सिद्धांत सूत्रपाठ : महानुभाव पंथाचा आदिग्रंथ. सूत्रसंकलक ⇨ केशवराज सूरी (? — १३१६ ?) ऊर्फ केसोबास. महानुभावपंथाचे संस्थापक ⇨ चक्रधर ( सु.११९४ — १२७४) हे त्यांच्या भ्रमंतीत अनेकांशी तात्त्विक चर्चा करीत तथापि ह्या महत्त्वपूर्ण चर्चा ग्रंथबद्ध झालेल्या नव्हत्या. पुढे श्रीचक्रधरांनी उत्तरापंथे प्रयाण केल्यानंतर ⇨ म्हाइंभटांनी लीळाचरित्र ह्या आपल्या ग्रंथात श्री चक्रधरांच्या आठवणी किंवा लीळा संकलित केल्या. ह्या आठवणींत श्रीचक्रधरांच्या मुखातून बाहेर पडलेले अनेक सूत्रबद्ध सिद्धांत आलेले आहेत. महानुभाव पंथाचे आद्याचार्य आणि संवर्धक नागदेवाचार्य (१२३६— १३०२) ह्यांच्या अनुमतीने केशवराज सूरी ह्यांनी हे सिद्धांत एकत्र केले आणि सिद्धांतसूत्रपाठ हा ग्रंथ सिद्ध केला (सु. १२८०). हा ग्रंथ महानुभाव पंथीयांच्या नित्यपाठातला आहे. ह्या ग्रंथाची अकरा प्रकरणे असून सूत्रसंख्या १,२५५ आहे. ह्यातील सर्वाधिक, म्हणजे ७८२ सूत्रे केशवराजांची आहेत. उरलेल्या सूत्रांपैकी २४० परशुराम, २१८ रामेश्वर ह्यांची व १५ इतरांची आहेत. पंथाच्या अनुयायांना उपदेश करणे, हा ह्या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे. हा ग्रंथ महानुभावांच्या सांकेतिक लिपीत बद्ध असल्यामुळे त्याची तत्कालीन मूळ भाषा जशी होती, तशीच राहिलेली आहे.
सिद्धांतसूत्रपाठातील लक्षण, आचार व विचार ह्या प्रकरणांवर ⇨ गुर्जर शिवव्यासाने सिद्धांते हरिव्यास ह्याच्या साहाय्याने लक्षणस्थळ, विचारस्थळ आणि आचारस्थळ ह्या तीन स्थळग्रंथांची बांधणी केली.
पहा : महानुभाव पंथ व साहित्य.
संदर्भ : १. खानोलकर, गं. दे. मराठी वाङ्मयकोश, खंड पहिला, मुंबई, १९७७.
२. देशपांडे, अ. ना. प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, पूर्वार्ध, पुणे, १९६६.
कुलकर्णी, अ. र.