सिंह – १ : (लिओ). भारतीय राशिचक्रातील पाचवी रास. या राशीत ⇨ मघा व ⇨ पूर्वा ही नक्षत्रे आणि ⇨ उत्तरा नक्षत्राचा पहिला चरण अशा सव्वादोन नक्षत्रांचा समावेश होतो. या तारकासमूहाची स्थूल प्रतिमा सिंहाच्या आकृतीसारखी असल्याने राशीला त्या अर्थाचे सिंह हे नाव पडले. ह्या राशीची व्याप्ती होरा ९ ता. १८ मि. ते १५ ता. ५६ मि. आणि क्रांती –६० ४′ ते + ३३० ३′ या मर्यादेत आहे [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्घति]. मघा नक्षत्रातील आल्फा, गॅमा, ईटा, झीटा, म्यू आणि एप्सायलॉन लिओनीस या सहा ताऱ्यांचा नांगर, विळा किंवा सिंहाच्या डोक्यासारखा आकार असून उत्तरा नक्षत्रातील बीटा लिओनीस आणि पूर्वा नक्षत्रातील डेल्टा व थीटा लिओनीस या तीन ताऱ्यांनी सिंहाचा पार्श्वभाग (त्रिकोण) तयार होतो. या सर्व नऊ ताऱ्यांचा मिळून सिंहासारखा आकार होतो.
सदर तारकासमूह १५ एप्रिलच्या सुमारास रात्री ९ वाजता मध्यमंडलावर येतो. याच्या बरोबर उत्तरेस सप्तर्षीचे ध्रुवदर्शक दोन तारे आहेत. विळ्याच्या मध्यभागाच्या एका बिंदूतून ११ ते २० नोव्हेंबरच्या दरम्यान उल्कावर्षाव होतो. या वर्षावास किंवा उल्काप्रवाहास लिओनीड उल्कावृष्टी म्हणतात. सिंह राशीतील आल्फा, बीटा व गॅमा हे द्वित्त तारे आहेत. या राशीत सूर्य १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान असतो.
फलज्योतिषानुसार या राशीचा स्वामी रवी (सूर्य) असून ही राशी पुरुष, स्थिर, अग्नितत्त्व व अल्पप्रसव मानतात. हृदय, रक्ताभिसरण, पाठीचा कणा इ. अवयवांवर हिचा अंमल चालतो, असे समजतात.
पहा : राशिचक्र.
ठाकूर, अ. ना.