सॅपोनिने : सोपबेरी फळे आणि सोपवर्ट पाने यांध्ये आढळणारी वनस्पतिज द्रव्ये. ही पाण्यात विरघळणारी नैसर्गिक ⇨ ग्लायकोसाइडे आहेत. ही फळे किंवा पाने पाण्यात जोराने घुसळल्यास त्यांमधील सॅपोनिने पुष्कळ फेस तयार करतात. त्यांच्यामध्ये पृष्ठभाग सक्रि य करण्याचा (उदा., हिमोलेटिक) गुणधर्म असतो. फार पूर्वीपासून अनेक देशांमध्ये या फळांचा व पानांचा साबणासारखा वापर करण्यात आलेला आहे. तलम कपडे धुण्यासाठी त्यांचा अद्यापि वापर केला जातो [⟶ रिठा]. वनस्पतींमध्ये असलेल्या सॅपोनिनांचे वनस्पतींच्या जीवनातील कार्य अद्याप लक्षात आलेले नाही.
सॅपोनिनांचे स्फटिक लवकर बनत असल्यामुळे ती शुद्घ स्वरूपात वेगळी करणे अवघड जाते. तथापि काही सॅपोनिनांचे स्वरूप माहीत झालेले आहे. उदा., कोनफळातील डायोसीन-(२५). त्यांची पूड (चूर्ण) पिवळसर रंगाची, जलशोषक, तिखट चवीची व शिंका आणणारी असते. एथिल अल्कोहॉलांध्ये सॅपोनिने किंचित विरघळतात. पाण्याबरोबर सॅपोनिनांची ⇨कलिले तयार होतात. तांबड्या कोशिकांचा (पेशींचा) नाश करणारी म्हणून ती विषारी असतात परंतु त्यांचा रक्ताशी संबंध आला नाही, तर त्यांच्यापासून अपाय होत नाही.
सॅपोनिनांचे दोन वर्ग आहेत : (१) उदासीन सॅपोनिने आणि (२) अम्लीय सॅपोनिने. सॅपोनीन संयुगांत शर्करा इत्यादींशी जोडलेले सायक्लोपेंटॅनोपरहायड्रो फेनँथ्रि नाशी संबंधित गट असल्यास त्यांना उदासीन सॅपोनिने आणि ट्रायटर्पिनॉइडाशी संबंधित गट असल्यास त्यांना अम्लीय सॅपोनिने असे म्हणतात. प्रबल अम्लाबरोबर पाण्यात विद्राव तापविला असता सॅपोनिनांचे रेणू विभक्त होतात आणि विभक्त झालेल्या प्रत्येक टोकाशी पाण्याच्या एकेक रेणूच्या मूलकाची भर पडते. यातून शेवटी सॅपोजेनिनाचा एक रेणू आणि निरनिराळ्या शर्करांचे एक किंवा अनेक रेणू तयार होतात. सॅपोजेनिने स्फटिकी असल्यामुळे ती शुद्घ स्वरूपात मिळू शकतात. तीस कार्बन अणू असलेली टर्पेनॉइड सॅपोजेनिने व सत्तावीस कार्बनअणू असलेली स्टेरॉइड सॅपोजेनिने असे त्यांचे दोन वर्ग आहेत. स्टेरॉइड ⇨हॉर्मोनां च्या संश्लेषणात स्टेरॉइड सॅपोजेनिनाचा प्राथमिक द्रव्य म्हणून उपयोग केला जातो.
पिकांवर मारावयाच्या फवाऱ्यात, मासेमारीसाठी, छायाचित्रणाच्या पायसात, पेयांत, फेसाला व पायसाला स्थैर्य आणण्यासाठी सॅपोनिनांचा उपयोग करतात. कापडासाठी प्रक्षालक म्हणून व त्यावर कांजी (खळ) देण्यासाठीही ती वापरतात. तिलपुष्पी (डिजिटॅलिस पुर्पुरिया) यावनस्पतीच्या डिजिटॅलिस या पदार्थाधील डिजिटॉक्सीन व जिटॉक्सीन ही स्टेरॉइड ग्लायकोसाइडे हृदयावरील चिकित्सेकरिता उपयुक्त आहेत.
ठाकूर, अ. ना.
“