सिंग ( सिंह ), राजेंद्र : (६ ऑगस्ट १९५९– ). भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते व मागसायसाय पुरस्काराचे मानकरी. जलपुरुष म्हणून देशात ख्यातकीर्त. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशामधील दौला (जि. बागपत) येथे जमीनदार राजपूत शेतकरी कुटुंबात झाला. आईचे नाव तुलसादेवी. त्यांचे वडील सुखवीरसिंह जमीनदार होते. राजेंद्र यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जन्मगावीच झाले (१९७४). पुढे त्यांनी बरौत (जि. बागपत) येथील भारतीय ऋषिकुल आयुर्वेदिक महाविद्यालयातून पदवी, अलाहाबाद विद्यापीठातून हिंदी साहित्यात पदव्युत्तर पदवी (एम्.ए.) मिळविली आणि ते जयपूरला शासकीय सेवेत दाखल झाले (१९८०).
जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेल्या गांधी शांतता प्रतिष्ठानचे एक सदस्य रमेश शर्मा यांनी राजेंद्रांना दारुबंदीच्या कार्यक्रमात सहभागी करुन घेतले. या घटनेने राजेंद्र यांच्या भावी जीवनाला कलाटणी मिळाली. याशिवाय तत्कालीन आणीबाणीतील घटनांचा त्यांच्यावर परिणाम झाला. छात्र युवा संघर्ष समितीचे ते विद्यार्थिदशेत स्थानिक पुढारी होते. शासकीय सेवेत असताना ते जयपूरमध्ये शिक्षण खात्यात कार्यरत होते. त्यानंतर त्यांच्याकडे राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील प्रौढ शिक्षणाची जबाबदारी सोपविली. तत्पूर्वी ते जयपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या तरुण भारत संघ या संस्थेचे सदस्य झाले होते आणि तीन वर्षांनी त्यांच्याकडे संघटनेचे सरचिटणीसपद आले. प्रथम त्यांनी आदिम लोहारांच्या समूहाचा प्रश्न हाताळला कारण ते उदरनिर्वाहासाठी खेडोपाडी धंदा मिळावा म्हणून भ्रमंती करीत असत. विकास कामांबाबतची वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बेपर्वाई त्यांना पदोपदी जाणवत असल्यामुळे त्यांच्या मनात शासकीय सेवेबद्दल घृणा निर्माण होऊन त्यांनी स्वतःला सामाजिक कार्याला वाहून घेतले व नोकरी सोडली (१९८४) आणि राजस्थानच्या किशोरी (जि. अलवार) या ओसाड ग्रामीण भागाकडे रवाना झाले. तेथील पाणी प्रश्न त्यांना भेडसावत होता. सततच्या दुष्काळामुळे गावाशेजारुन वाहणारी नदी कोरडी पडली होती. गावतळे म्हणून ओळखला जाणारा ‘ जोहड ’ फुटून शुष्क झाला होता. राजेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कुदळ-फावडे घेऊन गाळ काढला, गावतळ्याची डागडुजी केली. त्यामुळे पावसाने गावतळे तुडुंब भरले आणि गावकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यांनी जवळच्याच भिकमपुरा गावात प्रवेश केला. गावातील लोकांनी त्यांना साथ दिली. तिथेच त्यांनी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच, नव्या जलक्रांतीला सुरुवात झाली. लोकांना औषधोपचार करण्यासाठी त्यांनी वैद्यकीय व्यवसायही सुरु केला. त्यावेळी त्यांचे सहयोगी मित्र शिक्षण प्रसारार्थ परिसरातील खेड्यांतून कार्यरत होते.
