साठेबाजी: (होअर्डिंग).वस्तुरूपातील किंवा रोकडरूपातील संपत्ती गरजेपेक्षा जास्त प्रमाणात जवळ बाळगण्याची मानवी प्रवृत्ती. या प्रवृत्तीलाच ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स याने ‘रोकड पसंती’ असे संबोधिले आहे. वस्तूंच्या साठेबाजीमुळे पैशाचा विनियोग न होता तो केवळ निरूपयोगी अवस्थेत पडून राहतो. बँकांनी केलेल्या एकूण पैसापुरवठ्यात वाढ झाली नाही, तर साठेबाजीमुळे भांडवलसंचयाचे व विनियोगाचे प्रमाण आपातत : कमी होत जाते आणि त्याचा परिणाम सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर होतो. तसेच रोजगार व उत्पन्न या दोन्ही गोष्टी कमी होण्यावर होतो.

अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यावर व कार्यक्षमतेवर साठेबाजीचे फार महत्त्वाचे परिणाम घडून येतात. साठेबाजी वाढू लागली म्हणजे, साठेबाज आपल्याजवळील रोख्यांची विक्री करून रोकड जमा करू लागतात. रोखेबाजारात विक्रीला आलेल्या रोख्यांमुळे त्यांच्या किमतीत घट होते. परिणामी व्याजाचे दर वाढू लागतात व त्याचाही परिणाम सामान्य कर्जदात्यांवर होतो तथापि कालांतराने वाढत्या साठेबाजीस आपोआप आळा बसू शकतो. परंतु तत्पूर्वी वाढलेल्या व्याजाच्या दरांमुळे भांडवल गुंतवणुकीत अडथळे निर्माण होतात. रोजगार व उत्पन्न यांच्यामध्येही घट होते. अशा रीतीने साठेबाजी ही बेकारीच्या मुळाशी असलेले एक प्रमुख कारण आहे, असे मानले जाते.

साठेबाजीचा दुसरा एक अर्थ म्हणजे भाववाढ चालू असताना आपल्याजवळील धान्य, साखर, सोने-चांदी इ. मालाची विक्री करण्यास नकार देण्याची व्यापाऱ्यांची नफेबाजी प्रवृत्ती होय. या प्रवृत्तीमुळे घाऊक बाजारातील वस्तूंचे भाव वाढतात आणि सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो ग्राहकांना वस्तूंची टंचाई अधिक जाणवते व त्यातून काळ्याबाजाराला उधाण येते मात्र विक्री उशिरा केल्याने किंवा चढ्या भावात केल्याने अधिक फायदा मिळू शकतो, त्यामुळे भाववाढ अधिक तीव्र होते. इ. स. २०१० -११ मधील चलनवाढीच्या निर्देशांकावरून काही जीवनावश्यक वस्तूंचे उदा., कांदा, साखर, तुरीची डाळ, खाद्यतेले इत्यादींचे भाव आकाशाला भिडल्याचे शासनाच्या निदर्शनाला आल्यानंतर साहजिकच काही वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आणि साठेबाजांविरुद्घ कडक कारवाईचे आदेश शासनाने दिले, त्यासाठी कायदेशीर तरतुदींचे उपाय योजावे लागले. याशिवाय शासनाने साठेबाजीस आळा घालण्यासाठी काही वस्तूंची (कांदा, तुरीची डाळ, साखर) बाहेरील देशांतून आयातही केली होती.

धोंगडे, ए. रा.