सॉलोमन बेन जुडाह : ( सु. १०२१– सु. १०५८). स्पॅनिश हिब्रू कवी आणि तत्त्वज्ञ. संपूर्ण नाव सॉलोमन बेन जुडाह इब्न गाबीरॉल. सॉलोमन बेन यहुदा इब्न गाबीरॉल ह्या नावानेही प्रसिद्घ. जन्म स्पेनमधील मॅलागा येथे. शिक्षण स्पेनमधील सॅरगॉसा येथे. शिक्षण घेत असताना येकुतिएल इब्न हासन हा उदार आश्रयदाता त्याला लाभला तथापि सॉलोमन सोळा-सतरा वर्षांचा असताना येकुतिएल निधन पावला आणि त्याला काही काळ भ्रमंती करावी लागली. पुढे ग्रॅनादा येथे त्याला स्पॅनिश ज्यू मुत्सद्दी आणि कवी सॅम्युएल हा-नागीद ह्याचा अनुग्रह प्राप्त झाला. सॅम्युएल ग्रॅनादा येथे वजीर होता. सॅम्युएलच्या मृत्यूनंतर त्याला पुन्हा एकदा दुःस्थिती प्राप्त झाली. सॉलोमन आयुष्यभर अविवाहित राहिला असावा, असे दिसते. व्हॅलेंशिया येथे तो निधन पावला. त्याच्या मृत्यूचे साल सु. १०५८ हे मानले जात असले, तरी तो १०६९ वा १०७० मध्ये निवर्तला असावा, असेही एक मत आहे.
सॉलोमनने धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष अशी दोन्ही प्रकारची कविता लिहिली. त्याच्या समकालीन हिब्रू कवींप्रमाणे त्याच्या समोरही अरबी कवितेचा आदर्श होता. त्याची वृत्ते, यमक-व्यवस्था, प्रतिमा ह्यांवर अरबी कवितेचा प्रभाव आहे. त्याच्या धर्मनिरपेक्ष कवितेत आत्मस्तुती, प्रेम, आश्रयदात्यांची प्रशंसा, त्याला टीकार्ह वाटणाऱ्या व्यक्तींचा उपहास, विलापिका, मद्यगीते, वसंत ऋतू , सुंदर फुलांची काव्यचित्रे असे अनेक विषय येतात. आत्मा आणि ईश्वर ह्यांच्यातील द्वैत ह्यांसारख्या नव-प्लेटो मतवादी विषयांवरील कविताही त्याने केलेल्या आहेत. त्याच्या धार्मिक कविताही उत्कट असून जगभरातील ज्यूंच्या प्रार्थनापुस्तकांत त्यांतील अनेक कवितांचा समावेश आहे.
सॉलोमन हा पहिला स्पॅनिश ज्यू तत्त्वज्ञ होय. त्याचा मुख्य तत्त्वज्ञानीय ग्रंथ Mekor Hayyim (लॅटिन भाषांतर, Fons Vitae इं. अर्थ फाउंटन ऑफ लाइफ ) हा होय. विवेचक स्वरुपाचे पाच निबंध मिळून हा ग्रंथ झालेला आहे. ह्या ग्रंथाच्या लॅटिन भाषांतरात लेखकाचे नाव ॲव्हिसब्रॉन, अव्हेन्सब्रॉल वा ॲव्हिसेंब्रिल असे देण्यात आले आहे. ही नावे म्हणजे इब्न गाबीरॉल ह्या नावाचीच अपभ्रष्ट रुपे आहेत, हे एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला स्पष्ट झाले. सॉलोमनच्या तत्त्वज्ञानावर ⇨ नव-प्लेटो मत आणि ⇨ प्लोटायनस ह्यांचा प्रभाव दिसतो. गुरुशिष्य संवादाच्या स्वरुपात लिहिलेल्या ह्या ग्रंथात नव-प्लेटो मतप्रणीत विश्वरचनाशास्त्र आणि सत्ताशास्त्र विवेचिले आहे तथापि सॉलोमनने ईश्वरी संकल्पाचा ( डिव्हाइन विल ) विचार मांडला आहे. नव-प्लेटो मताचे सविस्तर प्रतिपादन करणाऱ्या प्लोटायनसने निःसरणाच्या प्रक्रियेनुसार आदिकारणापासून जग उत्पन्न होते असे प्रतिपादन केले. त्याच्या मते ईश्वर हा निःसरणप्रक्रियेचा आरंभबिंदू असून तिथून सृष्टीची उतरंड उलगडत जाते. ह्या उतरंडीतील शेवटची पायरी म्हणजे जडवस्तू होय. सॉलोमनच्या मते निःसरणाची ही प्रक्रिया केवळ यांत्रिक आवश्यकतेच्या स्वरुपाची नाही. ईश्वरी संकल्पाचा तो परिणाम आहे. ईश्वरी संकल्प येथे एक सर्जनशील भूमिका पार पाडीत असतो. सृष्टी म्हणजे पूर्वनियत पायऱ्यांची साखळी नाही. ईश्वराने केलेली ती एक मुक्त कृती आहे. त्याच्या Tikkun Middot Ha-nephesh ( इं. शी. ‘इंप्रूव्हमेंट ऑफ द मॉरल क्वालिटीज’) मध्ये प्रत्येकी पाच-पाच भागांची चार प्रकरणे आहेत. त्यांत इंद्रियांना शिस्त लावून शरीर आणि आत्मा ह्यांच्यात संवादित्व निर्माण करणारा समतोल साधण्याची शिकवण दिलेली आहे.
सॉलोमनचा प्रभाव ज्यू तत्त्वज्ञांवर फारसा पडलेला दिसत नाही मात्र काही उत्तरकालीन ज्यू नव-प्लेटो मतवादी आणि कब्बाला ह्या गूढवादी संप्रदायावर तो ठळकपणे जाणवतो.
संदर्भ : 1. Davidson, Israel, Ed.The Selected Religious Poems of Solomon Ibn Gabirol, New York, 1973.
2. Guttman, J. Philosophies of Judaism, New York, 1973.
कुलकर्णी, अ. र.
“