सिरिया : सिरियन अरब रिपब्लिक. नैर्ऋत्य आशियातील एक स्वतंत्र अरब राष्ट्र. भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर या देशाचे स्थान आहे. सिरियाच्या पश्चिमेस भूमध्य समुद्र व लेबानन, दक्षिणेस इझ्राएल व जॉर्डन, पूर्वेस इराक आणि उत्तरेस तुर्कस्तान हे देश आहेत. सिरिया व तुर्कस्तान यांच्यातील सरहद्द २२ जून १९२९ रोजी झालेल्या फ्रँको-टर्किश करारानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. सिरियाचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुकमे ३२० उ. ते ३८० उ. व ३५० पू. ते ४३० पू. असा आहे. देशाचा दक्षिणोत्तर विस्तार ५०० किमी. तर पश्चिम-पूर्व विस्तार ४६७ किमी. असून क्षेत्रफळ १,८५,१७९ चौ. किमी. आहे. देशाच्या सरहद्दीची एकूण लांबी २,४१९ किमी. आहे. लोकसंख्या २,२५,३०,७४६ (२०१२ अंदाज). दमास्कस (लोकसंख्या २५,२७,०००–२००९) ही देशाची राजधानी आहे.
भूवर्णन : प्राकृतिकदृष्ट्या सिरियाचे पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे किनारपट्टीचे मैदान, पर्वतीय प्रदेश व सिरियन वाळवंट असे तीन विभाग पडतात. या प्रदेशाचा विस्तार उत्तरेस तुर्कस्तानापासून दक्षिणेस लेबाननपर्यंतच्या सु. १७७ किमी. लांबीच्या प्रदेशात झाला असून किनाऱ्यापासून अंतर्गत भागात ८ ते ३२ किमी.पर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. उत्तरेस त्याची रुंदी कमी, तर दक्षिणेस ती जास्त आहे. किनारपट्टीचे मैदान काही ठिकाणी खडकाळ सोंडींमुळे खंडित झालेले आहे. या विभागात असलेले भूमिगत पाणी आणि झरे यांवर वर्षभर सधन शेती केली जाते. त्यामुळे हा देशातील सर्वांत दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. किनारपट्टी मैदानी प्रदेशाच्या पूर्वेस समुद्र किनाऱ्याला समांतर अशा दोन खंडित स्वरुपाच्या पर्वतश्रेण्या आहेत. त्यांपैकी उत्तरेस जेबेल अन्सारिया (जेबेल अलवाईट) ही सस.पासून ६०० ते ९०० मी. उंचीची पर्वतश्रेणी असून दक्षिण भागात असलेल्या जेबेल अंश शिक किंवा अँटी लेबानन पर्वतश्रेणीची सस.पासूनची उंची १,८२९ मी. ते २,१३५ मी. यांदरम्यान आहे. या दोन पर्वतश्रेण्यांदरम्यान असलेल्या ६४ किमी. लांबीच्या घाब घळईतून ओराँटीस ही येथील प्रमुख नदी उत्तरेकडे वाहत जाते. देशाच्या नैर्ऋत्य भागात असलेले मौंट हरमान (उंची २,८१४ मी.) हे सिरियातील सर्वोच्च शिखर आहे. देशाच्या दक्षिण भागात जेबेल एद द्रुझ (उंची १,७३५ मी.) ही पर्वतश्रेणी आहे. बेसाल्ट खडक उघडे पडलेला हा जगातील विस्तृत (क्षेत्रफळ ३३,६७० चौ. किमी.) प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. जेबेल एद द्रुझच्या पश्चिमेस सुपीक हौरान जिल्हा असून त्यातील काही भाग (गोलन हाइट्स) १९६७ मध्ये इझ्राएलने काबीज केला आहे. देशाचा उर्वरित भाग सिरियन वाळवंटाच्या उंचसखल मैदानी प्रदेशाने व्यापला आहे. देशाचा पूर्व-मध्य भाग खडकाळ व रेतीयुक्त स्टेप प्रदेशाने व्यापला असून त्याची सरासरी उंची ३०० ते ५०० मी.च्या दरम्यान आढळते.
