सांता आना : मध्य अमेरिकेतील एल् साल्वादोर प्रजासत्ताकामधील याच नावाच्या विभागाचे मुख्य ठिकाण, तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ३,२४,५२८ (२०१०). पश्चिम साल्वादोरमध्ये एका पर्वतांतर्गत द्रोणी प्रदेशात सस. पासून ६६५ मी. उंचीवर हे शहर वसले आहे. सॅन साल्वादोर या देशाच्या राजधानीच्या ठिकाणापासून वायव्येस ७७ किमी. तर ग्वातेमालाच्या सरहद्दीपासून पूर्वेस ३२ किमी. वर सांता आना आहे. याच्या जवळच सांता आना ज्वालामुखी शिखर असून ते देशातील सर्वोच्च (उंची २,३८६ मी.) शिखर आहे. १७०८ पासून याला सांता आना नावाने ओळखले जाते. कॉफीप्रक्रिया, मद्य व साखरनिर्मिती, वस्त्रोद्योग, फर्निचर व चामड्याच्या वस्तूंची निर्मिती हे उद्योग येथे चालतात. हे प्रमुख व्यापारी केंद्र असून येथील कॉफी निर्यात महत्त्वाची आहे. जगातील सर्वांत मोठ्या कॉफीप्रक्रिया केंद्रांपैकी हे एक आहे. पॅन-अमेरिकन महामार्गाचा भाग असलेला इंटर-अमेरिकन महामार्ग या प्रदेशातून जातो.
स्पॅनिश गॉथिक चर्च व वसाहतकालीन एल् काल्व्हारिओ ह्या उल्लेखनीय चर्चवास्तू येथे आहेत. चालचूआपा हे इंडियनांचे भग्नावशेषी शहर येथून पश्चिमेस १४ किमी. वर आहे. एल् साल्वादोर विद्यापीठाची शाखा येथे असून शहरात राष्ट्रीय रंगमंदिर व कला विद्यालय आहे. सांता आनापासून पश्चिमेस १९ किमी. वरील लेक कोटपेक हे उन्हाळ्यातील हवेशीर ठिकाण म्हणून प्रसिद्घ आहे. सन १९८१ च्या अखेरीस डाव्या विचारसरणीच्या गनिमी सैनिकांनी शहरातील मालमत्तेची खूप नासधूस केली होती.
चौधरी, वसंत