सिंह, कालिप्रसन्न : (२३ फेबुवारी १८४०–२४ जुलै १८७६). प्रख्यात बंगाली लेखक, साहित्यसेवक व समाजसुधारक. कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता) येथे जन्म. हिंदू कॉलेजमध्ये त्यांनी काही काळ शिक्षण घेतले तथापि इंग्रजी, संस्कृत भाषांचे शिक्षण त्यांना घरीच पंडितांकडून प्राप्त झाले. त्यामुळे बंगाली, संस्कृत व इंग्रजी या भाषांवर त्यांनी असामान्य प्रभुत्व संपादन केले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी घरीच ‘विद्योत्‌साहिनी सभा’ स्थापन केली (१८५५). चर्चामंडळात ते स्वतः व इतर अनेक ख्यातनाम विद्वज्जन निबंध वाचत व चर्चा करत. या मंडळाच्या विद्यमाने त्यांनी ‘विद्योत्‌साहिनी रंगमंच ‘ (१८५६) स्थापन करुन अनेक नाटके लिहून सादर केली व त्यांत भूमिकाही केल्या. ⇨ मायकेल मधुसूदन दत्त यांनी मेघनादवध काव्य (१८६१) लिहून बंगाली साहित्यात प्रथमच ‘अमित्राक्षर छंदा’ची (निर्यमक काव्यरचना) ओळख करुन दिली. बंगाली साहित्यात क्रांती घडविणाऱ्या या घटनेचे स्वागत करण्यासाठी कालिप्रसन्नांनी सर्वांत आधी विद्योत्‌साहिनी सभेच्या वतीने मायकेल मधुसूदन दत्तांचा गौरव करण्यासाठी सत्कारसभा आयोजित केली (१२ फेबुवारी १८६१). कालिप्रसन्नांना बालवयापासूनच साहित्याची गोडी होती आणि पुढे नाटक-रंगभूमी क्षेत्रात त्यांनी संस्मरणीय कार्य केले. त्यांनी बाबू (१८५४) हे प्रहसन लिहिले, तसेच विक्रमोर्वशीय (१८५७) व मालतीमाधव (१८५९) ही नाटके संस्कृतवरुन अनुवादित केली. सावित्री-सत्यवान (१८५८) या नाटकात त्यांनी संस्कृत व इंग्रजी नाट्यात्मक घाटांचे बेमालूम मिश्रण केले. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुरु केलेले महाभारताच्या बंगाली गद्य भाषांतराचे कार्य कालिप्रसन्नांनी अत्यंत निष्ठेने व नेटाने इतर पंडितांच्या सहकार्याने परिपूर्णत्वास नेले (१८५९—६६) व या भाषांतराच्या छापील प्रती विनामूल्य वाटल्या. हे भाषांतर अद्यापही बंगालमध्ये लोकप्रिय आहे तथापि कालिप्रसन्नांना जास्त लोकप्रियता लाभली, ती हुतो पँचार नक्शा (१८६२) ह्या व्यंग्यप्रचुर, उपरोधिक पुस्तकाचे लेखक म्हणून. ⇨ चार्ल्स डिकिन्झ च्या स्केचिस बाय बॉझच्या धर्तीवर लिहिलेल्या व्यक्तिरेखांचा हा संग्रह असून, त्यात कोलकात्याच्या समकालीन लोकजीवनाचे तत्कालीन प्रचलित बोली भाषेत व गतिमान जोशपूर्ण शैलीत केलेले व्यंग्यपूर्ण दर्शन घडते. समाजात वावरताना हरघडी भेटणाऱ्या नानाविध तऱ्हांच्या व्यक्तींची, त्यांच्यातील दोष, वैगुण्ये, मूर्खपणा यांवर प्रहार करणारी व्यक्तिरेखाटने हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य मात्र त्यांच्या शैलीत हीन अभिरुचिदर्शक शिवराळपणा व अश्लिलताही डोकावते. या शैलीचे त्या काळात मोठ्या प्रमाणात अनुकरणही झाले.

कालिप्रसन्नांनी सार्वजनिक जीवनात विविध पदे भूषवून अनेक लोकोपयोगी कामे केली. १८६३ मध्ये मानसेवी दंडाधिकारी, ‘जस्टिस ऑफ द पीस’ या पदांवर त्यांच्या नेमणुका झाल्या. त्या वेळी त्यांनी दक्षतापूर्वक समाजकार्य केले. तसेच बंगाल इलाख्याचे मुख्य न्यायाधिकारी (१८६६) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. या संदर्भात त्यांनी संकलित केलेल्या कलकत्ता पोलीस ॲक्ट (१८६८) या ग्रंथाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. विधवाविवाह आंदोलनाचे ते कट्टर पुरस्कर्ते होते, तसेच बहुपत्नीत्वविरोधी आंदोलनाचेही ते समर्थक होते. कालिप्रसन्न यांची दानशूरपणाबद्दल विशेष ख्याती होती. सार्वजनिक हितार्थ उभारलेल्या प्रत्येक निधीला ते भरघोस देणग्या देत असत. तत्त्वबोधिनी पत्रिका, सोमप्रकाश, मुकर्जीज मॅगझिन, बेंगॉली, हिंदू पॅट्रिअट इ. वृत्तपत्रांना त्यांनी उदार हस्ते अर्थसाहाय्य दिले. अखेर ह्या औदार्याचा इतका अतिरेक झाला, की त्यांना स्वतःलाच कर्जबाजारी व्हावे लागले. नियतकालिकांच्या संपादन-प्रकाशन कार्यातही त्यांना रस होता. विद्योत्साहिनी पत्रिका (१८५५), सर्वतत्त्वप्रकाशिका (१८५६), विविधार्थसंग्रह (१८६८), परिदर्शक (१८६९) इ. नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले.

एकोणिसाव्या शतकातील बंगाली प्रबोधनयुगाच्या खुणा कालिप्रसन्नांच्या व्यक्तिमत्त्वात व लिखाणात आढळतात. ज्या काळात इतर बंगाली लेखक सर्रास इंग्रजीमधून लेखन करीत, त्या काळात कालिप्रसन्न यांनी कटाक्षाने बंगालीमधून लिखाण केले. त्यांनी महाभारताचे व प्राचीन संस्कृत नाटकांचे बंगाली अनुवाद व नाट्यप्रयोग सादर केले. त्यांनी केलेली विद्योत्‌सहिनी सभेची स्थापना व बंगाली नाटक-रंगभूमीच्या विकासातील त्यांचे योगदान अशा सर्व उपक्रमांमुळे ते राष्ट्रीय वाङ्‌मयाचे व भारतीय सांस्कृतिक वारशाचे प्रवक्ते ठरले. दीनबंधू मित्र यांचे नीलदर्पण नाटक (१८६०) आणि मायकेल मधुसूदन दत्त यांची मेघनादवध काव्यव्रजांगना (१८६१) ह्या काव्यांचे सर्वप्रथम परीक्षण करणारे समीक्षक म्हणूनही ते गौरवास पात्र ठरले. त्यांची विद्योत्‌साहिनी सभा म्हणजे समकालीन साहित्य आणि भारतीय संस्कृती ह्या विषयांवरील चर्चा व वैचारिक आदान-प्रदान यांचे खुले व्यासपीठच होते. शतकारंभापासून समाजात जी वैचारिक परिवर्तने घडत गेली, त्याचे प्रतिबिंब त्यात उमटलेले दिसून येते.

संदर्भ : Bandyopadhyay, Brajendranath, Kaliprasanna Singh, Calcutta, 1957.

इनामदार, श्री. दे.