पूर्व सिरियातून वायव्य-आग्नेय दिशेस वाहणारी युफ्रेटीस ही देशातील सर्वांत महत्त्वाची नदी असून पाणीपुरवठा व जलवाहतुकीच्या दृष्टीने तिला विशेष महत्त्व आहे. तिच्यावरील जलसिंचन प्रकल्पांपैकी ईशान्य भागात बांधण्यात आलेल्या युफ्रेटीस धरणामुळे सिरियात कापूस, तृणधान्ये, फळे इ. कृषी उत्पादने घेणे शक्य झाले आहे.
सिरियाच्या हवामानात प्रादेशिक भिन्नता आढळते. सिरियाच्या बहुतांश भागाचे हवामान उष्ण व कोरडे आहे. पर्जन्यमान कमी व बाष्पीभवन जास्त होत असते. हिवाळे सौम्य असतात. पश्चिमेकडील किनारी भागात तसेच पर्वतश्रेण्यांच्या पश्चिम भागात भूमध्य सागरी प्रकारचे, तर पूर्वेकडील सिरियन वाळवंटात अतिशय शुष्क प्रकारचे हवामान आढळते. पश्चिम भागात हिवाळ्यातील सरासरी तापमान १३० से. तर उन्हाळ्यातील सरासरी तापमान २७० से. असते. पूर्व भागात हेच तापमान अनुक्रमे ५० से. व ४०० से. असते. पर्जन्यवृष्टी प्रामुख्याने हिवाळ्यात होते. केवळ भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश आणि पर्वतीय प्रदेशांच्या पश्चिम उतारावर पर्जन्यवृष्टी अधिक होते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान पश्चिम भागात ७६ ते १२७ सेंमी., स्टेप प्रदेशात ५०·८ सेंमी. तर आग्नेय भागात १२·७ सेंमी. पेक्षा कमी असते.
एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २·५ टक्के क्षेत्र अरण्याखाली आहे (२००५). जेबेल अन्सारिया पर्वतावर पाइन वृक्षांची अरण्ये, तर दक्षिण सिरियात अवर्षण परिस्थितीत टिकून राहणारी झुडुपे आढळतात. उदा., मर्टल, बॉक्सवुड, टर्पेंटाइन, जंगली ऑलिव्ह इत्यादी. स्टेप प्रदेशात विखुरलेल्या स्वरुपात हॉथार्न ही काटेरी झुडुपे आढळतात. युफ्रेटिस खोऱ्यात खजुराची झाडे, तर किनारी भागात लिंबू व संत्र्याची झाडे आढळतात. कोल्हा, लांडगा, तरस, रानडुक्कर, मृग, गझल, हरिण, सरडा, गरुड, बहिरी ससाणा, हंसक, पाणकोळी इ. प्राणी व पक्षी येथे आढळतात.
खनिज तेल हे सिरियातील सर्वांत महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. त्याशिवाय नैसर्गिक वायू, लोहखनिज, अस्फाल्ट, चुनखडक, शिसे, तांबे, अँटिमनी, निकेल, क्रोम, फॉस्फेट इत्यादींचे खनिजसाठे येथे आहेत.
इतिहास व राजकीय स्थिती : पुरातत्त्वीय उत्खननातील उपलब्ध अवशेषांवरुन या प्रदेशात अश्मयुगात व प्रागैतिहासिक काळात मानवी वस्ती होती, हे सिद्घ झाले आहे. मध्याश्म युगात नातुफियान संस्कृती (इ. स. पू. ९०००) या प्रदेशात असल्याचे पुरावे मिळाले असून हे लोक मासेमारी, शिकार व कंदमुळे गोळा करुन उदरनिर्वाह करीत. मेसोपोटेमिया संस्कृतीचाही (इ. स. पू. ५०००— १२७५) विस्तार सिरियापर्यंत होता. इ. स. पू. पंचविसाव्या शतकात येथील आलेप्पो परिसरात सेमिटिक एल्बा ही संस्कृती भरभराटीस आलेली होती. राजधानी दमास्कस हीसुद्घा जगातील सर्वांत जुन्या शहरांपैकी एक आहे. अक्कडचा राजा पहिला सारगॉन (इ. स. पू. २३३४— २२७९) याच्या कारकीर्दीत येथे अकेडियन संस्कृतीचा उदय झाला परंतु वाळवंटी प्रदेशातील भटक्या ॲमराइट्स लोकांनी इ. स. पू. २०००— १८०० या कालावधीत या संस्कृतीचा विध्वंस केला. इ. स. पू. सोळाव्या व पंधराव्या शतकांत या प्रदेशावरील स्वामित्वाबद्दल इजिप्शियन व मितानीचे हुरियन लोक यांच्यात संघर्ष झाले. इ. स. पू. चौदाव्या शतकात सिरियाचा प्रदेश हिटाइट्स आधिपत्याखाली आला. पुढे इ. स. पू. बाराव्या शतकात वेगवेगळ्या नव-हिटाइट्स राज्यांच्या प्रभावाखाली राहिला. त्यानंतर इ. स. पू. आठव्या शतकात ॲसिरियन सत्तेखाली हा प्रदेश आला. त्यांची क्यूनिफॉर्म लिपी व भाषा येथील लोकांनी आत्मसात केली. पुढे ॲसिरियन सत्ता संपुष्टात आल्यानंतर त्यावर इराणची सत्ता आली. इ. स. पू. ३३३ मध्ये मॅसिडोनियाचा जगप्रसिद्घ सम्राट अलेक्झांडर द ग्रेट याने सिरिया जिंकला. इ. स. पू. ३०१— १६४ या कालावधीत सिरियावर सिल्युसिडी राजांच्या सत्ता होत्या.
