सिंहमर्कट : (इं. लायन-टेल्ड मंकी, वंडरु). पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या स्तनी वर्गातील ⇨ नरवानर गणा तील (प्रायमेट्स) सर्कोपिथेसिडी कुलातील मॅकाका या प्रजातीतील मॅ. सिलेनस या जातीच्या माकडाला ‘सिंहमर्कट’ म्हणतात. भारताच्या प. घाटात, कर्नाटकच्या दक्षिणेकडील दाट जंगलांत आणि तमिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यात सिंहमर्कट आढळतात.

 

सिंहमर्कट

सिंहमर्कट बहुधा झाडावरच राहतात व तेथेच झोपतात. ते स्वभावाने लाजाळू असल्याने घनदाट जंगलातील अगदी आतील भागात राहतात. ते आपली उपजीविका फळे, मुळे, पाने, कीटक व मृदुकाय प्राणी यांवर करतात.

सिंहमर्कटांच्या दोन्ही गालांवर व कपाळाच्या वरच्या बाजूला (चेहऱ्यावर वर्तुळाकार) करड्या ते पांढऱ्या रंगाच्या केसांचे पुष्कळ झुपके असतात. ते सिंहाच्या आयाळीसारखे दिसतात, त्यावरुन त्यांना सिंहमर्कट म्हणत असावेत. चेहरा काळ्या रंगाचा असतो. शेपटी त्याच्या संपूर्ण शरीराच्या १/२ते २/३ इतकी लांब असते व तिच्या टोकाला मऊ केसांचा झुपका असतो. शेपटी पुष्कळशी सिंहाच्या शेपटीसारखी दिसते, त्यावरुन त्यांना इंग्रजीत ‘लायन-टेल्ड मंकी’ हे नाव पडले असावे. सिंहमर्कट दणकट व आकाराने मोठे असतात. शरीराची लांबी ५०— ६० सेंमी. असते. ते बहुधा कळप करुन राहतात. कळपात १२ — २० किंवा त्यापेक्षा जास्त प्राणी असतात. मादी नरापेक्षा आकाराने लहान असते. सिंहमर्कट दिनचर असतात. यांचा विणीचा हंगाम वर्षभर असतो. मादी माजावर येते त्यावेळी जननेंद्रियाच्या आसपासची कातडी लालसर दिसते. गर्भावधी सु. साडेसात महिन्यांचा असून एकावेळी एकच पिलू जन्माला येते. प्राणिसंग्रहालयात ठेवलेल्या सिंहमर्कटाचे आयुष्मान सरासरी १७ वर्षे असते, असे आढळून आले आहे.

चिन्मुळगुंद, वासंती रा.