सावर, लाल : (सावरी, काटे-सावर हिं. सिमूळ, सेमूर गु. रातो शिमाळो क. बूरुगा, एलब, बूरला सं. रक्तपुष्पा, कंटकद्रुम इं. रेड सिल्क कॉटन ट्री लॅ. बॉम्बॅक्स सैबा, बॉ. मलबॅरिकम, साल्मलिया मलबॅरिका कुल-बॉम्बॅकेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक सुंदर पानझडी भारतीय वृक्ष. भारतात तो सर्वत्र पसरलेला असून अंदमानातही आढळतो. सस. पासून १,५०० मी. उंचीपर्यंत त्याचा प्रसार झालेला आढळतो. भारताबाहेर उष्णकटिबंधातही त्याचा प्रसार आहे. उपहिमालयाच्या प्रदेशात व त्या खालच्या दऱ्यांतही तो आढळतो आणि जलोढीय रुक्ष वनांत (सॅव्हानात) तर तो प्रारुपिक आहे नद्यांच्या काठाने कधीकधी त्याचे समूह असतात. साल वृक्षाच्या रुक्ष जंगलातील त्याची उपस्थिती उल्लेखनीय आहे [⟶ साल–२ ]. तसेच ओलसर व मिश्र सदापर्णी वनांतही तो आढळतो. सावरीच्या बॉम्बॅक्स या शास्त्रीय प्रजातीत एकूण आठ जाती असून त्यांपैकी भारतात फक्त दोनच आढळतात. ‘शाल्मली’ या नावाने संस्कृत ग्रंथांत त्याचा उल्लेख आढळतो. हजार– बाराशे वर्षांपूर्वीचे सावर वृक्ष आढळल्याचे नमूद आहे, म्हणजे ⇨ वड व ⇨ पिंपळा प्रमाणे तो दीर्घायुषी आहे [⟶ आयुःकाल, प्राण्यांचा व वनस्पतींचा]. महाभारत, सुश्रुतसंहिता, चरकसंहिता, रामायण व बाणभट्टांची कादंबरी इत्यादींत याचा उल्लेख आढळतो. कौटिलीय अर्थशास्त्रात बाण विषारी करण्यास शाल्मलीचा उपयोग केल्याचा उल्लेख आला आहे. शाल्मलीच्या डिंकाला ‘मोचरस’ व त्यामुळे वृक्षाला ‘मोचक’ हे नाव पडलेले आढळते. या वृक्षाच्या बोंडातील कापसावरून बॉम्बॅक्स हे आधुनिक प्रजातिवाचक शास्त्रीय नाव आणि शाल्मलीवरून साल्मलिया हे प्रजातिनाम दिले आहे. शाल्मली हेच नाव ‘सफेद सावर’ या वृक्षालाही वापरले जाते [⟶ शाल्मली].
वनस्पतिवर्णन : हा २५–४० मी. उंच व सु. ६ मी. घेराचा वृक्ष असून त्याला तळाशी जाडजूड आधारामुळे [⟶ मूळ–२ ] व त्यांवर २५–३० मी. उंच सोट (शाखाहीन खोड) असतो. सोटावर बळकट मोठे, तीक्ष्ण व शंकूसारखे काटे असल्याने त्याचे सहज संरक्षण होते. याच्या फांद्या सरळ आडव्या व झुपक्यांनी येतात आणि त्यांवर तसेच खोडावर फिकट करडी काहीशी चंदेरी व गुळगुळीत साल असते पुढे तिच्यावर उभ्या भेगा पडून काटे येतात. याची पाने संयुक्त, मोठी, हस्ताकृती, गुळगुळीत असून दले ५–७ व प्रत्येक दल १०–२० सेंमी लांब असते. साधारणपणे जानेवारीच्या अखेरीस पाने गळून पडतात व त्याच सुमारास फुलांचा बहर येतो. फुले मोठी, १०–१३ सेंमी. व्यासाची, मांसल, गर्द किरमिजी किंवा लाल (क्वचित पिवळी किंवा पांढरी) असून त्यामुळे या वृक्षाला अपूर्व शोभा येते. त्याचवेळी मैना, कावळे, भोरडे, चिमण्या इ. अनेक पक्षी व फुलांतील मधाकरिता येणारे भुंगे वृक्षावर गर्दी करून असतात. फुलांच्या संरचनेत अपिसंवर्त (फुलाच्या तळाशी असलेल्या उपांगांचे–छदांचे–मंडल) नसतो. संवर्त (पाकळ्यांखालचा भाग) जाड पेल्यासारखा व आतून