सॅमॅवा : इराकमधील दिवानीमा प्रांतातील एक शहर. लोकसंख्या १,५२,८९० (२०१०). ते अस् सॅमॅवा या नावाने अरब देशांत सुपरिचित आहे. बगदादच्या दक्षिणेस सु. २६६ किमी.वर युफ्रे टिस नदीकाठी ते वसले आहे. तसेच बगदाद-बसरा लोहमार्गावर ते आहे. त्याच्या परिसरात सुपीक जमीन असून मुबलक द्राक्षांचे मळे व फळांच्या बागा आहेत.परिसरात पिकणारा भाजीपाला, तांदूळ, गहू , बार्ली इ. कृषी उत्पन्नाची प्रमुख बाजारपेठ या ठिकाणी असून फळांची विशेषतः द्राक्षांची निर्यातहोते. परिसरातून उत्पादित होणाऱ्या लोकरीपासून लोकरी गालिचे निर्मितीचा व्यवसाय येथे चालतो. साखर, कॉफी, कापड इ. आयातमालाच्या बाजारपेठेचेही हे केंद्र आहे. येथे सिमेंट निर्मितीचा मोठा कारखाना काढण्यात आला असल्यामुळे बांधकाम व्यवसायास चालना मिळाली आहे.
देशपांडे, सु. र.