इ. स. पू. ६४ मध्ये रोमने एक प्रांत म्हणून सिरिया पॅलेस्टाइनला जोडून अँटिओक ही त्याची राजधानी केली. इ. स. ३०० पर्यंत हा रोमचा एक समृद्घ प्रांत राहिला. त्यानंतर मात्र सिरिया बायझंटिनचा एक भाग बनला. बायझंटिन काळ (इ. स. ३००— ६३४) हा सिरियाचा सुवर्णकाळ होता. इ. स. ६३४ मध्ये अरबांनी यावर स्वारी करुन त्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली. इ. स. ८७७ मध्ये ईजिप्तच्या तूलूनिड राजवंशाने सिरिया आपल्या प्रदेशाला जोडला. त्यांची सत्ता काही काळ वगळता पुढे इ. स. ९०५ पर्यंत राहिली. तेराव्या शतकात ईजिप्तच्या मॅकलूक घराण्याने सिरियाचे आमूबिद राज्य जिंकून घेतले व पुढे इ. स. १५१६ मध्ये ऑटोमनांनी सिरिया जिंकेपर्यंत यावर त्यांची सत्ता राहिली. पुढे सु. तीन शतके सिरियावर ऑटोमनांची निरंकुश सत्ता राहिली.
पहिल्या महायुद्घकाळात ऑटोमन लष्कराचा प्रमुख तळ सिरियात होता. तुर्कांनी काही सुधारणावादी अरब नेत्यांची देशद्रोही म्हणून कत्तल केली. अखेर ब्रिटिशांच्या सैन्यदलाच्या आक्रमणांनतर (ऑक्टोबर १९१८) अरबांच्या चळवळीचे पुनरुत्थान झाले. राष्ट्रसंघाने सिरियालेबाननचा कार्यभार महादेशाद्वारे फ्रान्सला दिला. (१९२०). इ. स. १९२५ मध्ये सिरियाच्या स्वातंत्र्यासाठी व राष्ट्रीय ऐक्याकरिता ‘पीपल्स पार्टी’ या पक्षाची स्थापना करण्यात आली. १९३६ मध्ये झालेल्या एका करारानुसार सिरियन प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली परंतु दुसऱ्या महायुद्घकाळात सिरियाच्या राजकीय हालचालींवर निर्बंध घालण्यात येऊन येथे ‘व्हिशी’ शासनाचा अंमल आला. तद्नंतर ब्रिटिश व फ्री फ्रेंच लष्कराने सिरियावर आक्रमण करुन त्याचा कबजा घेतला (१९४१). याचवर्षी सिरियाच्या राष्ट्रवाद्यांनी स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा केली १९४३ मध्ये निवडणुका होऊन शुकरी अल्-कुवात्ली प्रजासत्ताकाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९४४ मध्ये ग्रेट ब्रिटन व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी सिरियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. १९४६ मध्ये येथून फ्रेंच फौजा काढून घेण्यात आल्या. १७ एप्रिल १९४६ रोजी सिरिया पूर्ण स्वतंत्र झाला. अवचित सत्तांतरात (१९४९)येथील शासन उलथवून टाकण्यात आले. कर्नल आदिब शिशाक्ली याच्या कारकीर्दीत (१९४९— ५४) सिरियात वारंवार लष्करी उठाव झाले. परिणामतः १९५४ मध्ये त्याला सत्ता सोडावी लागली. त्यानंतर घटनात्मक सत्ता आली. लष्कराचे वारंवार उठाव होत. त्यामुळे मंत्रिमंडळे बदलत तथापि जमिनी, मोठ्या मालमत्ता आणि उद्योग यांचे राष्ट्रीयीकरणाचे सत्र चालू होते. दमास्कस, हॅमा, आलेप्पो आणि इतरत्र सशस्त्र उठाव झाले. ते मोडून नवीन संविधान एप्रिल १९६४ मध्ये कार्यवाहीत आले आणि बाथ पक्षाची हुकूमशाही राजवट आली. सिरियाने १९६७ मधील अरब-इझ्राएल युद्घात भाग