सिद्घौषधि : उपयोगाकरिता तयार झालेली औषधी परंतु व्यवहारात विशिष्ट प्रकारच्या म्हणजे पारा, गंधक खनिजांची भस्मे व वनस्पती यांचे जे मिश्र कल्प तयार केले जातात त्या कल्पौषधींना ‘सिद्घौषधी’ म्हणतात.
औषधिसिद्घ दूध ताजे असताना तयार होताच घेतले पाहिजे. अन्यथा तासाभरातच ते बिघडते. औषधिसिद्घ तूप, तेल, अवलेह इ. एक वर्षानंतर निर्वीर्य होतात मात्र पाराघटित औषधी संरक्षित असल्याने बिघडत नाहीत. उलट त्यांपैकी बहुतेक जितक्या जुन्या तितक्या चांगल्या ठरतात.
पारा योगवाही असल्यामुळे तो त्याच्याशी मिश्र किंवा संयुक्त औषधींचे दोष घालवितो व त्यांची गुणकर्मे वाढवितो. ती कालाने निर्वीर्य न होता गुणांनी वाढतात. त्यांची मात्रा अल्प पुरते, रुचीला नावडती नसतात. ती पाऱ्यामुळे शीघ्र कार्यकारी व पार्थिव द्रव्यघटित असल्यामुळे रुग्णाला आलेले रोगनाशक गुण दीर्घकाल टिकणारे असतात. अनेक रोगांवर त्या त्या रोगाला अनुसरुन योग्य अनुपानाबरोबर एकच सिद्घौषधी देता येते.
सिद्घौषधी रसायने गुणदायी असतात. त्यामुळे पुष्कळदा असाध्य समजल्या गेलेल्या रोगांवरही गुणदायी होतात व व्यवहार दृष्ट्याही सोयीच्या असतात.
जोशी, वेणीमाधवशास्त्री