रेशमी पाकळ्या पाच व जाड (१२ × ३ सेंमी.) असंख्य केसरदले (अनेक जुडग्यांमध्ये –बहुसंघ ) पाकळ्यांच्या रंगाची व किंजदले पाच व जुळलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ व पाच कप्प्यांचा [⟶ फूल]. फळे शुष्क, १०–१८ सेंमी. आकाराची, लवदार, आयत, बोथट साधारण पंचकोनी, कठीण, पुटक भिदुर (कप्प्यावर तडकणारी) व बोंड प्रकारची [⟶ फळ] असून ती मार्च–मे महिन्यांमध्ये येतात. बिया अनेक, लंबगोल, वाटाण्याएवढ्या, गुळगुळीत, काळसर, सु. ९ मिमी. लांब व फळांतील कापसात विखुरलेल्या असतात. कापूस बोंडाच्या सालीच्या आतील बाजूपासून बनलेला असतो. कोरड्या हवेत ही बोंडे तडकून एक-दोन बियांसह हलक्या कापसाचे पुंजके बाहेर येऊन वाऱ्याने दूरवर पसरतात अशा रीतीने बियांचा प्रसार होऊन वृक्षाच्या नैसर्गिक अभिवृद्घीस मदत होते. ह्या वृक्षाचा समावेश पूर्वी ⇨ माल्व्हेसी कुलात केला जात असे, परंतु हल्ली ⇨ बॉम्बॅकेसी (शाल्मली) कुलात करतात. सावरीच्या वर दिलेल्या लक्षणांखेरीज इतर सामान्य शारीरिक लक्षणे कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. मध्य प्रदेशातील सावरीच्या एका प्रकारात वृक्षांवर काटे नसतात व लहान लालबुंद फुले असतात.
पारिस्थितिकी : ग्रॅनाइट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या खोल, रेताड व दुमट जमिनीत सावर चांगला वाढतो तसेच दऱ्या-खोऱ्यांतील खोल गाळाच्या जमिनीत याची उत्तम वाढ होते. डोंगरांच्या उतरणीवरील खोल व निचऱ्याच्या जमिनीतही याची वाढ चांगली होते. निसर्गतः सावलीत, ३४° ते ४९° से. ह्या सर्वांत उच्च तापमानापासून ते ३·५° ते १७·५° से. ह्या सर्वांत खालच्या तापमानापर्यंत सावरी वृक्षाची वाढ होते तसेच ७५ ते ४६० सेंमी. ह्या पर्जन्यमानाच्या अभिसीमेत त्याची वाढ चांगली होते. तथापि सर्वोत्कृष्ट वाढ संपूर्ण वर्षभर थोडा थोडा (अधूनमधून) पाऊस पडत राहिल्यास होते. या वृक्षाला भरपूर सूर्यप्रकाश मानवतो, त्यामुळे त्याचे नैसर्गिक समूह फार दाट नसतात. कडक हिमतुषारी हवा त्याला बाधक ठरते परंतु रुक्षतेशी तो यशस्वी रीत्या जमवून घेतो. रुक्ष वनातील रोपे आगीने होरपळून जातात. परंतु त्यातून जाड सालीमुळे वाचल्यास पुढे तो इतरांपेक्षा चांगला सुधारून वाढतो. वाढीच्या आरंभीच्या काळात मुनव्यापासून नवीन वाढ चांगली होते.
अभिवृद्घी : नैसर्गिक पुनर्जनन : बिया निसर्गतः सुयोग्य जमिनीवर पडल्या ठिकाणी रुजून वाढ सुरू झाल्यावर सु. ८ वर्षांनी वृक्षाला फळे येतात (भेट कलमांना मात्र वर्षातच फळ धरते). बोरांच्या भिन्न जातींच्या जाळीत किंवा गवतांच्या जुमड्यांत प्रथम त्यांना संरक्षण मिळते. आसामात सदापर्णी जंगलांत याची संख्यावाढ चांगली होत नाही परंतु अग्निपासून संरक्षण मिळाल्यास गवताळ प्रदेशांत याची नैसर्गिक वाढ चांगली होते. उत्तर प्रदेश व ओडिशा येथे अनुक्रमे मुनवे व ठोंब (स्थूण) यांच्या साहाय्याने अभिवृद्घी करतात.