घेतला. त्यात अरबांचा पराभव झाला. लष्कर प्रमुख हफिझ अल्-असद याने १९७० मध्ये सिरियाची सत्ता काबीज केली व १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याची बहुमताने निवड झाली. त्यानंतरची तीन दशके त्याने सत्ता उपभोगली. या कालावधीत देशाच्या दक्षिण भागात सिरियाचे इझ्राएलशी वारंवार अयशस्वी संघर्ष झाले. सिरियाचे नवीन संविधान १९७३ मध्ये अंमलात आले. त्यानुसार सिरिया हे प्रजासत्ताक समाजवादी राष्ट्र असून इस्लाम हा येथील प्रमुख धर्म आहे. सिरियाने १९७६ मध्ये लेबाननमध्ये ४०,००० सैन्य घुसविले. पुढे तीस वर्षे सिरियाचे सैन्य लेबाननमध्ये राहिले. या कालावधीत सिरियाने सातत्याने लेबाननवर कबजा मिळविण्याचे प्रयत्न केले. १९९१ मध्ये इराकने कुवैतमध्ये सैन्य घुसविले. कुवैतमधून सैन्य काढून घेण्यासंदर्भात इराकविरोधी दीर्घकाळ चाललेल्या पर्शियन आखाती युद्घात सिरियाने संयुक्त संस्थानांच्या नेतृत्वाखालील युतीला पाठिंबा दिला. २००० मध्ये अल् असद मृत्यू पावल्यानंतर, त्याचा मुलगा बशर अल्-असर सत्तेवर आला. बशरला सत्तेवर राहता यावे म्हणून तातडीने घटना दुरुस्ती करुन राष्ट्राध्यक्षांसाठीची वयोर्यादा ४० वर्षांवरुन ३४ वर्षे वयापर्यंत खाली आणली. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदासाठीचा बाथ पक्षाचा कायदेशीर पात्र उमेदवार म्हणून बशरला मान्यता देता आली. जुलै २००० मध्ये झालेल्या निवडणुकीत बशर ९७·२९ टक्के मतांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. बशरच्या कारकीर्दीतही सिरियात सातत्याने राजकीय अस्थिरता राहिली होती. बशरने हजारो राजकीय कैद्यांना मुक्त केले, प्रसारमाध्यमांवरील नियंत्रणे उठविली परंतु बाथ पक्ष आणि अल्पसंख्य व लष्कराला ही शिथिलता आवडली नाही. त्यामुळे शासनाला पूर्ववत निर्बंध घालणे भाग पडले. सिरियाचा इराकमधील अतिरेक्यांना असणारा पाठिंबा व लेबाननमध्ये असलेले सिरियन लष्कर यांमुळे २००० च्या दशकात सिरिया आंतरराष्ट्रीय समुदायापासून एकाकी पडत गेला. इस्लामी जिहादींना अतिरेकी प्रशिक्षण दिले जात असल्याच्या कारणावरुन इझ्राएलने ५ ऑक्टोबर २००३ रोजी दमास्कस जवळच्या एका ठिकाणावर बाँब हल्ला केला. २००५ मध्ये संयुक्त संस्थानांनी सिरियावर आर्थिक निर्बंध लादले तसेच संयुक्त राष्ट्रांनी लेबाननमधील सैन्य परत घेण्याबाबत सिरियावर दबाव आणला. वाढत्या दबावामुळे एप्रिल २००५ मध्ये सिरियाने लेबाननमधील लष्कर काढून घेतले. सिरियाने हमास, इस्लामिक जिहाद व हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनांच्या गटांना आश्रय दिल्याचा संशय संयुक्त संस्थाने व यूरोपीय राष्ट्रांना आहे. लष्कर व नागरी संघटना यांतील संघर्षामुळे सिरियात २०११-१२ दरम्यान प्रचंड अराजक माजले. सामाजिक स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने सिरियन शासनाने कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. जे