सातभाई: सर्वसाधारणपणे या नावाने ओळखले जाणारे पक्षी मध्यम आकाराचे, तपकिरी रंगाचे व कळप करून राहणारे आहेत. टिमॅलिडी या पक्षिकुलात यांचा समावेश होतो. हे पक्षी नेहमी सहा-सात जणांच्या समूहाने राहतात म्हणून त्यांना ‘सातभाई’ असे म्हणतात. भारतात छोटा सातभाई, बडा सातभाई, पिवळ्या डोळ्याचा सातभाई आणि मोठा राखी सातभाई या जाती आढळतात.

 

हे पक्षी आसामखेरीज भारतात सर्वत्र आढळतात. कोरड्या मैदानी व डोंगराळ प्रदेशात ते राहतात परंतु सस.पासून १,२२० मी.पेक्षा जास्त उंचीवर किंवा दाट जंगलात आढळत नाहीत. पाणथळ जागा ते टाळतात. हे पक्षी समूहाने भक्ष्य शोधतात. झाडाझुडपांच्या खाली जमिनीवरील पालापाचोळा खालीवर करून ते भक्ष्य शोधीत असतात. शत्रूची चाहूल लागल्यास ते जवळच्या झुडपात किंवा गवतात लपून बसतात. किडे, बारीक फळे, धान्याचे दाणे व फुलातील मध हे त्यांचे अन्न आहे. एका ठिकाणचे भक्ष्य टिपून झाल्यानंतर एकामागून एक समूहातील सर्व पक्षी उडून दुसऱ्या ठिकाणी जातात. या पक्ष्यांना चांगले व फार लांब उडता येत नाही. ते उडताना लागोपाठ जोराने पंख फडफडवितात व थोडे दूर जातात. नंतर पंख पसरून हवेतून संथपणे घसरत जातात.अशी यांची उडण्याची पद्घत आहे.

 

सातभाई या पक्ष्याचा मार्च–मे आणि जुलै–सप्टेंबर असा वर्षातून दोनदा विणीचा हंगाम असतो. घरटे दाट झुडपात किंवा गवतात न दिसेल अशा जागी परंतु एक मीटरपेक्षा जास्त उंचीवर नसते. घरटे वाटीसारखे असून मुळ्या, काटक्या इत्यादींचे बनविलेले असते. आतून मऊ पदार्थांनी मढविलेले असते. मादी फिकट निळ्या रंगाची, तकतकीत ३-४ अंडी घालते. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे इ. कामे नर व मादी दोघेही करतात. ⇨चातक आणि ⇨पावशा हे पक्षी सातभाईच्या घरट्यात आपली अंडी घालतात.

 

आ.छोटा सातभाई : (लॅ. टरडॉयडीस कॉडेटस इं. कॉमन बॅब्लर). हा बुलबुलाएवढा असून त्याच्या शरीराची लांबी सु. २३ सेंमी. असते. त्याची वरची बाजू मातकट तपकिरी रंगाची असून पाठीवर गर्द तपकिरी रंगाच्या ठिपक्यांच्या रेषा असतात. शेपटी लांब, निमुळती व हिरव्या-तपकिरी रंगाची असते. ती शरीराच्या मागच्या टोकाशी सैलपणे चिकटविल्यासारखी दिसते. हनुवटी व गळा पिंगट पांढऱ्या रंगाचा असतो. खालची बाजू पिवळसर असते. डोळे पिवळ्या रंगाचे, चोच फिकट तपकिरी, पाय हिरवट-पिवळे आणि नखे काळसर असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात.

आ. २. बडा सातभाई (टरडॉयडीस स्ट्रायटस)बडा सातभाई : (बैरागी लॅ.टरडॉयडीस स्ट्रायटस इं. जंगल बॅब्लर). हा साळुंकीपेक्षा लहान असून त्याचा रंग मातकट तपकिरी असतो. खालची बाजू पिवळसर असते. शेपटी लांब असते. अन्नाचा शोध घेताना त्यांचा एकसारखा कर्कश आवाज चालू असतो. छोट्या कळपामध्ये ते सहकारी वृत्तीने एकत्र राहतात. काही वेळा मतभेद झाल्यावर त्यांच्यात स्वैर लढाई होते. लढाईत चोच व नखे यांचा शस्त्र म्हणून वापर होतो. लढाईच्या जागी पिसांचा खच पडतो. कळपात दिलजमाई झाल्यानंतर नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होतात. दुसऱ्या पक्ष्याने हल्ला केला तर कळपातील सर्व पक्षी मदतीला धावतात व हल्लेखोराला हाकलून देतात.

 

पिवळ्या डोळ्याचा सातभाई: (क्रासोमा सायनेसिस ). हा पक्षी बुलबुलापेक्षा थोडा लहान असतो. त्याच्या वरील बाजूचा रंग तांबूस पिंगट, खालील बाजू पांढरी, पापण्या नारिंगी-पिवळ्या रंगाच्या व डोळे पिवळ्या रंगाचे असतात. हे पक्षी चीप-चीप असा आवाज काढतात.

 

मोठा राखी सातभाई : (टरडॉयडीस माल्कोमी ). हा पक्षी राखट तपकिरी रंगाचा, कपाळ राखी रंगाचे असून शेपटी पसरली असता बाहेरील पिसे पांढरी दिसतात.

 

पूर्वी गाणारे सर्व पक्षी सातभाई (बॅब्लर) या नावाने ओळखले जात असत. यांच्या सु. २५० जाती आढळतात. यामध्ये रेल बॅब्लर, स्मिटर बॅब्लर, वॉरेन बॅब्लर, साँग बॅब्लर, टिट बॅब्लर यांचा समावेश होतो.

पाटील, चंद्रकांत प.