सिंग, ग्यानी झैल : (५ मे १९१६–२५ डिसेंबर १९९४). भारतीय प्रजासत्ताकाचे अकरावे राष्ट्रपती व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात फरीदकोट (पंजाब) जिल्ह्यातील सांधवान या गावी झाला. वडील किशन सिंग हे शेतीबरोबरच पिढीजात हस्तव्यवसाय करीत असत. ते ग्यानी झैल सिंग लहान असतानाच वारले. त्यामुळे त्यांचे संगोपन-शिक्षण आईनेच केले. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच ते कुटुंबियांना शेतावर मदत करीत असत. शिवाय अन्य कष्टाची कामेही त्यांनी केली. त्यामुळे त्यांचे औपचारिक शिक्षण बेताचेच झाले होते तथापि त्यांनी आपला वाचनाचा व्यासंग वाढविला. पंजाबी भाषेबरोबरच हिंदी आणि उर्दू भाषांवर प्रभुत्व मिळविले आणि शहीद शीख मिशनरी कॉलेजमध्ये (अमृतसर) ग्रंथसाहिब या धर्मग्रंथाचे सूक्ष्मपठण व अध्ययन केले. त्यांच्या या क्षेत्रातील प्रावीण्यामुळे त्यांस ग्यानी – ज्ञानी – हे उपपद लाभले. शिवाय त्यांनी शीख धर्मग्रंथांच्या परिशीलनाबरोबर हिंदू , मुस्लिम धर्मग्रंथांचाही परामर्ष घेतला.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच स्वातंत्र्य चळवळीने उग्र रुप धारण केले होते. भगतसिंग व अन्य क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे ते प्रभावित झाले आणि स्वातंत्र्य चळवळीकडे आकृष्ट झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात काँग्रेसची शाखा काढली (१९३८). त्यांच्या या कृतीबद्दल ब्रिटिश शासनाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावून तुरुंगात डांबले. त्यातून सुटका झाल्यानंतर ते महात्मा गांधीजींच्या छोडो भारत आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात समांतर शासन स्थापन करुन (१९४६) शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्घ चळवळ उभी केली, तेव्हा त्यांना पुन्हा पाच वर्षांची शिक्षा झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर राज्य पुनर्रचनेत पतियाळा अँड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन ( पेप्सू ) राज्याच्या त्यांनी विविध मंत्रिपदे भूषविली (१९४८ – ५१). या काळात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रजामंडळाचे ते अध्यक्ष झाले. तसेच ते पेप्सू राज्याच्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते (१९५१-५२). त्यांची राज्येसभेवर निवड झाली (१९५६–६२). त्यांनी विधानसभेची काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली आणि जिंकली (१९६२). कैरोंच्या मंत्रिमंडळात ते होते. पुढे त्यांनी १९७१ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आणि १९७२ च्या विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. दोन्हींकडे बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांची पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर इंदिरा गांधींनी निवड केली (१९७२–७७). या काळात त्यांनी राज्यात हरितक्रांती घडवून आणली. तसेच औद्योगिकीकरणास चालना दिली. गुरु गोविंदसिंगांचे नाव एका महामार्गास दिले लंडनमधून उधमसिंगांच्या अस्थी-वस्तू आणल्या, तसेच गुरु गोविंदसिंगांची हत्यारे व अन्य वस्तू भारतात आणल्या आणि शीख बांधवांची सहानुभूती मिळविली. मधल्या काळात पुन्हा त्यांची पंजाब प्रादेशिक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करुन इंदिरा गांधींनी त्यांच्याकडे पक्ष संघटनेचे काम दिले (१९७७-७८).
लोकसभेच्या १९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी झैल सिंग यांच्याकडे गृहखाते सोपविले. या काळात पंजाबात, विशेषतः अमृतसरमध्ये भिंद्रानवाले आणि आसाममध्ये आसाम गणतंत्र परिषद या गटांनी राज्यशासनाने हादरुन सोडली होती. झैल सिंगांनी शक्यतो शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आसाममधील प्रमुख नेत्यांत समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. १९८२ मध्ये राष्ट्रपतिपदासाठी इंदिरा काँग्रेसचा उमेदवार म्हणून झैल सिंग उभे राहिले व निवडून आले. त्यांची राष्ट्रपतिपदावरील कारकीर्द (१९८२–८७) अनेक घटनांनी वादग्रस्त ठरली कारण इंदिरा गांधींचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यामुळे इंदिराजींच्या कोणत्याच कृतीला त्यांनी विरोध केला नाही. ब्लू स्टार ऑपरेशनपूर्वी (१९८४) इंदिरा गांधी त्यांना भेटल्या होत्या पण त्यांनी याबाबत झैल सिंगांना काहीच कल्पना दिली नाही मात्र या घटनेनंतर शीख समाज संतप्त झाला. त्यांनी झैल सिंगांच्या राजीनाम्याची मागणी केली, ती सिंगांनी नाकारली. अखेर या घटनेबाबत अकाल तख्तासमोर त्यांनी माफी मागितली. या घटनेच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्याची शीख धर्माचाऱ्यांकडून त्यांना अनुज्ञा झाली. दरम्यान इंदिरा गांधींची बिआंत सिंग या शीख व्यक्तीकडून हत्या झाली आणि शीखांविरुद्घ जनमत प्रक्षुब्ध झाले. राजीव गांधींना पंतप्रधानपदाची शपथ झैलसिंगांनी दिली परंतु त्यांच्याशी अनेक बाबतींत झैल सिंगांचे मतभेद झाले. त्यांची मुदत संपल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. २९ नोव्हेंबर १९९४ रोजी त्यांच्या मोटारीला अपघात झाला, त्यात त्यांना जबर मार बसला आणि त्यातच त्यांचे चंडीगढ येथे निधन झाले.
त्यांच्या पत्नीचे नाव परधान असून त्यांना एक मुलगा व तीन कन्या आहेत.
राऊत, अमोल