सिराक्यूस –२ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्यातील एक व्यापारी व औद्योगिक शहर. ते राज्याच्या ऑनंडागा परगण्यात ऑनंडागा सरोवराच्या दक्षिण टोकास, ऑस्विगो शहराच्या नैर्ऋत्येस सु. ५३ किमी.वर वसले आहे. लोकसंख्या— शहर १,४५,१७० व महानगरीय समुच्चय ६,६२,५७७ (२०१०). सुरुवातीला येथे ऑनंडागा इंडियन आणि इरोक्वायी संघ यांचे मुख्यालय होते. साम्यूएल द शांप्लँ या फ्रेंच समन्वेषकाने १६१५ मध्ये या प्रदेशास भेट दिली. त्यानंतर पेअर एस्प्री सीयूर डी राडिसन या समन्वेषकाने १६५१ मध्ये तेथे प्रवेश केला. ख्रिस्ती मिशनरी फादर सायमन ली मॉईन याने तेथील क्षारयुक्त झऱ्यांची प्रथम १६५४ मध्ये नोंद घेतली आणि तिथे मिशन व सेंट मेरी डी गन्नेंताहनामक किल्ला बांधला (१६५५-५६) परंतु इंडियन जमातींचा प्रतिकार आणि दलदलीचा प्रदेश यांमुळे वसाहतीस अनुकूल वातावरण नव्हते. अशा परिस्थितीत इफ्रिअम वेबस्टर याने तिथे १७८६ मध्ये ऑनंडागा सरोवराच्या मुखाशी व्यापारी ठाणे स्थापन केले. ‘ऑनंडागा परगण्याचा जनक’ अशी उपाधी प्राप्त झालेल्या एसा डॅनफोर्थने त्याजागी लाकडाची वखार व दळणाची गिरणी सुरु केली (१७८८). इंडियनांबरोबर झालेल्या तहाने न्यूयॉर्क राज्याचे नियंत्रण येथील क्षारयुक्त झऱ्यांवर प्रस्थापित झाले. पुढे १७९७ मध्ये क्षारयुक्त जमिनी भाडेपट्ट्याच्या कराराने मीठ उत्पादन करण्यासाठी खुल्या झाल्या. त्यासाठी परिसरात वेबस्टर्स लँडिंग, सालिना व गेड्झ ही तीन खेडी वसविण्यात आली. वेबस्टर्स लँडिंग येथे १८२० मध्ये डाक कार्यालयाची स्थापना करण्यात आली. तेव्हा या स्थळाला सिसिलीतील प्राचीन ग्रीक नगराचे सिराक्यूस हे नाव देण्यात आले.

ईअरी कालव्याच्या बांधकामानंतर (१८२५) नगराचा विकास झपाट्याने झाला. १८३० च्या दशकात लोहमार्ग तयार झाला. सिराक्यूसमध्ये सालिना (१८४७) व गेड्झ (१८८६) या खेड्यांचा समावेश करण्यात आला. येथून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना १८७० पर्यंत मिठाचा पुरवठा होत असे. पुढे मिठाचा उद्योग कमी झाल्यानंतर इतर अनेक उद्योग येथे सुरु झाले. औषधे, जेट एंजिने, रेडिओ, दूरदर्शन संच, लाटणी धारवा (रोलर बेअरिंग्ज), कागद, विद्युत् उपकरणे, वातानुकूलक, इलेक्ट्रॉनीय संगणक व अन्य सामग्री यांच्या निर्मितीचे कारखाने येथे आहेत. न्यूयॉर्क कृषिविभागाच्या धान्याची सिराक्यूस ही घाऊक बाजारपेठ आहे.

न्यूयॉर्क राज्याचा मेळा (जत्रा) शहरात १८४१ पासून दरवर्षी भरतो. सिराक्यूस विद्यापीठ (१८७०), ली मॉईन महाविद्यालय (१९४६), ऑनंडागा कम्युनिटी कॉलेज (१९६२), द स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क हेल्थ सायन्स सेंटर (१९५०), कॉलेज ऑफ इन्व्हाय्‌रन्मन्टल सायन्स अँड फॉरेस्ट्री (१९११) इ. शिक्षण संस्था शहरात असून द एव्हर्सन म्यूझिअम ऑफ आर्ट (१८९६) हे प्रसिद्घ कला संग्रहालय येथे आहे. ऑनंडागा इंडियन रिझर्व्हेशन शहराच्या दक्षिणेला सु. १० किमी.वर असून ऑनंडागा लेक पार्कमध्ये सॉल्ट म्यूझिअम आणि सेंट मेरी डी गन्नेंताह किल्ल्याची प्रतिकृती आहे.

निगडे, रेखा