साक्षांकन : ( अटेस्टेशन ). कोणत्याही कराराचा लेख, हस्तांतरणाचा दस्तऐवज, मृत्युपत्र आदींवर साक्षीदारांनी स्वाक्षरी करुन साक्षांकन केलेले असते. तो दस्तऐवज, तो लेख ज्या व्यक्तीने करुन दिला असे त्यावर नमूद आहे, त्यानेच त्यावर मान्यतादर्शक स्वाक्षरी केली आहे, हे सिद्घ करण्यासाठी हे साक्षांकन महत्त्वाचे असते व ते लेख लिहून देणाऱ्याला ओळखणाऱ्याने करावे लागते.

एखाद्या दस्तऐवजावर तो लिहून देणाऱ्याप्रमाणे इतर व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या असणे एवढाच साक्षांकनाचा अर्थ नाही. पूर्वी संपत्ती हस्तांतरणाच्या भारतीय कायद्यानुसार साक्षांकन म्हणजे साक्षीदाराने दस्तऐवज लिहून देणाऱ्याने त्यावर स्वाक्षरी करताना प्रत्यक्ष पाहिली असणे आवश्यक होते लिहून देणाऱ्याने ती स्वाक्षरी आपलीच आहे, असे साक्षीदारासमोर कबूल करणे केवळ पुरेसे नव्हते. १९२६ मध्ये या कायद्यात प्रथमच ‘साक्षांकन’ या संज्ञेची व्याख्या समाविष्ट करण्यात आली. पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आलेल्या या व्याख्येने दस्तऐवज लिहून देणाऱ्या व्यक्तीने आपली स्वाक्षरी करताना दोन किंवा अधिक व्यक्तींनी प्रत्यक्ष पाहिले असले पाहिजे किंवा ती स्वाक्षरी आपली असल्याचे त्यांच्या समक्ष कबूल केले असले पाहिजे असे ठरविले. या व्याख्येप्रमाणे आता साक्षीदार, दस्तऐवज लिहिला जात असताना समक्ष हजर असणे तांत्रिकद्दष्ट्या आवश्यक नाही परंतु साक्षांकन करणारे साक्षीदार फक्त लिहून देणाऱ्याच्या स्वाक्षरीबद्दलच साक्ष देऊ शकतात असे नाही. जो करार दोन किंवा अधिक व्यक्तींत झाला, त्याचे ठरावाचे बोलणे व त्याप्रमाणे लेख लिहिणे साक्षीदारासमोर झाले असेल, तर घडलेल्या सर्वच हकिगतीबद्दल म्हणजे त्या लेखातील मजकुराबद्दलही ते साक्ष देऊ शकतात. म्हणून साक्षांकन करणाऱ्या व्यक्ती लेख लिहिताना हजर असणे, दस्तऐवजातील मजकूर सिद्घ करण्याला अधिक उपयुक्त असते. मृत्युपत्र सिद्घ करण्याची गरज जेव्हा पडते, तेव्हा ते करणारा हयात नसतो म्हणून ते त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणेच लिहिले गेले हे सिद्घ करण्यास साक्षांकन करणाऱ्या साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरते.

पहा : दस्तऐवज मृत्युपत्र साक्षीदार.

चपळगावकर, नरेंद्र