साष्टी : साळशेट. मुंबई उपनगर जिल्हा (महामुंबई) आणि ठाणे जिल्हा यांच्यात प्रशासकीयदृष्ट्या विभागले गेलेले (१९५०) अरबी समुद्रातील एक इतिहासप्रसिद्घ बेट. १८° ५३’ उ. ते १९° १९’ उ. अक्षांश आणि ७२° ४७’ पू. ते ७३° ३’ पू. रेखांश यांदरम्यान विस्तारलेले हे बेट उल्हास नदीच्या दोन मुखप्रवाहांमुळे मुख्य भूमीपासून वेगळे झाले आहे. उत्तरेस वसईची खाडी, दक्षिणेस मुंबई बेट (मुंबई शहर जिल्हा), पश्चिमेस अरबी समुद्र यांनी हे बेट वेढलेले आहे. उत्तर-दक्षिण सु. ४५ किमी. लांब व उत्तर भागात सु. २४ किमी. रुंद असलेल्या या बेटाचे क्षेत्रफळ सु. ६३७ चौ. किमी. आहे. सांप्रत भूपुनःप्रापण प्रकल्पांमुळे मुंबई व साष्टी ही बेटे एकमेकांस जोडली गेली आहेत.

बेटावरील एका प्राचीन गुहेतील लेखामध्ये ‘साळशेट’ असे याचे नाव आढळते. पोर्तुगीजांनी ते ‘सॅलसेट’ असे केले व पुढे मराठी अंमलात ते ‘साष्टी’ या नावाने प्रचारात आले. वांद्रे, कुर्ला, ठाणे, घाटकोपर, अंधेरी इ. या बेटावरील प्रमुख नगरे होत. याशिवाय मुंबई उपनगरांना व शहराला पाणी पुरवठा करणारे मुख्य तीन कृत्रिम तलाव (विहार, पवई व तुळशी) याच बेटावर आहेत. बेटाच्या मध्यातून उत्तरेकडून दक्षिणेकडे लहान डोंगररांग पसरली आहे. ती कुर्ल्याजवळ कमी होऊन पुढे तुर्भेजवळ दक्षिणेला दिसून येते.

इसवी सन दुसऱ्या शतकापासूनचा साष्टीचा इतिहास उपलब्ध आहे. या बेटावरील कान्हेरी (कृष्णगिरी) येथे सापडलेल्या बौद्घ गुहांतील स्तंभांवर आणि स्तंभशीर्षपादांवर अनेक उत्कीर्ण लेख आहेत. त्यांवरून साष्टी बेटावर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या कारकीर्दीत (इ. स. सु. १७३–२११) गजसेन आणि गजमित्र या श्रेष्ठींनी लेणी खोदण्यास प्रारंभ केला असावा. ती लेणी खोदण्याचे काम पुढे राष्ट्रकूट वंशातील राजा पहिला अमोघवर्ष (कार. ८१४–८८०) याच्या वेळीही सुरू असल्याचे ७८ व्या गुहेतील लेखावरून ज्ञात झाले. यावरून साष्टी बेटावर सातवाहन-राष्ट्रकूट राजांची सत्ता होती, असे दिसते. बोरिवली येथे सापडलेल्या अवशेषांत यादवांच्या (कार. इ. स. ९२०–१३१८) अंमलाविषयी माहिती मिळते. त्यावरून या बेटावर शिलाहार-यादव वंशांची सत्ता असल्याचे समजते. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजांनी हे बेट हस्तगत केले. त्या काळातील जुन्या चर्चवास्तू, बंगले यांचे जीर्ण अवशेष अद्यापि या बेटावर आढळतात. पुढे ते बेट दुसरा चार्ल्स याच्या राणीकडून इंग्रजांना आंदण म्हणून मुंबईसह भेट देण्यात आले होते (१६६२). अठराव्या शतकात ते पोर्तुगीजांनी ब्रिटिशांकडून पुन्हा हस्तगत केले. दरम्यान मराठ्यांनी १७१९ मध्ये कल्याण घेतले. पहिल्या बाजीरावाने कोकणच्या स्वारीत साष्टी बेट घेतले पण पोर्तुगीजांनी पुन्हा ते घेतले. चिमाजी आप्पाच्या नेतृत्वाखाली मार्च १७३७ मध्ये वसईवर मोहीम आखण्यात आली. मराठ्यांनी ठाण्याचा किल्ला घेऊन साष्टी बेटात प्रवेश केला. घनघोर लढाईनंतर दिनांक ५ मे १७३९ रोजी वसईचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतरच्या तहानुसार मराठ्यांना वसई-साष्टी बेटासह चार बंदरे, वीस किल्ले, आठ शहरे, ३४० खेडी एवढा मुलूख आणि अडीच लाख महसुलाचा भूप्रदेश मिळाला. याशिवाय या विजयामुळे मराठे व इंग्रज हे परस्परांचे हितचिंतक झाले. इंग्रजांना मुंबईची सुरक्षितता आणि लष्करी हालचाली या दृष्टिकोनातून साष्टी-वसई हे प्रदेश महत्त्वाचे वाटत होते. इंग्रजांनी नारायणरावाच्या खुनानंतर पुणे दरबारातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन जनरल गॉर्डन व वॅटसन यांना ठाण्याच्या किल्ल्यावर हल्ला करण्यास सांगितले. त्या किल्ल्यासह इंग्रजांनी २३ डिसेंबर १७७४ रोजी साष्टी बेटही मराठ्यांकडून जिंकून घेतले. त्यानंतर पहिले इंग्रज-मराठे युद्घ उद्‌भवले (१७७५–८२) मराठ्यांचा आवाका पाहून ब्रिटिशांनी १ मार्च १७७६ रोजी पुरंदर येथे तह केला. त्यात भडोच व त्याजवळची ठाणी मराठ्यांना परत दिली मात्र साष्टीवरील ताबा त्यांनी सोडला नाही. पुढे इंग्रज-मराठे यांच्यात १७ मे १७८२ रोजी सालबाईचा तह झाला आणि साष्टी बेट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पूर्णतः अखत्यारीत आले. ते पुढे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत त्यांच्या अंमलाखाली होते (१९४७).

साष्टी बेटावरील उरलेल्या शेत जमिनीत मुख्य पीक भात असून डोंगर उतारावरील जमीन गवतासाठी संरक्षित आहे. समुद्राच्या काठी नारळ व पाम वृक्षांची वनराई असून मीठ उत्पादन, मासेमारी, भातशेती, हातमाग उद्योग इ. व्यवसाय पूर्वीपासून आहेत. सांप्रत या बेटावर पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गांचे जाळे पसरलेले असून अनेक रस्त्यांनी व पुलांनी हे बेट मुंबई बेटाशी तसेच मुख्य भूभागाशी जोडलेले आहे.

पहा: कान्हेरी ठाणे जिल्हा मुंबई.

देशपांडे, सु. र.