सीडार : या इंग्रजी नावाने सु. ७० वृक्ष ओळखले जातात. त्यांपैकी बहुतेक प्रकटबीजी ( उघडी बीजे असणाऱ्या ) व इतर १-२ आवृतबीजीपैकी ( फुलझाडांपैकी ) आहेत. ते सर्व सदापर्णी, सुगंधी, उपयुक्त व लालसर लाकडाचे असून शोभा व सावली यांकरिताही लावले जातात. खरे सीडार हे प्रकटबीज वनस्पतींपैकी (गण-कॉनिफेरेलीझ, कुल-पायनेसी ) सीड्रस प्रजातीतील शंकुमंत असून ⇨लार्च व ⇨पाइन यांच्याशी संबंधित आहेत. त्यांचा प्रसार आशिया व आफ्रिका खंडांत असून अमेरिकेतील कॅलिफोर्निया व द. संस्थाने आणि यूरोपातील उबदार ठिकाणी शोभेकरिता लावतात. सीड्रस प्रजातीत पुढील तीन प्रमुख जाती आहेत : (१) देवदारु ( सी. डेओडारा ) ही प्रसिद्घ देवदार जाती अफगाणिस्तान ते वायव्य हिमालयातील ( सस.पासून १,७०० – ३,७०० मी. उंचीवर ) जंगलांत वाढते. हे जलद वाढणारे वृक्ष भव्य व आकर्षक असून त्यांना गर्द हिरवे पल्लव काहीशा लोंबत्या फांद्या असतात. त्यांचे लाकूड दाट राळयुक्त व सुगंधी असून पाण्याने खराब होत नाही. ते टिकाऊ असून मध्यकाष्ठ वाळवीपासून सुरक्षित असते. ते लोहमार्गातील सिलिपाटांकरिता व सामान्य बांधकामांकरिता वापरतात. (२) लेबानन सीडार ( सी. लिबानी ) व (३) आफ्रिकन सीडार ( सी. अटलांटिया ) या दोन जाती व त्यांचे काही प्रकार शोभेकरिता काही ठिकाणी लावतात.

इंसेन्स सीडार ( लिबोसिड्रस डिकरेंस ) हा धुपाकरिता प्रसिद्घ असलेला मोठा वृक्ष अमेरिकेत ऑरेगन ते पश्चिम नेव्हाडा व कॅलिफोर्निया येथे आढळतो. याचे लाकूड विशेषतः पेन्सिलीकरिता वापरतात शिवाय सामान्य बांधकाम, कुंपणाचे खांब शोभा व सावली इत्यादींकरिता उपयुक्त असते. प्रकटबीज वनस्पतींपैकी टोरेया, थुजा, पाइन, पोडोकार्पस, क्युप्रेसस [→ देवदार ], जूनिपेरस [→ जूनिपर ] इ. प्रजातींतील कित्येक जातींना भिन्न विशेषणे लावून सीडार म्हणण्याचा प्रघात सामान्य भाषेत आहे. पोर्टऑर्फोर्ड सीडार [ → लॉसन सायप्रस ] हे नाव क्युप्रेसस लॉसोनियाना या अमेरिकी वृक्षाला दिलेले आढळते तो उपयुक्त लाकडासाठी प्रसिद्घ आहे. फुलझाडांपैकी मेलिएसी ( निंब ) कुलातील बॅस्टर्ड सीडार ( बकाणा निंब मेलिया ॲझॅडिराक ) व स्पॅनिश सीडार ( सिड्रेला ओडोरॅटा ) किंवा सिगारपेटी सीडार यांनाही सीडार म्हणतात. स्पॅनिश सीडारचे लाकूड टिकाऊ व सुगंधी असून वेस्ट इंडिजमध्ये कपाटे, सजावटी सामान व होड्या इत्यादींकरिता वापरतात.

परांडेकर, शं. आ.

सीडार