सैनिक नागरिकांवर गोळ्या झाडण्यास नकार देतील, त्यांना देहान्ताची शिक्षा दिली जाईल, अशी वदंता प्रसृत झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्राथमिक चाचणीनुसार या संघर्षात किमान ९,००० ते ११,००० लोक मारले गेले असावेत. या अत्याचाराचा अरब लीग, अमेरिका, यूरोपीय राष्ट्रे आदींनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून अरब लीगने सिरियाचे सदस्यत्व रद्द केले आहे. अत्याचाराच्या भितीपोटी सु. १,३०,००० पेक्षा अधिक नागरिकांनी शेजारच्या जॉर्डन, इराक, लेबानन व तुर्कस्तानकडे आश्रयार्थ धाव घेतली आहे. शांततेसाठी संयुक्त राष्ट्रसंघासह अनेक पाश्चात्त्य राष्ट्रे प्रयत्नशील आहेत. भारतानेही ‘नाम’ शिखर परिषदेत (ऑगस्ट, २०१२) सिरियातील परिस्थितीवर ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
सिरियामध्ये ‘नॅशनल प्रोग्रेसिव्ह फ्रंट’ (एनपीएफ), ‘बाथ अरब सोशलिस्ट पार्टी’, ‘सिरियन अरब सोशलिस्ट युनियन’, ‘युनियन सोशलिस्ट पार्टी’, ‘अरब सोशलिस्ट पार्टी’ व ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ सिरिया’ हे प्रमुख पक्ष आहेत. देशात १४ प्रशासकीय जिल्हे आहेत. १९७३ मध्ये स्वीकारण्यात आलेल्या संविधानात सिरियाचा उल्लेख ‘सोशलिस्ट पॉप्युलर डेमॉक्रसी’ असा करण्यात आला आहे. संविधानाने राष्ट्राध्यक्षांना सर्वोच्च अधिकार दिलेले आहेत. राष्ट्राध्यक्षांची निवड सार्वत्रिक मतदानाने सात वर्षांसाठी केली जाते. राष्ट्राध्यक्ष हे लष्कराचे प्रमुख, सिरियन बाथ पार्टीचे सेक्रेटरी -जनरल आणि नॅशनल प्रोग्रेसिव्ह फ्रंटचे अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती, पंतप्रधान व शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक किंवा त्यांना बडतर्फ करणे, युद्घ किंवा आणीबाणी जाहीर करणे आणि संविधानात दुरुस्ती करण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षांना आहेत. राष्ट्राध्यक्षांनी निवडलेले मंत्रिमंडळ पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राज्य कारभार पाहते. वैधानिक अधिकार एक सदनी पीपल्स असेंब्लीकडे (मजलिस अल्-शाब) असतात. यामध्ये प्रत्यक्ष मतदानाने ४ वर्षांसाठी निवडून आलेले २५० लोकप्रतिनिधी असतात. इस्लाम हा सिरियाचा अधिकृत धर्म नसला, तरी संविधानानुसार राष्ट्राध्यक्ष हा मुस्लिम असावा लागतो. तसेच इस्लाम कायद्याला मान्यता देण्यात आली आहे. सिरियाने २०१२ मध्ये नवीन संविधान स्वीकारले आहे. सिरियात ३० महिन्यांची लष्करी सेवा पुरुषांना सक्तीची आहे. देशात एकूण ३,०७,६०० इतके सशस्त्रदल आहे. एकूण लष्करी खर्च १,२५७ द. ल. अमेरिकी डॉलर झाला आहे (२००५). उत्तर कोरियाच्या तंत्रज्ञांच्या मदतीने अणुभट्टी उभारली जात असल्याच्या संशयावरुन ६ सप्टेंबर २००७ मध्ये इझ्राएलने केलेल्या हवाई हल्ल्यात देर एझ झॉर प्रदेशातील संशयीत अणुभट्टीचा नाश केला गेला.