कृत्रिम पुनर्जनन : तीन प्रकारांनी याची अभिवृद्घी साधता येते: (१) प्रत्यक्ष बी पेरून, (२) निसर्गतः किंवा नवीन बनविलेली झाडे काढून पुन्हा अन्यत्र लावून व (३) छाट कलमे लावून.
प्रकार (१) मध्ये ताज्या ३-४ बिया घेऊन त्या सु.३·७ × ३·७ मी. अंतरावर केलेल्या भुसभुशीत उंच वाफ्यात पावसाळ्याच्या आरंभी लावतात. अथवा सु. ३० ग्रॅ. बिया सु. ७५ मी. लांबीच्या रांगांत ४·५-५·५ मी. अंतर ठेवून पेरतात. सरीमधून प्रथम पाणी द्यावे लागते. या दुसऱ्या पद्घतीत अधिक लाभ होतो परंतु खर्च जास्त होतो. पाणी न दिल्यास यशप्राप्ती कमी असते. प्रकार (२) आणि (३) मध्ये मे-जूनमध्ये पन्हेरीत प्रथम रोपे बियांपासून तयार करतात किंवा छाट कलमे बनवितात, त्यावेळी सावली व पाणी द्यावे लागते. सुमारे दोन महिन्यांनी रोपे वाढल्यावर ती तशीच ठेवतात व एक किंवा दोन वर्षांनी तेथून काढून इच्छित ठिकाणी लावतात. पुनरारोपणात छाट कलमांची प्रारंभिक व नंतरची वाढ अधिक चांगली असते. अनेक ठिकाणी सावरीच्या लागवडीत तणांचा उपद्रव टाळण्याकरिता, त्यासोबत इतर काही झाडे [ उदा., बाभूळ, शिसू, शिवण, नाणा, महारुख (महानिंब), असाणा इ.] लावून मिश्रवन बनवितात. सर्वसाधारणतः पाऊसमान सुयोग्य असल्यास याची वाढ जलद व चांगली होते. त्यातही लागवडीत विरळपणा आणल्यास वृक्षांचा घेर भरपूर वाढतो. वृक्षांचा उपयोग करण्याकरिता त्याची वाढ २०–४० वर्षे होऊ द्यावी लागते. आगपेट्यांच्या कारखान्यांना ०·९–१·८ मी. घेराचे सोट लागतात.
रोगराई, कीड इ. : अनेक ⇨ कवके उदा., गॅनोडर्मा, फायलोस्टिक्टा, क्लॅडोट्रिकिम इत्यादींमुळे मूळकूज, करपा, पानसुरळी, पाने सुरकुतणे, ऊतकमृत्यू आणि पाने गळणे इ. प्रकारची हानी होते. तसेच खोड पोखरणारे किडेही फारच नुकसान करतात. पाने खाणारे कीटक, भुंगेरे, अळ्या इ. भेंडात प्रवेश करतात. काही कवके लाकूड कुजवून खराब व नाश करतात. या सर्वांवर योग्य ती ⇨ कवकनाशके व ⇨ कीटकनाशके वेळीच उपयोगात आणावी लागतात.
रासायनिक संघटन : भारतीय सावरीच्या बियांच्या पिठात प्रतिशत प्रमाणात पाणी ११·४०, भरड प्रथिन ३६·५०, मेद ०·८०, कार्बोहायड्रेटे २४·७०, भरड धागे १९·९०, खनिजे ६·७० असतात. दोन वर्षे वाढलेल्या मुळांत (साल नसलेल्या व सुक्या) प्रतिशत प्रमाणात पाणी ७·५, खनिजे २·१, प्रथिने १·२, मेद ०·९, स्टार्च ७०·९, पेक्टिक पदार्थ ६·०, तूलीर २·०, फॉस्फॅटाइट ०·३, सेमल रेड ०·५, टॅनीन ०·४, शर्करा ८·२ ही असतात.
