सांकेतिक लिपि : सांप्रदायिक पत्रव्यवहार, वृत्तांत, साहित्य इ. ज्या व्यक्तींसाठी लिहिले असेल, त्यांखेरीज इतरांस त्यातील मूळ मजकूर कळू नये, म्हणून त्याचे गुप्त शब्दांत केलेले रूपांतर. यासाठी अक्षरे, आकडे व चिन्हे यांचा विशिष्ट पद्घतीने उपयोग करीत. लेखनात संकेतयोजनेची भारतीय परंपरा प्राचीन असून अंकांसाठी चिन्ह वापरल्याचा पुरावा नाणेघाटातील (पुणे जिल्हा) सातवाहनांच्या इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांतील शिलालेखात आढळतो. तसेच पुढेही ही परंपरा आर्यभट आणि विज्ञानेशर यांच्या अनुक्रमे आर्यसिद्घान्त व मिताक्षरा यांसारख्या ग्रंथांतून दृग्गोचर होते, असे काही विद्वान मानतात. गुप्ततेसाठी वर्णाच्या आणि अंकांच्या सांकेतिक लिप्यांत लेखन करण्याची पद्घती महाराष्ट्रात परंपरेने प्रचलित होती. मात्र महानुभावीयांनी या पद्घतीचा प्रकर्षाने अवलंब करून ती अधिक विकसित केली. महानुभाव पंथाच्या पोथ्यांत मुख्यत्वे ही सांकेतिक लिपी योजलेली आहे. हा लिपिसंकेत इ. स. १३५३ च्या सुमारास निर्माण झाला असावा, असा तज्ज्ञांचा कयास आहे. ⇨सातीग्रंथांपैकी ⇨सह्याद्रिवर्णना चा कर्ता रवळोबास यांनी इ. स. १३५३ मध्ये शोधून काढलेल्या या लिपीला प्रारंभी ‘नागरी’ किंवा ‘सकळी’ (सकळीत) असे नाव होते. या लिपीचा उल्लेख कालदृष्ट्या सर्वांत जुना, हरिबास आणि सोंगोबास यांच्या अन्वयस्थळात ‘मग हिराइसाचिया रवळोबासाची नागरलिपी लिहून दोन प्रती केलिया’ असा आहे. कृष्णमुनींच्या अन्वयस्थळा तही ‘लिपकृत्य त्याचेः नागरिक’ असा तिचा उल्लेख आढळतो. याशिवाय आणखी काही उल्लेख डॉ. यु. म. पठाण यांनी ‘महानुभावांच्या सांकेतिक लिप्या-निर्मितिमीमांसा’ या लेखात सादर केले आहेत. यांवरून त्या लिपीला नागरी व सकळी ही दोन्ही नावे होती असे दिसते. यांपैकी सकळी हे नाव रवळोबासाने ती तयार केली तेव्हाचे असून, पुढे महानुभाव पंथाच्या ‘सकळ’ म्हणजे सर्व आम्नायांनी–श्रीचकधरांची वचने मानणाऱ्या अनुयायांनी–तिचा स्वीकार केला म्हणून किंवा या लिपीत शब्द संकलित म्हणजे संक्षिप्त स्वरूपात योजिले असल्यामुळेही तिला प्रथम संकलित व पुढे त्याचाच अपभंश होऊन ‘सकळीत’ हे नाव पडले असावे, असे अनुदान डॉ. वि. भि. कोलते यांनी सह्याद्रिवर्णनाच्या प्रस्तावनेत काढले आहे. ही लिपी बनविणारे रवळोबास हे हिराइसेचे शिष्य असून त्यांनी प्रारंभी एवढी एकच लिपी शोधून काढली होती व प्रारंभी तरी पंथाच्या सर्व आम्नायांनी तिचा स्वीकार केला होता परंतु पुढे स्वतःची स्वतंत्र लिपी बनविण्याची प्रवृत्ती काही आम्नायांत वाढीस लागली व त्याचा परिणाम सकळी लिपीप्रमाणे आणखी काही लिपी निर्माण होण्यात झाला. ते पुढीलप्रमाणे होत : सुंदरी लिपी, पारमांडल्य लिपी, अंकलिपी, शून्यलिपी, सुभद्रालिपी, श्रीलिपी, वजलिपी, मनोहरालिपी, कवीशेरी लिपी इ. तथापि अशा काही लिप्या निर्माण झाल्या, तरी महानुभावांचे बहुतेक सर्व ग्रंथ प्रारंभीच्या सकळी लिपीतच लिहिलेले आढळतात. अर्थात सकळी लिपीचा संकेतच पंथात विशेष रूढ आहे. क्वचित बाइंदेशकर किंवा तळेगावकर यांसारख्या परंपरांनी अनुक्र मे सुंदरी लिपी व अंकलिपी वापरल्या आहेत परंतु ते अपवाद होत.
