साळुंकी : ( मैना ). कावळा व चिमणी यांच्याप्रमाणेच साळुंकीही मानवाच्या सहवासाला कायमची येऊन राहिलेली आहे. ज्या ठिकाणी मानव आहे त्या ठिकाणी साळुंकी आढळतेच. ती भारतात सर्वत्र आणि हिमालयात सस.पासून सु. २,४४० मी. उंचीपर्यंत आढळते. श्रीलंका आणि म्यानमार या देशांतही ती आढळते.

 

साळुंकी (ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस )साळुंकी स्टर्निडी या पक्षिकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस असे आहे. ती बुलबुलापेक्षा मोठी व कबुतरापेक्षा लहान असते. हिचे सबंध डोके, मान आणि छातीचा वरचा भाग काळा असतो शरीराचा बाकीचा भाग गर्द तपकिरी असून पोटाच्या मागचा भाग पांढरा असतो चोच आणि पाय पिवळे असतात डोळे तांबूस-तपकिरी असून त्यांच्या खालचा व मागचा भाग तकतकीत पिवळ्या रंगाचा असतो व त्यावर पिसे नसतात. पंखामध्ये एक मोठा पांढरा ठिपका असून उडताना तो स्पष्ट दिसतो. शेपटी काळसर असते. नर-मादी दिसायला सारखीच असतात.

 

साळुंक्या जोडीने राहतात. नर आणि मादी यांचे एकमेकांवर प्रेम असते. दोघेही जमिनीवर एका ठिकाणीच भक्ष्य टिपीत हिंडत असतात व मध्येच थांबून एकमेकांची पिसे चोचीने साफ करतात किंवा समाधान व्यक्त करण्याकरिता विचित्र अंगविक्षेप करतात. मादी साळुंकी मोठी मिजासखोर असते व तिच्या सर्व हालचालींत आत्मविश्वास दिसतो.

 

साळुंकी सर्वभक्षक आहे. फळे, धान्य, गांडुळे तसेच गायबगळ्यांप्रमाणे चरणाऱ्या गुरांबरोबर राहून तेथे मिळणारे टोळ व इतर सर्व प्रकारचे किडेही ती खाते.

 

प्रसंगानुरुप साळुंकी वेगवेगळे आवाज काढते, काही मंजुळ तर काही कर्कश असतात. सोबत्याला बोलाविण्याकरिता, रागावल्यावर आणि आनंद व्यक्त करण्याकरिता ती वेगवेगळे आवाज काढते. मादीचे लक्ष वेधण्यासाठी नर विशिष्ट आवाज काढतो.

 

साळुंक्यांची झोपण्याची रीत कावळ्यांसारखीच असते. संध्याकाळी त्यांचे थवे एखाद्या ठराविक झाडावर जमतात व बराच वेळ ओरडून गोंगाट करतात. अंधार पडल्यावर ते गोंगाट थांबवितात.

 

साळुंक्यांचा विणीचा हंगाम एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत असतो. घरटे झाडाच्या ढोलीत, घराच्या वळचणीला किंवा भिंतीवरील भोकात असते. कागद, पिसे, चिंध्या, गवत इत्यादींपासून ते बनविलेले असते. मादी तकतकीत निळ्या रंगाची ४-५ अंडी घालते. घरटे बांधणे, अंडी उबविणे व पिलांना भरविणे ही कामे नर व मादी दोघेही करतात.

 

गुजरात, राजस्थान व पाकिस्तान या भागांत रेल्वे स्थानकांच्या परिसरात किनारी साळुंकी (ॲ. गिंगीनिॲनस ) आढळते (पहा : मराठी विश्वकोश : खंड ९, चित्रपत्र ४६). तिचा रंग फिकट निळसर-राखी असतो. ती साळुंकीपेक्षा आकाराने लहान असते. उत्तर व पूर्व भारतात रंगीत साळुंकी (स्टर्नस काँटा) आढळते. ती साळुंकीपेक्षा लहान असून तिचा रंग काळा पांढरा असतो.

 

कर्वे, ज. नी.