उपयोग : लाकूड : लाकडातील मध्यकाष्ठ व रसकाष्ठ परस्परांपासून फारसे भिन्न वाटत नाहीत मात्र कधीकधी मधला भाग फिकट किंवा गर्द तपकिरी दिसतो. लाकूड फार हलके व एकंदरीत नरम असते. त्यावर अनेक संस्कार केले जातात. उघड्या जागी ते टिकत नाही. परंतु घराच्या आतील बाजूस वापरल्यास टिकते. तथापि लाकूड कठीण व चिवट असून ते पाण्यात लवकर कुजत नसल्याने होड्यांकरिता वापरतात. कापणे, रंधून साफ व गुळगुळीत करणे यांकरिता हे लाकूड सोपे असते. त्याचे तक्ते हलक्या प्रतीचे होतात परंतु चहाच्या खोक्यांसाठी ते वापरता येतात. लाकूड विपुल, स्वस्त व सर्वत्र सहज उपलब्ध असल्याने फार उपयुक्त ठरले आहे. आगपेट्यांचा उद्योग, स्वस्त हलके तक्ते (प्लायवुड), फळांच्या बाजारी पेट्या, साध्या फळ्या, खेळणी, तरंड, ढोल, छताच्या फळ्या, शवपेट्या, तलवारीच्या म्यानी, ब्रशांच्या पाठी, विहिरींच्या किनारी इ. विविध प्रकारांसाठी त्याचा उपयोग होतो. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, आंध्र प्रदेश व ओडिशा येथून लाकडाचा बराचसा पुरवठा होतो. रांधा व सालपे भरण-सामग्रीकरिता उपयुक्त असतात. [⟶ लाकूड].
कापूस :(कपोक). फळांतील कापसाला व्यापारात ‘कपोक’ म्हणतात ही संज्ञा मूळची यूरोपीय आहे. अमेरिकी कपोकला ‘ट्रू कपोक’ आणि आशियाई कपोकला ‘इंडियन कपोक’ म्हणण्याचा प्रघात पडला आहे. जावातील ‘शाल्मली’च्या कापसाचा रंग अधिक तपकिरी पिवळसर दिसतो. भारतीय सावरीचा कापूस हलका, तरंगणारा, स्थितिस्थापक, लवचिक व जलप्रतिवारक (पाण्याशी संपर्क व शोषण टाळणारा) असतो. खऱ्या कपोकापेक्षा तो सरस ठरतो परंतु त्याचा न आवडणारा वास त्याच्या निर्यातीत अडथळा आणतो. दोन्ही कपोकातील तूलीराचे (सेल्युलोजाचे) प्रमाण ६१–६४% असते. भारतीय कपोकातील राखेचे प्रमाण सु. २·७% तर परदेशी कपोकात ते १·३% असते. व्यापारी मालात तेच ४·४% असते. जीवसंरक्षक पट्टे व इतर साधने, गाद्या, उशा, गिरद्या इत्यादींकरिता हा कापूस फार चांगला असतो. त्याला किडीचा उपद्रव पोहोचत नाही. कारण दोन्ही प्रकारच्या कापसांतील तंतूवर मेणाचे आवरण असते. देशी तंतूची लांबी व जाडी अधिक असते. प्रशीतकपेट्या (रेफ्रिजरेटर) ध्वनिनिरोधक वेष्टने व भिंती यांत निरोधक म्हणून कपोकाचा वापर करतात. भंगुर (तूट-फूट होणाऱ्या) वस्तू गुंडाळण्यासही नेहमीच्या कापसापेक्षा हा अधिक चांगला असतो. शस्त्रक्रियेनंतरच्या मलमपट्ट्यांतील कापूस हाच असतो. दोरा व वस्त्रोद्योग यांमध्ये एकवेळ निरुपयोगी ठरलेला हा कापूस आता त्यांकरिता काही अंशी वापरता येऊ लागला आहे.
भारतीय वृक्षापासून ४·५–६·० किग्रॅ. कापूस मिळतो, परंतु परदेशी वृक्षापासून फक्त २·० किग्रॅ. मिळतो. काहीशा पक्व फळांतील कापूस खाली पडलेल्या फळांतील कापसापेक्षा अधिक चांगला ठरला आहे. सावरीची सुकी फळे ४–६ दिवस उन्हात सुकवितात. त्यानंतर १०–१२ दिवस त्यांतून काढलेला कापूस सुकवितात. निर्यातीकरिता कापूस यांत्रिक साधनांनी स्वच्छ करून पाठविला जातो. स्वच्छतेच्या ह्या प्रक्रियेत याची ५५–६०% वजनी घट होते. त्यानंतर त्याची प्रतवारी करतात. प्रथम जमेका, फिजी बेटे व यूगोस्लाव्हिया ह्या देशांत भारतातून हा कापूस निर्यात होत असे. आता या कापसाची इतर अनेक देशांत निर्यात होत आहे. [⟶ कापूस].