महानुभाव संप्रदायातील कवि-लेखकांनी आणि प्रतकारांनी ज्या अनेक सांकेतिक लिप्यांची निर्मिती केली, त्यांत एक अंकलिपी आहे. अशा प्रकारच्या कितीतरी अंकलिप्या नंतरच्या काळात निर्माण झाल्या आणि प्रचारातही होत्या. अक्षरांना जसे अंकांचे मूल्य दिले जात असे त्याचप्रमाणे अक्षरांच्या ऐवजी अंक लिहून आणि अंकांच्या माध्यमातून शब्द लिहिण्याची परंपराही रूढ होती. अंकांच्या या सांकेतिक लिपीला ‘अंकपल्ल्वी लिपी’ असे म्हणतात. परभणीजवळ असलेल्या खानापूर गावातील एका महानुभाव मठात डॉ. प्रभाकर मांडे यांना अंकपल्ल्वी लिपीत लिहिलेले संपूर्ण पत्र उपलब्ध झाले असून प्रस्तुत पत्रासोबत सापडलेल्या कागदात ‘अंकपल्ल्वी लिपी खालीलप्रमाणे’ असे शीर्षक देऊन सांकेतिक लिपीतील बाळबोध वर्ण व अंकलिपी दिली आहे.
महानुभावांचे प्रारंभीचे ग्रंथ नेहमीच्या रूढ बालबोध लिपीतच लिहिलेले होते. ते पुढे म्हणजे इ. स. १३५३ च्या नंतर वरील सांकेतिक लिपीत लिहिले जाऊ लागले. या पंथाच्या उदयानंतर सु. पाऊणशे वर्षांनी या सांकेतिक लिपीची का आवश्यकता भासली ? हा एक ग्रहन प्रश्न आहे. त्याचे बा. अ. भिडे, वि. ल. भावे, वि. भि. कोलते, ह. ना. नेने प्रभृतींनी आपापल्या परीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असला, तरी या प्रश्नाचे खरे उत्तर श्रीचक्र धरांच्याच एका वचनात सापडते. ते असे आहे की, स्वामींचे ‘हें तुचें रहस्य कीं : मा आपुलें रहस्य तें आणिकाप्रती प्रकटीजे ना कीं’, पंथीयेतरांना सांगितल्यास आपल्या शास्त्राचा अवमान होण्याची भीती असते त्यामुळे ते कोणास सांगू नये, त्याविषयी गुप्तता पाळावी, हा चकधरस्वामींच्या मनातील हेतू असावा. रवळोबासांनीही तयार केलेली ‘नागरी’ किंवा ‘सकळी’ लिपी याच उद्देशाने आणि प्रेरणेने केली असावी. याबद्दलची अन्वयस्थळा तील पुढील आख्यायिका महत्त्वाची आहे. तिचा उल्लेख डॉ. यु. म. पठाण यांनी ‘महानुभावांच्या सांकेतिक लिप्या-निर्मितिमीमांसा’ या लेखात केला आहे. तो असा : ‘एक दीस रवळोबासी अटणवीशेषें मालोबासासि भेटावया पाटकुलेयासि गेले : तेथ धर्मगोष्टी करितां मालोबासीं म्हणीतलें : हे बाळबोध खरडे इतराचां हातीं पडतील : शास्त्र भ्रंसैल : आन रहस्य जाइल : तरी बरवी एक लीप करूनि लिहावी : मग रवळोबासीं लीप केली : तयाचे खरडे घेउनि आपलेया लिपीवरी लिहिले :’ याचा अर्थ असा , की सांकेतिक लिपीचा उद्गम स्वसंरक्षणाच्या बुद्घीतून झाला. त्यानंतर उत्तरकालीन महानुभावांनी आपले सर्व साहित्य इतरांपासून चोरून ठेवले आणि चक्र धरांच्या मूळ उद्देशाचा विपर्यास व अतिरेक केला. मात्र यामुळेच महानुभाव पंथाचे साहित्य मूळ स्वरूपात उपलब्ध होऊ शकले, हा एक प्रकारचा मोठा फायदा होय. महानुभावांचे आदिग्रंथ मराठी भाषेच्या ऐतिहासि क अभ्यासाला विशेष उपयोगी पडतात, याचे श्रेय या सांकेतिक लिपिसंकेतयोजनेला दिले पाहिजे. या लिपीचा जनक रवळोबास व या कामी त्याला प्रेरणा देणारे मालोबास या उभयतांकडे मुख्यत्वे याचे श्रेय जाते.
