सावंत, शिवाजी : (३१ ऑगस्ट १९४०–१८ सप्टेंबर २००२). ख्यातनाम मराठी कादंबरीकार. संपूर्ण नाव शिवाजी गोविंदराव सावंत. जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यालाच झाले. प्रथम वर्ष बी. ए. पर्यंत शिक्षण घेऊन पुढे वाणिज्य शाखेतून पदविका घेतली. त्यानंतर कोल्हापूरच्या मा ‘राजाराम प्रशाले’त त्यांनी अध्यापन केले (१९६२–७४). १९७४ मध्ये ते पुण्यास स्थायिक झाले. तेथे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणखात्याच्या लोकशिक्षण ह्या मासिकाचे संपादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९८३ मध्ये या मासिकाच्या संपादक पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
‘राजाराम प्रशाले’त अध्यापन करीत असतानाच त्यांनी मृत्युंजय (१९६७) ही आपली पहिली कादंबरी लिहिली. हिंदीतील केदारनाथ मिश्र ह्यांचे कर्ण आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ ह्यांचे रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा त्यांनी मृत्युंजयच्या प्रस्तावनेत कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे. ह्या कादंबरीत कर्णाच्या अंतरंगात शिरून त्याच्या मनोविश्वाचा शोध घेण्याचा प्रगल्भ प्रयत्न त्यांनी केला आहे. महाभारताच्या विराट विश्वातून कर्णाला त्याच्या दुःखी, यातनामय आयुष्याला त्याच्या अनेक संदर्भांसह वेगळे करून त्यांनी त्याची प्रतिमा साकारली आहे. कर्णामध्ये त्याच्या जन्माच्या आणि त्यानंतरच्या आयुष्यातील अपमानास्पद घटनांच्या प्रभावातून काही दोष निर्माण झालेले असले, तरी तो एक सत्प्रवृत्त, समर्पणशील पण स्वाभिमानी पुरुष आहे. ज्या कुटुंबात तो आला, त्या कुटुंबातली सर्व नाती तो अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने सांभाळतो. गुरुजनांबद्दल त्याच्या मनात कृतज्ञता आहे. मैत्रीसाठी तो आपले सर्वस्व अर्पण करतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ही प्रकाशमय बाजू त्यांनी समर्थपणे मांडली. ह्या कादंबरीला वाचकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांच्या ह्या पहिल्याच कादंबरीने प्रभावी कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. बहुतेक भारतीय भाषांतून ती अनुवादिली गेली. तिचा इंग्रजी अनुवादही झाला आणि मृत्युंजयकार ही उपाधीही त्यांना लाभली. छावा (१९७९) आणि युगंधर (२०००) ह्या त्यांच्या त्यानंतरच्या कादंबऱ्या. छावा ही संभाजी महाराजांच्या जीवनावरची, तरयुगंधर ही भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरची कादंबरी आहे. भव्योदात्त जीवनांबद्दल त्यांना वाटणारा आदर मृत्युंजय ते युगंधर पर्यंतच्या त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमधून उत्कटपणे प्रकट होतो. छावामध्ये जनमानसात संभाजी महाराजांबद्दल निर्माण झालेली नकारात्मक स्वरूपाची प्रतिमा पुसून त्या जागी औरंगजेबाने दिलेल्या क्रूर मृत्युदंडाच्या शिक्षेला धीरोदात्तपणे सामोरे जाणारे, आपले राजेपद जबाबदारीने आणि विवेकाने सांभाळणारे संभाजी महाराज ते उभे करतात. त्यासाठी संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीचा ते मानसशास्त्रीय अंगाने विचार करतात. भारतीय ज्ञानपीठाने ह्या कादंबरीचे हिंदी भाषांतर प्रसिद्घ केले आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातले जे चमत्कार सांगितले जातात, ते वगळून श्रीकृष्ण दाखविणे हा युगंधर लिहिण्यामागचा त्यांचा हेतू होता. श्रीकृष्णासारखा एक माणूस भगवानपदापर्यंत पोहोचतो त्याचप्रमाणे श्रीकृष्णासारखे आचरण आपण करू शकू असा विश्वास सर्वसामान्य माणसातही निर्माण होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन तो विश्वास जागृत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते. जीवनमूल्य नष्ट होत असताना आणि त्यामुळे सामाजिक विघटनाचा अनुभव येत असताना भारतीय मिथकांचा आणि इतिहासाचा आधार घेऊन मानवी जीवनातील आत्मिक शक्तींचा त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून पुरस्कार केला. मृत्युंजय आणि छावा ह्या कादंबऱ्यांची नाट्यरूपेही त्यांनी निर्माण केली.