आर्थिक स्थिती : सिरियाची अर्थव्यवस्था कृषी, पशुपालन, व्यापार, खाणकाम व कारखानदारी यांवर आधारित अशी मिश्र स्वरुपाची आहे. देशाच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनांपैकी २३·५ टक्के उत्पादन कृषी क्षेत्रातून, २९·३ टक्के उद्योगांमधून तर ४७·१ टक्के सेवाक्षेत्रापासून मिळते (२००२). शेती हा प्रमुख व्यवसाय असून त्यात देशातील सु. एक तृतीयांश लोक गुंतलेले आहेत. १९६३ मध्ये झालेल्या जमीन सुधारणा कायद्यानुसार कमाल जमीन धारण मर्यादा सिंचित क्षेत्राची ५० हे. व बिगर जलसिंचित क्षेत्राची ८० हे. ठरविण्यात आली आहे. कृषियोग्य जमिनीचे क्षेत्र ४·६४ द. ल. हे. असून ८,१५,००० हे. कायम लागवडीखाली व १·२७ द. ल. हे. क्षेत्र जलसिंचित आहे (२००१). लागवडीखालील क्षेत्र प्रामुख्याने किनारी भागात तसेच ओराँटीस व युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यांत केंद्रित झाले आहे. जलसिंचनाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी या नद्यांचे पाणी इतरही भागाकडे वळविले जात आहे. कापूस हे येथील नगदी व परकीय चलन मिळवून देणारे पीक आहे. त्याशिवाय साखरबीट, तंबाखू, गहू, बार्ली ही पिके घेतली जातात. पर्जन्यमानातील बदलानुसार कृषी उत्पादनात फरक पडतो. २००१ मध्ये प्रमुख कृषी उत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन हजार टनांत) : गहू ४,७४५, साखरबीट १,१७५, कापूस १,०१०, सरकी ६५६, ऑलिव्ह ८६६, टोमॅटो ७३२, बटाटे ४८०, संत्री ४६५ प्रमुख कृषिमालाच्या व्यापारावर शासनाचे नियंत्रण असते. त्याचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा नागरी लोकसंख्येला अधिक होतो.
देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी दोन पंचमांश क्षेत्र कुरणांखाली आहे. देशातील पशुधन व प्राणिज उत्पादने पुढीलप्रमाणे आहेत : पशुधन (संख्या हजारांमध्ये) : मेंढ्या १३,५००, शेळ्या १,०००, गुरे ८८०, गाढवे २१७, कोंबड्या ३०,००० प्राणिज उत्पादने (उत्पादन हजार टनांत) : दूध १,७६८, मांस ३६८, अंडी १६६, चीझ ९१ (२००३). दूध, मांस व अंडी यांचे स्थानिक उत्पादन मर्यादित असल्याने त्यांची आयात करावी लागते. एकूण मत्स्योत्पादन ८,४४७ टन असून त्यांपैकी ५६ टक्के गोड्या पाण्यातील आहे (२००५). लाकूड उत्पादन ५०,००० घ. मी. आहे (२००३).
सिरियामध्ये १९५६ मध्ये पहिल्यांदा एका अमेरिकन कंपनीला खनिज तेलाचे विस्तृत साठे सापडले. खनिज तेल उत्पादन उद्योगाचे १९५९ मध्ये राष्ट्रीयीकरण होऊन १९६८ मध्ये त्याच्या व्यापारी उत्पादनास सुरुवात झाली. रशियाची मोठी मदत असलेल्या जनरल पेट्रोलियम ऑथॉरिटीच्या माध्यमातून सिरियातील खनिज तेल समन्वेषण व उत्पादनाचे नियंत्रण केले जाते. परदेशी कंपन्यांनी १९७५ पासून येथील खनिज तेल समन्वेषणास सुरुवात केली. सिरियापासून इराक व सौदी अरेबियापर्यंत तेल वाहतुकीचे नळ टाकलेले आहेत. इराकी तेल लेबाननकडे नेणारी नळवाहतूक सिरियाने १९८२ मध्ये बंद केली. ग्रीस, फ्रान्स, इटली, रशिया यांना खनिज तेलाची निर्यात केली जाते. येथील खनिज तेल २३·३ द. ल. टन व नैसर्गिक वायूचे उत्पादन ५·४ अब्ज घ. मी. इतके आहे (२००५). याशिवाय फॉस्फेट २८,८३,००० टन व जिप्सम उत्पादन ४,३२,००० टन आहे (२००४).