अनेक शतके सांकेतिक लिपीच्या कुलपात अडकून पडलेल्या महानुभाव पंथाच्या पोथ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात सुरू झाले. या ग्रंथाची मराठी भाषिकांना प्रथम ओळख इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी सांकेतिक लिपीची उकल करून दिली. १९०५ साली ग्रंथमाला या मासिकातून लेख लिहून महानुभाव पंथाच्या काही ग्रंथांची ओळख मराठी भाषिकांना त्यांनी करून दिली होती. पेशावरस्थित काही महंतांच्या साह्याने सांकेतिक लिपीची उकल करून ऋद्घिपूरमाहात्म्य, गद्यराज आणि आत्मतीर्थप्रकाश या ग्रंथांचा परिचय त्यांनी त्यावेळी करून दिला होता. त्यानंतर राजवाड्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या १९१० व १९१३ च्या इतिवृत्तांतात सांकेतिक लिपी स्वतंत्रपणे उलगडून पोथी लावण्याचा प्रयत्न केला होता आणि चौसष्ट वैशिष्ट्यपूर्ण रूपांची एक यादी तयार केली परंतु त्यांच्याकडून या क्षेत्रात पुढे अधिक कार्य झाले नाही तथापि १९२२ मध्ये महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्याला कारणही तसेच घडले. त्यांच्याकडे दत्तलक्षराज व गोपीराज हे दोन महानुभाव महंत आपला पोथीसंग्रह घेऊन काही महिने मुक्कामास राहिले. भावे यांनी त्यांच्याकडून त्यांच्या सांकेतिक लिपीचा उलगडा मोठ्या युक्तिप्रयुक्तीने करवून घेतला. महाराष्ट्र सारस्वताच्या तृतीय आवृत्तीत भावे यांनी ‘महाराष्ट्र भाषा सरस्वतीच्या महालातील एक अज्ञात दालन’ या शीर्षकार्थाच्या निबंधात सांकेतिक लिपीचा उलगडा केला आहे. याशिवाय त्यांनी वछाहरण व शिशुपालवध हे प्रारंभीचे दोन महानुभावीय काव्यग्रंथही छापून प्रसिद्घ केले. अशा रीतीने या क्षेत्रातील अभ्यासाचा पाया रचला गेला. त्यानंतर य. खु. देशपांडे, ह. ना. नेने, वि. भि. कोलते प्रभृतींनी त्यात मोलाची भर घातली आणि मराठी साहित्याचे हे अज्ञात दालन खुले केले.
पहा : गुप्तलेखनशास्त्र.
संदर्भ : १. कुलकर्णी, श्री. रं. प्राचीन मराठी गद्य-प्रेरणा आणि परंपरा, मुंबई, १९७०.
२. तुळपुळे, शं. गो. मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड १, पुणे, १९८४.
३. तुळपुळे, शं. गो. महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङ्मय, पुणे, १९७६.
४. पठाण, यु. म. ‘महानुभावांच्या सांकेतिक लिप्या-निर्मितिमीमांसा’ श्रीचकधरदर्शन, मुंबई, १९८२.
५. मांडे, प्रभाकर, सांकेतिक आणि गुप्तभाषा : परंपरा व स्वरूप, औरंगाबाद, २००८.
६. शहा, मु. ब. संपा. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे : समग्र साहित्य, खंड २, धुळे, १९९५.
देशपांडे, सु. र.