नगरपालिकेच्या

सिल्व्हर सिटी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यू मेक्सिको राज्यातील एक प्रसिद्घ आरोग्यधाम व पर्यटनस्थळ. लोकसंख्या १०,५४५ (२०१०). ग्रँट परगण्यात पीनोस आल्टोस पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी डेमिंग गावाच्या वायव्येस सु. ७१ किमी.वर सस.पासून १,८०८ मी. उंचीवर ते वसले आहे. स्पॅनिश वसाहतकऱ्यांनी त्याची १८७० मध्ये स्थापना केली आणि त्यास सेंट व्हिन्सेंट ऑफ द मार्श (इं. भा.) हे नाव दिले. पुढे त्याचे १८७६ मध्ये सिल्व्हर सिटी हे नामकरण झाले. त्याच्या आसमंतात खाण भूक्षेत्र असून सोने, चांदी, जस्त, तांबे, शिसे आदी खनिजांचा मुबलक साठा असून १८८० च्या दशकात हे नगर भरभराटीला आले होते. तेथील सान्ता रिता ही तांब्याची उघडी खाण इंडियनांच्या वेळेपासून कार्यान्वित आहे. त्याच्या जवळच टायरोन हे शहर तांब्याच्या खाणींचे केंद्र म्हणून फेल्प्‌स डॉज कॉर्पोरेशनने विकसित केले आहे. येथील सिंचन कृषिक्षेत्र आणि गवताळ कुरणे यांमुळे पशुपालन व शेती हे महत्त्वाचे व्यवसाय असून काही प्रमाणात लाकूड उद्योगही चालतो. वेस्टर्न न्यू मेक्सिको विद्यापीठ (१८९३) हे येथील प्रमुख स्थळ आहे. त्याच्या ईशान्येस ‘फोर्ट बेयर्ड स्टेट हॉस्पिटल’ आणि ‘गिला क्लिफ ड्‌वेलिंग्ज नॅशनल मॉन्युमेन्ट’ आहे.

लिमये, दि. ह.