सिरियातील एकूण कामकरी लोकसंख्येपैकी सु. एक सप्तमांशापेक्षा कमी कामगार कारखानदारीत गुंतलेले आहेत. १९५८— ६५ या कालावधीत अनेक अवजड उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले परंतु १९७० पासून खाजगी गुंतवणुकदारांना प्रोत्साहन देण्यात आले. वस्त्रोद्योग, पीठगिरण्या, सिमेंट, साखर, साबण, तंबाखूवरील प्रकिया, चर्मोद्योग, काचनिर्मिती, प्रशीतक निर्मिती हे उद्योग येथे चालतात. देशातील औद्योगिकउत्पादने पुढीलप्रमाणे आहेत (उत्पादन हजार टनांत) : सिमेंट ५,४२८ (२००१), शेष इंधन तेल ४,५३६, ऊर्ध्वपातित इंधन तेल ४,१२३, पेट्रोल १,३३८ (२००४), खते ३०४ (२००३), वनस्पती तेल ८९, कापसाचे सूत ८३ (२००१). याशिवाय प्रशीतक १,१३,००० नग, धुलाई यंत्रे ८५,००० नग, लोकरी गालिचे २·२ द. ल. चौ. मी. (२००२) व सिगारेटी १२ अब्ज नग (२००१) अशी उत्पादने झाली. देशातील कामगार संख्या ५३,१२,००० आहे (२००५). एकूण वीजनिर्मिती ३२·०८ अब्ज किवॉ. तास असून तिचा दरडोई वापर १,७८४ किवॉ. तास आहे (२००४). खनिज तेलापासून निर्माण होणाऱ्या औष्णिक विजेचे प्रमाण सर्वाधिक आहे.
सिरियन पौंड हे सिरियाचे अधिकृत चलन आहे. सेंट्रल बँक हे चलन निर्गमित करते. १९६३ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. दमास्कस येथे २००९ मध्ये रोखे बाजार सुरु करण्यात आला. त्यावेळी फक्त सहा कंपन्यांचे शेअर नोंदविण्यात आले होते. देशात ९ खाजगी बँका आहेत. येथे मेट्रिक मापनपद्घतीचा अवलंब केला जातो. सिरियाचा व्यापार प्रतिकूल संतुलनाचा आहे. एकूण आयात मूल्य ७,०४९ द. ल. व निर्यात मूल्य ५,३८३ द. ल. अमेरिकी डॉलर इतके आहे (२००४). इटली, फ्रान्स, जपान, चीन, युक्रेन, तुर्कस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सौदी अरेबिया यांच्याशी आयात-निर्यात व्यापार चालतो. अशोधित व परिष्कृत खनिज तेल, नैसर्गिक वायू, रसायने, कापड, तयार कपडे, जिवंत प्राणी व मांस, चामडी यांची निर्यात, तर यंत्रे व यंत्रसामुग्री, रसायने व रसायन उत्पादने, खाद्यपदार्थ यांची आयात केली जाते. २००२ मध्ये १६,५८,००० पर्यटकांनी सिरियाला भेट दिली. त्यापासून १·३७ अब्ज अमेरिकी डॉलर उत्पन्न मिळाले.
सिरियात ४६,६९८ किमी. लांबीचे रस्ते (२००२) व २,४६० किमी. लांबीचे लोहमार्ग आहेत (२००१). दमास्कस येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून आलेप्पो व लॅटकिआ येथून हवाई उड्डाणे होतात. सिरियन अरब एअरलाइन्समार्फत राष्ट्रीय हवाई वाहतूक केली जाते. सर्व प्रकारच्या संदेशवहन व प्रसारमाध्यमांवर शासनाचे कडक निर्बंध आहेत. अल् बाथ हे बाथ पार्टीचे अधिकृत वृत्तपत्र आहे.
लोक व समाजजीवन : अरब हा सिरियातील प्रमुख वांशिक गट असून कुर्द, आर्मेनियन, तुर्क, सिर्कसिअन व ॲसिरियन हे अल्पसंख्य आहेत. देशातील ९० टक्के लोक इस्लाम धर्मीय असून त्यांपैकी सु. ७४ टक्के सुन्नी पंथीय आहेत. ख्रिश्चन धर्मीय सु. १० टक्के असून त्यांशिवाय अलवाइट, ट्रुझ, ज्यू व येझीदी धर्मीय लोकही येथे आढळतात. अरबी ही अधिकृत भाषा असून ९० टक्के लोक ही भाषा बोलतात. त्याशिवाय फ्रेंच, कुर्दीश, आर्मेनियन व इंग्रजी भाषाही बोलल्या जातात.
