सामंत, मोहन बाळकृष्ण : (१९२६–२२ जानेवारी २००४). आधुनिक भारतीय चित्रकार. मुंबई येथे जन्म. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून जी.डी.आर्ट ही पदविका त्यांनी घेतली (१९५७). १९५० पासून ते ‘बाँबे प्रोगेसिव्ह आर्टिस्ट्स गूप’ या प्रागतिक चित्रकारगटाचे सदस्य होते. १९५८ मध्ये इटालियन शासनाची सांस्कृतिक शिष्यवृत्ती मिळवून ते रोम येथे चित्रकलेच्या उच्च् शिक्षणासाठी गेले. पुढच्याच वर्षी ते अमेरिकेला गेले व नंतर न्यूयॉर्क येथे स्थायिक झाले. त्यांची चित्रनिर्मिती तेथे अव्याहत चालू होती. अधूनमधून ते भारतात येत असत. १९६३ मध्ये टाइम या नियतकालिकात प्रसिद्घ झालेल्या, जगातील तत्कालीन शंभर अग्र गण्य कलावंतांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. लॉर्ड बीव्हरब्रूकने १९६३ मध्ये नेमलेल्या एका प्रकल्पाचा भाग म्हणून ही यादी तयार करण्यात आली होती. देशविदेशांत भरलेल्या अनेक प्रमुख कला प्रदर्शनांतून त्यां नी आपली चित्रे सातत्याने मांडली, तसेच एकल चित्रप्रदर्शनेही (वन मॅन शो) भरविली.
उदा., मुंबई येथील एकल चित्रप्रदर्शने (१९५२–५६ १९६७). १९६१– ७७ या काळात परदेशांत भरवलेली एकल चित्रप्रदर्शने : रोम (१९५८) न्यूयॉर्क (१९६१, ६२, ६४, ६५, ७२, ७७) स्टॅनफर्ड (१९७७). अनेक द्वैवार्षिक कलाप्रदर्शनांत भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी चित्रे मांडली. उदा., व्हेनिस (१९५६, ५८) टोकिओ (१९५७, ५९) साऊँ पाउलू (१९६०) ‘टाटा गॅलरी’, लंडन (१९६३) ‘स्मिथ सोनियन इन्स्टिट्यू ट’, वॉशिंग्टन (१९७३) इ. ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनांत त्यांची चित्रे प्रदर्शित झाली. ‘गॅलरी ग्रॅहम’, न्यूयॉर्क येथील चित्रकारगटाच्या प्रदर्शनातही त्यांची चित्रे होती. अनेक राष्ट्री य व आंतरराष्ट्रीय कलासंगहालयांत त्यांची चित्रे कायमस्वरुपी जतन करण्यात आली आहेत. उदा., ‘नॅशनल गॅलरी म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट’, नवी दिल्ली ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’, कोलकाता ‘आशिया सोसायटी’, न्यूयॉर्क ‘कार्नेगी इन्स्टिट्यूट’, पिट्सबर्ग ‘म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट’, न्यूयॉर्क इ. ठिकाणी त्यांची चित्रे पाहावयास मिळतात. मुंबई व कोलकाता आर्ट सोसायटींकडून सुवर्णपदके (१९५६), ललित कला अकादेमीचे पारितोषिक (१९५७) हे त्यांना लाभलेले काही मानसन्मान होत.
मोहन सामंत यांच्या चित्रांत एक प्रकारची काव्यात्म गुणवत्ता आढळते. तिचे घनिष्ठ नाते संगीताशी जुळणारे आहे कारण संगीत हे त्यांचे पहिले प्रेम होते व ते अखेरपर्यंत टिकून राहिले. त्यांच्या चित्रांतील अमूर्त आशय व त्याच्या गाभ्यात असलेली गूढरम्यता ही वैशिष्ट्ये त्यांच्या सांगीतिक जाणिवेची निदर्शक आहेत. त्यांच्या चित्रनिर्मितीमागील मर्मदृष्टी ही गूढभावाची सूचक आहे व चित्रांतून व्यक्त होणारा अनुभव ऐंद्रिय नसून आधिभौतिक आहे. त्यांच्या चित्रांतील प्रतिमा व त्या प्रतिमांचे संघटन यांतून एक विचित्र स्वप्नसृष्टी साकार होते. ह्या स्वप्नसृष्टीत चित्रलिपीसदृश्य गूढ चिन्हे, कामवासनासूचक विचित्र प्राणी, देवदूत व मत्स्यकन्या, पुराणकथांतले सर्प अशी विलक्षण प्रतिमा-प्रतीके आढळतात. ह्या स्वप्नप्रदेशात अद्भुत प्रकल्पन व वास्तवघटक यांची सरमिसळ आढळते.त्यांतून एक नाट्यात्म, गूढ परिणाम साधला जातो. त्यांनी काही चित्रांना दिलेली शीर्षकेही काव्यात्म व गूढभावसूचक आहेत. उदा., रेड कार्पेट (१९५१ जलरंगमाध्यम) द मून अँड द मिल्की वे (१९६० म. शी. ‘चंद्र आणि आकाशगंगा’) अन्बॉर्न सिव्हिलिझेशन (१९६१ म. शी. ‘अजात संस्कृती’) डीइफिकेशन ऑफ सिम्बल्स (१९६२ म. शी. ‘प्रतीकांचे दैवतीकरण’), शिव अँड पार्वती (१९६३, तैलरंगऐमाध्यम) इत्यादी. यांखेरीज त्यांची पास्ट अँड प्रेझेंट (१९६६ म. शी. ‘ मिश्रमाध्यम ‘ ) अन्टायटल्ड इ. चित्रे विशेष उल्लेखनीय आहेत.(चित्रपत्र).
इनामदार, श्री. दे.
“