ह्या साहित्यकृतींच्या व्यतिरिक्त सावंत यांनी जे लेखन केले, त्यांत लढत (दोन भाग–१९८६) आणि संघर्ष (१९९५) ह्या दोन जीवनकहाण्यांचा अंतर्भाव होतो. लढत ही सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे-पाटील ह्यांची, तर संघर्ष ही प्रसिद्घ कामगारनेते मनोहर कोतवाल ह्यांची जीवनकहाणी. आपल्या जीवनात हाती घेतलेल्या कामासाठी ध्यास घेऊन काम करणारी ही माणसे त्यांना चरित्रकथनासाठी योग्य वाटली. ह्यात त्यांची उदात्ततेकडे पूर्णपणे झुकलेली मानसिकता पुन्हा एकदा प्रत्ययास येते. अशी मने असे नमुने (१९७५) आणि मोरावळा (१९९८) मध्ये त्यांनी वेगवेगळ्या माणसांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. अशी मने असे नमुने मध्ये त्यांच्या जीवनाशी एकरूप झालेली, त्यांच्यावर प्रेम करणारी, निर्मळ मनाची माणसे त्यांनी रंगविलेली आहेत, तर मोरावळामध्ये त्यांना भेटलेली शिक्षण, समाजकारण, राजकारण, प्रकाशन, साहित्य अशा क्षेत्रांतील कर्तृत्ववान माणसे त्यांनी शब्दचित्रित केली आहेत. प्रकाशक अनंतराव कुलकर्णी, साहित्यिक ग. दि. माडगूळकर, ना. सं. इनामदार, शिक्षणाच्या क्षेत्रातील अशोक गगराणी, राजकीय नेते यशवंतराव चव्हाण ही मोरावळामधील काही व्यक्तिचित्रे होत. सावंत यांनी ही दोन पुस्तके लिहून मराठीतील व्यक्तिचित्रणात्मक साहित्य अधिक संपन्न केले. शेलका साज (१९९४) मध्ये त्यांचे ललित लेख अंतर्भूत आहेत.
सावंत यांना अनेक साहित्यपुरस्कार आणि सन्मान मिळाले. मृत्युंजयला मिळालेले काही निवडक पुरस्कार असे: महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७), न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२), भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ (१९९५), फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६), आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८). छावालाही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला (१९८०).
बडोदे येथे १९८३ मध्ये भरलेल्या ‘बडोदे मराठी साहित्यसंमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९९७ मध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. कोल्हापूर येथे १९९८ मध्ये भरलेल्या सातव्या कामगार साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना १९९९ मध्ये मिळाला. २००० मध्ये ‘कोल्हापूरभूषण’ म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती.
गोवा येथे हृदयविकाराच्या झटक्याने ते निधन पावले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मगावी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर यांच्या वतीने ‘मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरीपुरस्कार’ प्रतिवर्षी दिला जातो. तसेच पुणे येथे मृत्युंजय प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे.
संदर्भ : वाघ, शांताराम, मृत्युंजयकार शिवाजी सावंत : व्यक्ती आणि साहित्य, पुणे, २००१.
कुलकर्णी, अ. र.
“