सिरियात असलेला जास्त जन्मदर आणि दोन अपत्यांमधील कमी कालांतर यांमुळे एकंदरीतच कुटुंब कल्याणावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. मृत्युमानही जास्त आहे. दर हजारी जन्मप्रमाण ३०·९, मृत्युमान ५·२ (२००१) व बालमृत्युमान १४ आहे (२००५). २००१— २०१२ या दशकातील वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर ०·७ टक्के होता. सरासरी प्रसूतिमान प्रति स्त्री ३·३ अपत्ये असे आहे (२००४). पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७२·५ वर्षे, तर स्त्रियांचे ७७·४ वर्षे आहे (२०१२). लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स १०३ व्यक्ती अशी आहे (२००३). २००३— ०७ या कालावधीत एक द. ल.पेक्षा अधिक इराकी निर्वासित सिरियामध्ये आले होते. त्यांपैकी बरेचसे २००७ च्या अखेरीस परतीच्या मार्गावर होते.
देशात ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. व्यावसायिक, शिक्षक प्रशिक्षण व विद्यापीठीय शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. देशातील १,१८० बालोद्यानांत ४,९४३ शिक्षक व १,२१,२८९ बालके ११,७०७ प्राथमिक विद्यालयांत १,२७,७१७ शिक्षक व २८,३५,०२३ विद्यार्थी ४,०२९ माध्यमिक विद्यालयांत ७०,०२० शिक्षक व १०,१०,१५७ विद्यार्थी १७ शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालयांत ७९१ शिक्षक व ८,२०४ विद्यार्थी ५९३ तंत्रशिक्षण प्रशिक्षण विद्यालयांत १६,८४९ शिक्षक व १,३९,५५१ विद्यार्थी चार विद्यापीठांत ६,९१३ अध्यापक व १,७२,८५३ विद्यार्थी आहेत (२००१). प्रौढ साक्षरतेचे प्रमाण ८२·९ टक्के आहे (२००३).
सिरियात समाजकल्याण व्यवस्था विशेष समाधानकारक नाही. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा तुटवडा, वाहित मल विल्हेवाटीची अयोग्य पद्घती आणि पिण्यायोग्य पाण्याचा तुटवडा इत्यादींमुळे वारंवार वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. देशात ४०६ रुग्णालये व त्यामध्ये १९,७१६ खाटा, १,०४६ आरोग्य केंद्रे, १८,९६५ डॉक्टर, ९,६११ दंतवैद्यक, २३,४४६ परिचारिका, ७,५३५ औषधनिर्माते व १,४४१ प्रसविका आहेत (२००१).
महत्त्वाची स्थळे : युनेस्कोने मान्यता दिलेली पुढील पाच जागतिक वारसास्थळे सिरियात आहेत : इ. स. पू. तिसऱ्या सहस्त्रकापासून अस्तित्वात असलेले जुने दमास्कस शहर व तेथील उमायीद मशीद (१९७९ च्या यादीत समाविष्ट) एकेकाळी अरेबियातील रोमन प्रांताची राजधानी व प्राचीन वाहतूक मार्गावरील थांब्याचे ठिकाण असलेले जुने बसरा शहर (१९८०) दमास्कसच्या ईशान्येस असलेले पॅल्मायरा (टॅड्मॉर) हे वाळवंटी मरुद्यान तसेच प्राचीन काळी भरभराटीस असलेल्या शहराचे येथील भग्नावशेष (१९८०) इ. स. पू. दुसऱ्या सहस्रकापासून वेगवेगळ्या व्यापारी मार्गांवरील काटरस्ता स्थानक (१९८६) आणि क्रॅकदेस चेव्हॅलिअरर्स व क्लॉलत सलह एल्-दिन (२००६). राजधानी दमास्कसशिवाय आलेप्पो (लोकसंख्या २९,८५,०५०— २००९), होम्स (१०,२०,७६०— २००९), लॅटकीआ (३,०३,०००), हम्मा (८,५४,०००— २००९), कमिशली (१,६५,०००), अर राका (१,३८,०००), देर एझ झॉर (१,३३,०००— १९९४) ही महत्त्वाची नगरे आहेत. (चित्रपत्र).
चौधरी, वसंत