकरिता आहे किंवा काय हा एक चर्चेचा प्रश्न ठरतो तथापि त्स्यू काव्यशैली म्हणून ओळखली जाणारी त्स्यू युआनची काव्यशैली चिनी कवितेत प्रतिष्ठित करण्याचे श्रेय सुंग यूला दिले जाते. उत्तरकालीन हान कवितेवर ह्या शैलीचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो.
थान, जुंग ( इं.) कुलकर्णी, अ. र. ( म.)