सागर विद्यापीठ : (डॉ. हरि सिंग गौर विश्वविद्यालय).मध्य प्रदेश राज्यातील एक ख्यातनाम विद्यापीठ. मध्य प्रदेशातील सामाजिक व शैक्षणिक सुधारणावादी सर ⇨ हरि सिंग गौर (१८७०–१९४९) यांनी १८ जुलै १९४६ रोजी स्वतःच्या मिळकतीमधील वीस लाख रुपये खर्चून सागर येथे सागर विद्यापीठाची स्थापना केली. सागर शहराच्या पूर्वेस ५ किमी. वर असलेल्या पथारिया टेकडीवरील ८३० हे. क्षेत्रात विद्यापीठाचा विस्तार आहे. विद्यापीठाचा परिसर अतिशय रमणीय आहे. मध्य प्रदेश राज्यातील हे सर्वांत जुने व मोठे विद्यापीठ आहे. सर गौर हेच विद्यापीठाचे पहिले संस्थापक-कुलगुरू होते. मध्य प्रदेश शासनाने ४ मे १९७३ रोजी त्यास पूर्ण विद्यापीठीय दर्जा दिला. फेब्रुवारी १९८३ मध्ये सागर विद्यापीठाचे ‘डॉ. हरि सिंग गौर विश्वविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले.
विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक, संलग्नक व निवासी असे असून त्याच्या क्षेत्रात मध्य प्रदेश राज्यातील सागर, छिंदवाडा, बेतूल, हुशंगाबाद, मंडला, नरसिंगपूर, खांडवा (पूर्व निमाड) या जिल्ह्यांतील महाविद्यालये संलग्न आहेत. विद्यापीठात कला, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, तंत्र व विज्ञान, संगीत, संगणक वगैरे विषयांचे ३६ विद्यापीठीय अध्यापन विभाग, १० विद्याशाखा, ८१ संलग्न महाविद्यालये व एक विद्यापीठीय शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. संलग्न महाविद्यालयांमध्ये ६७ शासकीय व १२ महिला महाविद्यालये आहेत. याशिवाय पंचमढी येथे भूसेनादल प्रशिक्षण महाविद्यालय आहे. परंपरागत पदवी अभ्यासक्रमाबरोबरच पदव्युत्तर शिक्षण, संशोधन शिक्षणक्रम, भूशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, गुन्हे व न्यायशास्त्र, मानवशास्त्र, प्रयोगीय कला, वृत्तपत्रविद्या व संदेशवहन, प्रौढ शिक्षण, इलेक्ट्रॉनिकी, व्यवसाय-व्यवस्थापन, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान व संगणक उपयोजन इ. विशेष विषयांच्या शिक्षणसुविधा येथे आहेत. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे एक केंद्र या विद्यापीठात आहे. विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण संस्थेमार्फत वेगवेगळ्या पदवी-पदविका पाठ्यक्रमांच्या पत्रद्वारा शिक्षण सुविधा दिल्या जातात.
सागर विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी चार व विद्यार्थिनींसाठी दोन वसतिगृहे आहेत. येथील जवाहरलाल नेहरू ग्रंथालय सुसज्ज असून त्यात सु. तीन लाखांपेक्षा अधिक ग्रंथसंपदा आहे. तसेच तीन मजली इमारतीत प्रशस्त अशा अभ्यासिका आहेत. याशिवाय दृक-श्राव्य शिक्षणासाठी साहाय्यभूत असे फिल्म संग्रहालय तसेच २६ विभागांची स्वतःची विभागीय ग्रंथालये आहेत. विद्यापीठ परिसरात बँक, डाकगृह, सेवायोजन कार्यालय, रुग्णालय, छापखाना, आहारगृह व दुकाने अशा साहाय्यकारी सुविधा आहेत.
देशपांडे, सु. र.