डिंक : सावरीच्या झाडातून ‘मोचरस’ नावाचा डिंक नैसर्गिक रीत्या, कीटकांनी भोके पाडल्यास किंवा अशाच काही कारणांनी जखमा झाल्यास पाझरतो (सेमूल गम). तो फिकट तपकिरी गाठींच्या स्वरूपात असून पुढेपुढे गर्द पिंगट दिसतो. तो पाण्यात फारसा विरघळत नाही, परंतु इतर डिंकाप्रमाणे पाणी शोषून फुगतो. कॅटेचोल, टॅनीन बरेच असते टॅनिक व गॅलिक अम्लेही त्यात असतात. एरंडेल व राख मिसळून तो लोखंडी पात्रातील भेगा बुजविण्यास वापरतात. तो तुरट, स्तंभक (आकुंचन करणारा), उत्तेजक, पौष्टिक, धातुपुष्टी करणारा, आरोग्य पुनःस्थापक, रक्तस्तंभक व शोथशामक (दाह कमी करणारा) असून आमांश, इन्फ्लूएंझा, मासिक अतिस्राव, क्षय इ. विकारांवर देतात. बाजारी मालात शेवग्याच्या डिंकाची भेसळ करतात. [⟶ डिंक ].
बिया व तेल : सावरीच्या बियांतून फिकट पिवळसर तेल काढतात. ते सरकीच्या तेलाप्रमाणे खाण्यास, साबणांकरिता व दिव्यांकरिताही उपयुक्त असते. सावरीच्या पेंडीत सरकी व खऱ्या कपोक पेंडीपेक्षा अधिक नायट्रोजन (प्रथिन) असते ते उत्कृष्ट पशुखाद्य आहे.
इतर उपयोग : कोवळी मुळे व पाने, फुलांच्या कळ्या, मांसल संवर्त आणि डिंक खाद्य असून उत्तर प्रदेशात कळ्यांची भाजी करून खातात. रताळ्याप्रमाणे मुळे भाजून खातात. कोवळ्या फांद्या व पाने यांचा गुरांना चारा घालतात. शेळीच्या दुधात साखर, खसखस व सावरीची फुले एकत्र उकळत ठेवून पुढे त्याचा खाद्याकरिता वापर करतात. सुकलेली व चूर्ण केलेली फुले, पीठ घालून किंवा न घालता भाकरी करण्यास वापरतात. दुष्काळात कोवळी सालही खाद्याकरिता वापरतात.
औषधी उपयोग : सावरीच्या लहान रोपट्यांची प्रधानमुळे स्तंभक, उत्तेजक, पौष्टिक व शामक असून आमांशात देतात. साल कडू, जहाल, मूत्रल व कफोत्सारक असते. फुले स्तंभक त्वचेच्या विकारांत फुलांचा किंवा पानांचा लगदा बाहेरून लावतात. कोवळी फळे कफोत्सारक, उत्तेजक व मूत्रल असून अश्मरीच्या (खडे बनण्याच्या) विकारांत, मूत्रपिंड व मूत्राशय यांच्या जुनाट विकारांत ती देतात. परमा व श्लेष्मल विकारांतही बिया उपयुक्त असतात. पानांत संघनित प्रकारची टॅनिने असतात. चीन, कांपुचिया (ख्मेर प्रजासत्ताक), मलेशिया, फिलिपीन्स इ. देशांत सावरीचा औषधात वापर करतात.
पहा: बॉम्बॅकेसी वृक्ष शाल्मली.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.
2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. I, New Delhi, 1975.
3. Santapav, H. Common Trees, New Delhi. 1966.
४.देसाई, वा. गो. ओषधिसंग्रह, मुंबई, १९७५.
५. पदे, शं.दा. वनौषधी गुणादर्श, मुंबई, १९७३.
जोशी, गो. वि. परांडेकर, शं. आ.
“