सानिया : ( १० नोव्हेंबर १९५२– ). आधुनिक मराठी कथा-कादंबरीकार. स्त्रीवादी साहित्यिक म्हणून त्या विशेष प्रसिद्घ आहेत. मूळ नाव सुनंदा कुळकर्णी विवाहोत्तर सुनंदा बलरामन्. ‘सानिया’ या टोपण नावाने लेखन. जन्म सांगली येथे. वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे त्यांचे शालेय शिक्षण मुंबई, नागपूर, नासिक, पुणे अशा विविध स्थळी झाले. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले. विद्यार्थिदशेतच त्या कथा, कविता लिहू लागल्या व त्या शालेय-महाविद्यालयीन नियतकालिकांतून प्रकाशितही झाल्या. १९७५ पासून सत्यकथा या नियतकालिकातून त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. त्यांचा पहिला कथासंग्रह शोध (१९८०) हा होय. त्यानंतर प्रतीती (१९८९), खिडक्या (१९८९), भूमिका (१९९४), वलय (१९९५), परिमाण (१९९६), प्रयाण (१९९७), ओमियागे (२००४) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्घ झाले. दिशा घराच्या (१९९१), ओळख (१९९२) हे त्यांचे दीर्घ कथासंगह. स्थलांतर (१९९४), आवर्तन (१९९६), अवकाश (२००१) या त्यांच्या कादंबऱ्या. सानिया यांच्या कथा-कादंबऱ्या नायिकाप्रधान आहेत. सुशिक्षित, आधुनिक, शहरी, संवेदनशीलस्त्री, तिने जगताना घेतलेला स्वतःचा व सभोवतालच्या जगातल्या इतर नातेसंबंधांचा शोध, हा त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा मूळ आशय व स्रोत असून आधुनिक जगात संवेदनशील स्त्री म्हणून जगताना तिला जे प्रश्न पडतात, ते ह्या आशयाच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणून त्यांची कथा प्रामुख्याने आधुनिक स्त्रीच्या सुखदुःखांच्या जाणिवांचा शोध घेणारी आहे. या शिवाय स्त्री-पुरुष संबंधातील अनेकपदरी व विविध परिमाणे असलेल्या सहसंबंधांचा शोध त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून घेतलेला आढळतो. मानवी नात्यांतील निरर्थकता, दुरावा, अकारण निर्माण होणारे गैरसमज व त्यांतून व्यक्तीच्या वाट्याला येणारा एकाकीपणा, कटुता इ. विशेष त्यांच्या कथालेखनात आढळतात. माणसांच्या, समाजाच्या, नात्यांच्या परिघात वावरणाऱ्या स्त्रीला पडणारे प्रश्न, तिचा खडतर प्रवास, यांची भावपूर्ण उत्कट गुंफण त्यांच्या कादंबऱ्यांतून दिसते. काळानुसार बदलत्या जीवनप्रणाली तसेच विचारसरणी यांना अनुसरुन त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे जगताना दिसतात. सानियांची लेखनशैली काहीशी त्रोटक, संदिग्ध आहे. जिवंत व्यक्तिचित्रे, तरल, काव्यात्म भाषा आणि जीवनाविषयीचा प्रगल्भ दृष्टिकोन यांमुळे हे लेखन एक वेगळीच उंची गाठते.

सानिया यांना अनेक पुरस्कार लाभले. त्यांपैकी डॉ. अ. वा. वर्टी कथालेखन पुरस्कार (१९९०) प्रतीती या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्‌मयाचा पुरस्कार (१९९१) महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९९४) वि. स. खांडेकर स्मृति पुरस्कार (१९९६) जयवंत दळवी स्मृति पुरस्कार (१९९६) हे विशेष महत्त्वाचे होत.

 

संदर्भ : जाधव, रा. ग. संपा. मराठी वाङ्‌मयाचा इतिहास, खंड सात, पुणे, २०१०.

 

पाटील, क्रांती