पुढे त्यांनी किशोरी, गोपालपुरा, भिकमपुरा, हमीरपुरा, कालाखेत, मल्लाणा, बलदेवगढ, काकवाडी, गुजरबहुल, नांगलहेडी वगैरे बहुतेक गावांतून पावसाचे पाणी अडविण्याच्या योजना कार्यवाहीत आणून भूजलाची पातळी कशी वाढेल यावरच लक्ष केंद्रित केले. परिणामतः या ओसाड प्रदेशात जोहड भरले, ज्या विहिरी कोरड्या होत्या त्यात पाणी साठले आणि खेडूतांमध्ये एक उत्साही व आनंदी वातावरण निर्माण झाले. पुढे किशोरी-भिकमपुरा (थानागाजी तालुका) या सीमेवर असलेले सरिस्का अभयारण्य ही तरुण भारत संघाची कर्मभूमी झाली आणि वनखात्याचे तिने लक्ष वेधून घेतले. नंतर त्यांनी जंगलतोड, खाणींचा भडिमार, प्राण्यांची शिकार यांविरुद्घ ‘ अरवली बचाव ’ हे आंदोलन छेडले आणि त्याकरिता अरवली चेतना पदयात्रा काढली (१९८६). हळूहळू राजस्थानातील अकरा जिल्ह्यांतील ८५० खेड्यांत हा संदेश पोहोचला. राजेंद्र यांनी श्रमदानातून शासकीय मदतीशिवाय सु. पाच हजार जोहड (तलाव) बांधले. यामुळे ते ‘ जोहडवाले बाबा ’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या या चळवळीला मोठी लोकप्रियता लाभली. राजेंद्र यांनी अशा प्रकारचे सु. ८,६०० जोहड उभारले असून यामुळे अरवारी, रुपारेल, तिलदेह, भागनी व जहाजवाली अशा पाच नद्यांना पुनरुज्जीवन मिळाले आहे. दुष्काळाशी सामना करणाऱ्या राजस्थानातील सु. १,००० खेड्यांना याचा लाभ झाला आहे.
जलसंवर्धनाबरोबरच त्यांनी अरवलीत पर्यावरण बचाव मोहीम उघडली व सरिस्का येथील व्याघ्रप्रकल्पाच्या संरक्षणार्थ तसेच संगमरवराच्या खाणींतून होणाऱ्या उत्खननांविरुद्घ मोठे जनआंदोलन छेडले. सर्वोच्च न्यायालयात खाणमालकांविरुद्घ अर्ज दाखल केला (१९९१). या न्यायालयीन लढाईद्वारे त्यांनी अरवलीतील ४७० बेकायदा खाणउद्योगांवर बंदी आदेश मिळविले. पर्यावरण मंत्रालयाने अरवली पर्वत श्रेणीतील खाण उत्खननावर निर्बंध लादले (१९९२). हे काम करीत असताना त्यांना प्राणघातक हल्ल्यांनाही तोंड द्यावे लागले परंतु त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग सोडला नाही. संस्थेची तत्त्वे व कार्याच्या प्रसारार्थ अरवली बचाव पदयात्रा (१९९३), गंगोत्री यात्रा, जंगल बचाओ यात्रा (१९९५) अशा पदयात्रा काढल्या व पाणी पंचायतीची स्थापना केली. याबरोबरच ग्रामस्वराज्य संकल्पनेसाठी ग्रामसभा, महिला स्वावलंबन आदी उपक्रम संस्थेमार्फत घेण्यात येतात. २००१ पर्यंत राजेंद्र व त्यांच्या संघाचा कार्यविस्तार राजस्थानसह मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश इ. राज्यांत झाला होता. २३ डिसेंबर २००२ रोजी त्यांनी राजघाट (दिल्ली) येथील म. गांधीजींच्या समाधीपासून राष्ट्रीय जलयात्रा काढली. तिने ३० राज्यांमधून सु. १५० दऱ्याखोऱ्यांतून संचार केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पाच जल परिषदा घेतल्या व पाण्याचे महत्त्व प्रतिपादिले. २००९ मध्ये मुंबईत विविध पर्यावरण संस्थांना सोबत घेऊन भव्य पदयात्रा काढून मिठी नदीच्या संवर्धनासाठी जनजागृती केली.
राजस्थानातील हमीरपूर येथे त्यांनी लोकसहभागातून जलसंधारणाचा अभिनव प्रकल्प साकारला आहे. तेथे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी भेट दिली व ‘ डाउन टू अर्थ ’ या पुरस्काराने या प्रकल्पाचा गौरव केला (२०००). राजेंद्रसिह यांना रामॉन मागसायसाय पुरस्कार (२००१), इंदिरा गांधी पुरस्कार, संत तुलसी पुरस्कार, विवेकानंद पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार इत्यादींनी (२००५) गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढली असून पूर्वीच्याच उत्साहाने ते आजही कार्यरत आहेत.
संदर्भ : शहा, सुरेखा, जोहड, मुंबई, २००९.
मिठारी, सरोजकुमार